Raju Shetti : देवाच्या काठीला आवाज नसतो, ईडीच्या वादळात तुमचा आख्खा वाडा उद्ध्वस्त झाला, राजू शेट्टींचा टोला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Raju Shetti : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. उद्यापासून आपण पुन्हा शिवसेनेच्या भवनमध्ये बसणार असून, शिवसैनिकांची सेवा करणार असल्याचे सांगत उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. त्यानंतर विविध राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टींनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. देवाच्या काठीला आवाज नसतो, ईडीच्या वादळात तुमचा आख्खा वाडा उद्ध्वस्त झाला असे वक्तव्य राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले राजू शेट्टी
महाविकास आघाडीच्या नेत्यांनो स्वाभिमानी आणि शेकापच्या झोपडीतील आड्याचा तुम्ही एक एक बांबू उपसला. पण ईडीच्या वादळात तुमचा आख्खा वाडा उद्ध्वस्त झाला. देवाच्या काठीला आवाज नसतो, अशी पोस्ट करत राज शेट्टी यांनी महाविकास आघडीच्या नेत्यांना टोला लगावला आहे.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड केले होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले होते. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी बहुमत चाचणी करण्याची मागणी केली होती. या संदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत चाचणी करण्याचे निर्देश दिले होते, पण बहुमत चाचणी अगोदरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि राज्यातील सत्तासंघर्षाची सुरुवात झाली. शिवसेनेतील काही आमदारांसह एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले आणि शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. एकापाठोपाठ एक आमदार आणि मंत्री एकथान शिंदेंच्या गटात सामील होऊ लागले. खरं तर तेव्हापासूनच महाविकास आघाडी सरकारचं काउंटडाऊन सुरु झालं होत. भावनिक साद, आवाहन, अल्टिमेटम सर्व काही करुन झालं पण बंडखोर आमदार आपल्या भूमिकेवर ठाम होते. आरोप-प्रत्यारोपांची सत्र रंगली आणि अखेर या राजकीय नाट्यावर पडदा पडला तो म्हणजे, उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यामुळे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग केला आणि गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्रात सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं.