MLA Disqualification: विधानसभा अध्यक्षांच्या निकालाला स्थगिती द्या, शिवसेना ठाकरे गटाच्या याचिकेत मुख्य मागणी
शिवसेना ठाकरे गटाच्या 16 आमदारांचे अपात्रतेपासून आणि शिवसेना शिंदे गटाच्या व्हीपपासून संरक्षण मिळावं ही सुद्धा मागणी याचिकेत ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे
मुंबई : सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) शिवसेना ठाकरे गटाकडून काल दुपारी विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना अपात्रता (MLA Disqualification) संदर्भात दिलेल्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली. अध्यक्ष नार्वेकरांच्या (Rahul Narwekar) निकालाला मुख्यत्वे करून स्थगिती देण्याची मागणी या याचिकेमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.
विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेच्या निर्णयावर 10 जानेवारी रोजी निर्णय दिला. त्याविरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावलेत. नार्वेकरांचा निर्णय म्हणजे सुप्रीम कोर्टाचा अवमान आहे, असा दावा ठाकरे गटानं केला आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांच्या निकालाला स्थगिती द्या, अशी मुख्य मागणी शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या 16 आमदारांचे अपात्रतेपासून आणि शिवसेना शिंदे गटाच्या व्हीपपासून संरक्षण मिळावं ही सुद्धा मागणी याचिकेत ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकरणांमध्ये विधानसभा अध्यक्षांनी जरी निकाल दिला असला तरी आमदारांवर अन्याय होऊ नये अशा पद्धतीने अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.
विधानसभा अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला असून त्यावर आता त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामध्ये फेरफार करून विधानसभा अध्यक्षांनी न्यायालयाचा अवमान केल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे.
काय म्हणाले राहुल नार्वेकर?
याचिका गेली म्हणजे निकाल चुकीचा आहे असं म्हणता येणार नाही, निकालात काय चुकीचं आहे हे न्यायालयाने दाखवून द्यावं लागेल, असं देखील राहुल नार्वेकर यांनी म्हटलं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी 10 जानेवारी रोजी शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या याचिकेवरील आपला निकाल दिला. त्यामध्ये त्यांनी बहुमताच्या आधारे शिवसेना ही शिंदे गटाची असल्याचं सांगितलं. तर शिंदे गटाचे व्हिप भरत गोगावले यांचीच नियुक्ती योग्य असल्याचं सांगत ठाकरे गटाचे व्हिप सुनील प्रभू यांची निवड अवैध ठरवली. तसेच त्यांनी आमदार अपात्रतेच्या दोन्ही गटाकडून आलेल्या याचिका फेटाळल्या आणि कुणालाही अपात्र ठरवलं नाही.
राहुल नार्वेकरांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर दिलेला नेमका निकाल काय?
एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. त्याचसोबत, शिंदे गटाच्या भरत गोगावले यांचा व्हिप अधिकृत ठरवत ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांचा व्हिप विधानसभा अध्यक्षांनी अवैध ठरवलाय. त्यामुळे या निकालात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळालाय. उद्धव ठाकरेंच्या मनात आलं म्हणून ते एकनाथ शिंदेंची हकालपट्टी करू शकत नसल्याची टिप्पणी राहुल नार्वेकर यांनी केलीय. खरी शिवसेना शिंदेंचीच असल्यामुळे शिंदे गटाचे आमदार पात्र ठरवत, ठाकरे गटाची आमदार अपात्र करण्याबाबतची याचिका फेटाळण्यात आलीय. सोबतच ठाकरे गटाचेही सर्व आमदार पात्र करण्यात आलेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आमदार अपात्र करण्याबाबतच्या दोन्ही गटाच्या याचिका फेटाळत, दोन्ही गटांतील कोणतेही आमदार अपात्र केले नाहीत.
हे ही वाचा :