Harshvardhan Sapkal on PM Narendra Modi: आंतरराष्ट्रीय धोरण योग्य नसल्याने भारताला फटका, 'नरेंदर सरेंडर' म्हणण्याची वेळ आलेय: हर्षवर्धन सपकाळ
Harshvardhan Sapkal on PM Narendra Modi: इस्रायल-इराण संघर्षाची झळ आता भारतालाही बसू लागली आहे. इराणच्या नाकेबंदीमुळे भारताला होणारा एलपीजी पुरवठा विस्कळीत झाला आहे.

Harshvardhan Sapkal on PM Narendra Modi: इस्रायल-इराण संघर्षाची झळ आता भारतालाही बसू लागली आहे. इराणच्या नाकेबंदीमुळे भारताला होणारा एलपीजी पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरचा तीव्र तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. घरगुती सिलिंडरच्या किंमती वाढल्या असून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. तर इंधनाची देखील मोठ्या प्रमाणावर टंचाई निर्माण होण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या जोरदार हल्लाबोल केलाय. “देशाच्या परिस्थितीकडे पाहता आता ‘नरेंद्र सरेंडर’ म्हणण्याची वेळ आली आहे,” असे वक्तव्य करत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
शेतमालाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी कळमनुरी ते हिंगोली दरम्यान आयोजित पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या पदयात्रेद्वारे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
Harshvardhan Sapkal on Narendra Modi: 'नरेंदर सरेंडर' म्हणण्याची वेळ आलीय
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, अमेरिकेसोबत केलेल्या करारामुळे शेती व्यवसायाची पीछे हाट होतानाचे चित्र आहे. आंतरराष्ट्रीय धोरण ठीक नसल्याने इंधनासारख्या समस्या देशामध्ये निर्माण झालेल्या आहेत. केंद्र सरकार योग्य पद्धतीने काम करत नसल्याने हा आक्रोश आहे. सिलेंडरच्या किमती वाढलेल्या आहेत. इंधनाचा देखील तुटवडा निर्माण होऊ शकतो. 'नरेंदर सरेंडर' म्हणण्याची वेळ आलेली आहे, याबद्दल मी दुःख व्यक्त करतो, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.
Harshvardhan Sapkal on Om Birla: संसदेत चर्चेला वाव दिला जात नाही
दरम्यान, हर्षवर्धन सपकाळ यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांच्या कामकाजावरही टीका केली. संसदेत सत्ताधाऱ्यांना प्रोत्साहन दिले जाते, तर विरोधकांना बोलू दिले जात नाही, असा आरोप त्यांनी केला. “संसदेत चर्चेला वाव दिला जात नाही. पार्लमेंटरी शब्द उच्चारण्यावरही मर्यादा आणल्या जात आहेत. लोकशाहीला मर्यादित करण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असेही ते म्हणाले.
Harshvardhan Sapkal: सध्या दिसणारी हुल्लडबाजी दुर्दैवी
आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने तब्बल 96 धावांनी विजय मिळवला. भारताने सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. तर काही ठिकाणी विजयाचा आनंदोत्सव साजरा करताना हुल्लडबाजी करण्यात आली. याबाबत विचारले असता हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, क्रिकेटमध्ये झालेल्या यशाचा जाज्वल्य अभिमान भारतीयांनी ठेवने हे क्रमप्राप्त आहे. यापूर्वी आपण वर्ल्ड कप जिंकलेला आहे. सध्या दिसणारी हुल्लडबाजी दुर्दैवी आहे. पोलिसांचे प्रशासनावर वचका नाही. सरकार हुल्लडबाजांना प्रोत्साहन देत असल्यामुळे विजयाच्या आनंदाच्या क्षणात सुद्धा असे गालबोट लागत आहेत. विकृत स्वरूपाची मानसिकता सत्ताधारी स्पॉन्सर करत आहे. त्या स्वरूपाची ही मानसिकता आहे, अशी टीका त्यांनी केलीय.
Harshvardhan Sapkal: भारतीय टीमचे अभिनंदन
हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, सर्व भारतीय टीमचे अभिनंदन. यापूर्वीसुद्धा त्यांनी अशाच पद्धतीने वर्ल्ड कप आणला होता. याही टीमचं मी अभिनंदन करतो. आगामी काळामध्ये क्रिकेटमध्ये प्रत्येक वर्ल्ड कप आपल्याला आणायचा आहे. फार आशादायी चित्र विजयामुळे निर्माण झाले आहे, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा





















