'दार उघड उद्धवा दार उघड' मंदिरं खुली करण्यासाठी भाजपचं राज्यभर घंटानाद आंदोलन
मंदिरं सुरु करण्याच्या मागणीसाठी 'दार उघड उद्धवा दार उघड' अशी हाक देत भाजप राज्यभर ठिकठिकाणी घंटानाद आंदोलन करणार आहेत. बुलढाण्याच्या संग्रामपूरच्या जगदंबा मंदिरासमोर या आंदोलनाचा श्रीगणेशा करण्यात आला.
मुंबई : राज्यातील मंदिरं, देवस्थान सुरु करण्याच्या मागणीसाठी भाजप आणि अध्यात्मक समन्वय आघाडी आज घंटानाद आंदोलन करणार आहे. गावागावातील मंदिरांसमोर भाजप कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत. मंदिरं सुरु करण्याच्या मागणीकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ 'दार उघड उद्धवा दार उघड' अशी हाक देत आज राज्यभर ठिकठिकाणी घंटानाद आंदोलन केलं जाणार असल्याचं अध्यात्मक समन्वय आघाडीतर्फे सांगण्यात आलं. बुलढाण्याच्या संग्रामपूरमधून आंदोलनाचा श्रीगणेशा करण्यात आला. मुसळधार पावसातही संग्रामपूरच्या जगदंबा मंदिरासमोर भाजप कार्यकर्त्यांकडून घंटनाद आंदोलन करण्यात आलं.
कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील मंदिरं मागील पाच महिन्यांपासून बंद आहेत. मंदिरं दर्शनासाठी खुली करा, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. केंद्र सरकारने राज्यांमधील मंदिरं खुली करण्याची परवानगी दिली आहे, पण महाराष्ट्र सरकारच अजून मंदिरं खुली करण्यास तयार नाही, असा आरोप विविध धार्मिक संस्थानांनी केला आहे.
लॉकडाऊन शिथील करण्याच्या प्रक्रियेत राज्यभरात दारुच्या दुकानांना अधिकृत परवानग्या देण्यात आल्या. मात्र मंदिरांचं टाळं काही उघडलं नाही, असा आरोप अध्यात्मिक समन्वय आघाडीने केला आहे. या आंदोलनात भाजपसह विश्व हिंदू परिषदही सहभागी आहे. अखिल भारतीय संत समिती, अखिल भारतीय वारकरी मंडळ, वारकरी महामंडळ, अखिल भारतीय पुरोहित संघ, जय बाबाजी भक्त परिवार यांसह वारकरी, महानुभाव, लिंगायत, जैन, शीख संप्रदायाच्या अनेक संप्रदायांची प्रमुख मंदिरे, गुरुद्वारा, जैन मंदिरे-स्थानक, बौद्ध विहार यांच्या प्रवेशद्वारांसमोर घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.
राज्यभर कुठे कुठे घंटानाद आंदोलन?
मंदिरं खुली करण्यासाठी राज्यभर भाजप आणि अध्यात्मिक आघाडीची आंदोलनं, बुलडाण्याच्या संग्रामपूरमधून श्रीगणेशा
भाजपकडून पुण्यातील सारसबाग इथे मंदिरे खुली करावीत या मागणीसाठी घंटानाद आंदोलन
इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंगपूर इथे नृसिंह मंदिराबाहेर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्त्वात घंटानाद आंदोलन
कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराच्या प्रवेशद्वारासह 9 ठिकाणी भाजपचं सकाळी11 वाजता घंटानाद आंदोलन
हिंगोलीत आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11 वाजता भाजपचे घंटानाद आंदोलन
मुंबईत राम कदम सकाळी 10 वाजता सिद्धिविनायक मंदिरासमोर घंटानाद आंदोलन
मुंबईतील वडाळ्यात भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड विठ्ठल मंदिरासमोर आंदोलन
नाशकात सकाळी 11 वाजता अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांचं रामकुंडाजवळ कपालेश्वराच्या पायथ्याशी आंदोलन
नागपुरात सकाळी 11 वाजता टेकडी गणेशासमोर भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांचं आंदोलन
शिर्डीत सकाळी 10 वाजता खा.सुजय विखे आणि आ. राधाकृष्ण विखे साई मंदिरासमोर आंदोलन करणार
पंढरपुरात सकाळी 11 वाजता विठ्ठल मंदिरासमोर भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं आंदोलन