(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Challenges Before Uddhav Thackeray : मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, उद्धव ठाकरे यांच्यासमोरील आव्हाने
Challenges Before Uddhav Thackeray : मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार झालेल्या उद्धव ठाकरे यांच्यासमोर शिवसेनेची पुनर्बांधणी करण्याचं आव्हान आहे. या घडीला त्यांच्यासमोर कोणती प्रमुख आव्हानं आहेत हे जाणून घेऊया
Challenges Before Uddhav Thackeray : मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार झालेल्या उद्धव ठाकरे यांच्यासमोर शिवसेनेची पुनर्बांधणी करण्याचं आव्हान आहे. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (29 जून) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आपण आता पुन्हा शिवसेना भवनमध्ये बसणार आहे, शिवसैनिकांची सेवा करणार आहे असं सांगत उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा आदेश कायम ठेवत महाविकास आघाडी सरकारला 30 जून रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरुन संवाद साधला आणि मुख्यमंत्रीपदाचा त्याग करत असल्याचं जाहीर केलं.
उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता ते संपूर्ण वेळ शिवसेना पक्षप्रमुख म्हणून कामकाज पाहतील. परंतु सध्या त्यांच्यासाठी हे काम देखील फारसं सोपं नसेल. शिवसेनेच्या 39 आमदारांनी बंडखोरी केल्याने आणि आम्ही शिवसेना सोडलेली नाही. आम्ही असलेलीच शिवसेना आहे, असा दावा शिंदे गटाने केल्याने पक्षाच्या अस्तित्त्वावरच प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेसमोर पर्यायाने उद्धव ठाकरे यांच्यासमोर भलीमोठी आव्हानं आ वासून उभी आहेत, ज्याचा त्यांना सामना करायचा आहे.
उद्धव ठाकरे यांच्यासमोर आत्ताच्या घडीला कोणती प्रमुख आव्हानं आहेत, जे जाणून घेऊया...
1. एकनाथ शिंदे यांच्यासह इतर आमदारांच्या बंडाने हादरलेल्या शिवसेनेला पुन्हा उभारी देणे
2. एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेवरच दावा सांगितल्याने कायदेशीर लढाई लढणे
3. बंडखोर आमदार आणि नेत्यांच्या मतदारसंघात पुन्हा संघटना बांधणी करणे
4. एकाच वेळी अनेक ज्येष्ठ नेते सोडून गेल्याने पोकळी भरुन काढण्यासाठी दुसरं नेतृत्त्व तयार करणे
5. महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पुन्हा यश मिळवून देणे
6. बंडखोरांना सोबत घेऊन सत्तेवर येणाऱ्या आक्रमक भाजपचा समान करणे
7. 1990 नंतर विधानसभे सर्वात कमी संख्याबळ झाल्याने पुन्हा अस्तित्त्व निर्माण करणे
राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द
36 दिवसात बनलेले तीन पक्षांचं सरकार... अडीच वर्ष चाललं आणि नऊ दिवसात कोसळलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (29 जून) उशीरा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन इथे भेट घेऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला. भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा स्वीकारत पर्यायी व्यवस्था होईपर्यंत उद्धव ठाकरेंना पदाचा कार्यभार सांभाळण्यास सांगितलं.