Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : निवडणूक आयोगाच्या सुनावणीमध्ये काय होणार?
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : निवडणूक आयोगाकडे दोन्ही गटांनी आपली कागदपत्रे सादर केली आहेत. मात्र या सुनावणी दरम्यान काय होईल त्याची उत्सुकता सर्वांना आहे.
Election Commission : शिवसेनेमध्ये पडलेल्या उभ्या फुटीनंतर हा संपूर्ण वाद आता निवडणूक आयोगाच्या दारात पोहोचला आहे, निवडणूक आयोगाकडे दोन्ही गटांनी आपली कागदपत्रे सादर केली आहेत. मात्र या सुनावणी दरम्यान काय होईल त्याची उत्सुकता सर्वांना आहे.
शिंदे गट आणि ठाकरे गट आता शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हासाठी लढत आहेत, अंधेरीच्या पोटनिवडणुकीसाठी हे चिन्ह कोणाला मिळेल याचा वाद निवडणूक आयोगाच्या समोर आहे. निवडणूक आयोगाने लवकरात लवकर सुनावणी घेऊन या वादावर अंतिम निकाल द्यावा अशी आगरी भूमिका शिंदे गटाची आहे मात्र ठाकरे गटाने आणखीन काही दिवस कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी लागणार असल्याचे सांगितले आहे. आता दोन्ही गटाकडून मुख्य कागदपत्रे सादर झाल्याच्या नंतर निवडणूक आयोगात काय होईल या संदर्भात महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. निवडणूक आयोग शिंदे घटना आपले म्हणणे मांडण्यासाठी दोन ते तीन दिवस देण्याची शक्यता आहे, त्याचप्रमाणे ठाकरे गटाला देखील दोन ते तीन दिवस आपले म्हणणे मांडण्यासाठी मिळू शकतात, दोन्ही गटाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर निवडणूक आयोग त्यावर विचार करण्यासाठी अंतिम निर्णयाच्या आधी एक ते दोन दिवस घेण्याची शक्यता आहे, त्यानंतर निवडणूक आयोगाकडून अंतिम निर्णय जाहीर केला जाईल.
अंतिम निर्णय घेण्यासाठी दोन्ही गटाकडून सादर झालेली प्रतिज्ञापत्रे, त्यांना असलेला कार्यकर्त्यांचा पाठिंबा, त्यांच्याकडे असलेले संख्याबळ, या सर्वाचा विचार केला जाईल, विधिमंडळात आणि पक्षात देखील ज्याच्याकडे बहुमत असेल त्याला धनुष्यबाण हे चिन्ह मिळण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. तानुसार शिंदे गटाकडे सध्या विधिमंडळातील बहुमत आहे, शिंदे गटाकडे दोन तृतीयांश आमदार आणि दोन तृतीयांश खासदार असल्याने त्यांच्याकडे धनुष्यबाण हे चिन्ह जाण्याची शक्यता जास्त आहे.
आजच शिंदे गटाने तब्बल सात लाख शपथपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर केल्याचा दावा केला आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांचे पाठबळ देखील शिंदे गटाकडे जास्त असल्यास त्यांना चिन्ह मिळू शकते. मात्र जर ठाकरे घटाने त्यांच्याकडे असलेली शपथ पत्रे आणि एकूणच पाठबळ जास्त असल्याचे सिद्ध केले तर त्यांनाही चिन्ह मिळण्याची शक्यता आहे. मात्र ज्यावेळी एकाच पक्षातील दोन गटाकडून चिन्हावर दावा केला जातो त्यावेळी ते चिन्ह फ्रीज केले जात असल्याचा इतिहास आहे, याआधी पासवान यांच्या संदर्भात देखील चिन्ह फ्रीज केल्याचे दिसून आले होते. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट या दोघांनाही चिन्ह न देता ते फ्रीज करून दोन्ही गटाला येत्या पोटनिवडणुकीसाठी नवीन चिन्हाचा शोध घ्यावा लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही सर्व प्रक्रिया येत्या एका आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे दोन्ही गट जास्तीत जास्त प्रयत्न करताना दिसत आहेत.