![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Uddhav Thackeray : सरकार पडलं.... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा आणि आमदारकीचाही राजीनामा
Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद आणि विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे.
![Uddhav Thackeray : सरकार पडलं.... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा आणि आमदारकीचाही राजीनामा Maharashtra Political Crisis CM Uddhav Thackeray Resign Floor test majority test Uddhav Thackeray : सरकार पडलं.... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा आणि आमदारकीचाही राजीनामा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/29/452eb6bfcdec19ca55732a6c5b6a05a2_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्री पदावरुन खाली खेचलं, त्यांना ते पुण्य मिळू दे असं सांगत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. उद्यापासून आपण पुन्हा शिवसेनेच्या भवनमध्ये बसणार आहे, शिवसैनिकांची सेवा करणार आहे असं सांगत उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांचा आदेश कायम ठेवत उद्धव ठाकरेंना उद्याच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरून संवाद साधला.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
सरकार म्हणून सर्वप्रथम आपण शिवरायांच्या रायगड किल्ल्याच्या विकासाला निधी दिला. नंतर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेतला. आज औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असं केलं, शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार केलं, यामुळे आयुष्य सार्थक लागलं.
एखादी गोष्ट चांगली सुरू असताना त्याला दृष्ट लागते. आज मला शरद पवार आणि सोनिया गांधींचे आभार मानायचं आहे. आजच्या औरंगाबादच्या नामांतरणाचा ठराव मांडताना शिवसेनेचे केवळ चारच मंत्री होते, याचं जरा दु:ख होतंय. साधी माणसं, कुणी रिक्षावाले, कुणी टपरीवाले तर कुणी हातभट्टीवाले... या सर्वांना शिवसेनाप्रमुखांनी माणसात आणलं, आमदार, खासदार बनवलं, मंत्री बनवलं. पण हे लोक मोठी झाल्यानंतर नाराज झाले. ज्यांना सर्वकाही दिलं ते नाराज झाले...पण ज्यांना काहीच दिलं नाही ते सोबत राहिले, तेच शिवसैनिक आहेत.
लोकशाहीचा मान राखल्याबद्दल राज्यपालांचे आभार
उद्या फ्लोअर टेस्ट करण्याचा आदेश दिला आहे त्याचं पालन करणं आवश्यक आहे. लोकशाहीचे पालन झालंच पाहिजे, मी राज्यपालांचे आभार मानतो, केवळ एका पत्रानंतर लगेच त्यांनी हालचाल केली आणि बहुमत सिद्ध करायला सांगितलं.
जे लोक दगा देणार असं सांगितलं गेलं, त्यांनी साथ दिली. आपली नाराजी होती तर सुरतमध्ये किंवा गुवाहाटीला जाऊन सांगण्यापेक्षा मातोश्रीवर येऊन सांगायला हवं होतं.
शिवसैनिकांनी गोंधळ घालू नये
उद्या केंद्रीय राखीव दल मुंबईत येणार आहे, लष्करही येईल. उद्या कोणीही शिवसैनिकांनी यांच्यामध्ये येऊ नका, सर्वांना येऊ द्यावं. लोकशाहीचा पाळणा उद्या हालणार आहे. उद्या तुमच्या वाटेत कोणीही येणार नाहीत, फ्लोअर टेस्टसाठी या. शिवसैनिकांना आवाहन आहे की उद्या कोणीही गोंधळ घालू नये. ज्यांना शिवसेनेने राजकीय जन्म दिला त्या शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला खाली खेचण्याचं पुण्य जर त्यांच्या पदरात पडत असेल तर त्यांना ते मिळू दे. ते पाप माझं आहे, त्यांच्यावर विश्वास मी ठेवला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)