(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ram Shinde : संभाजीराजेंना चांगली वागणूक दिली नाही म्हणणे ही शरद पवारांची डबल ढोलकी, राम शिंदेंची टीका
संभाजीराजेंना भाजपने चांगली वागणूक दिली नाही असे शरद पवार म्हणत आहेत. ही शरद पवार यांची डबल ढोलकी असल्याची टीका भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी केली.
Ram Shinde on Sharad Pawar : भाजपने संभाजीराजे छत्रपती यांना राष्ट्रपती नियुक्त खासदार केल्यानंतर शरद पवार यांनी केलेले वक्तव्य सर्वांना माहित आहे. आता संभाजीराजेंना भाजपने चांगली वागणूक दिली नाही असे शरद पवार म्हणत आहेत. ही शरद पवार यांची डबल ढोलकी असल्याची टीका भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी केली आहे. राम शिंदे हे सोलापुरात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.
शरद पवार यांची भूमिका संदिग्ध
प्रसारमाध्यमांनी राम शिंदे यांना संभाजीराजे छत्रपती यांच्या संदर्भात प्रश्न विचारला. तसेच शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबतही राम शिंदेना विचारलं असताना त्यांनी त्यांच्यावर टीका केली. तसेच छत्रपती संभाजीराजे हे भाजपच्या काळातच राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून होते. आता पुन्हा अपक्ष म्हणून राज्यसभेची खासदारकी लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. तसेच त्यांनी राज्यातील सर्व विधानसभा सदस्यांना पाठिंबा देखील देण्याचे आवाहन केले आहे. या संदर्भात भाजप कोअर कमिटी निर्णय घेईल असेही राम शिंदे यावेळी म्हणाले. शरद पवार यांची भूमिका संदिग्ध आहे. ज्यावेळेस संभाजीराजे राष्ट्रपती नियुक्त खासदार झाले, त्यावेळी शरद पवार यांनी केलेलं वक्तव्य हे जर आपण पाहिलं तर आताच्या वक्तव्याशी पूर्ण विरोधाभास असल्याचे राम शिंदे म्हणाले.
संभाजीराजेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गुरुवारी रात्री वर्षा बंगल्यावर भेट घेतली. या भेटीने राजकीय वर्तुळात अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. राज्यसभेच्या आगामी निवडणुकीच्या निमित्ताने या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. मुख्यमंत्री आणि संभाजीराजे या दोघांमध्ये जवळपास 35 मिनिटं चर्चा झाली. या भेटीत राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात चर्चा झाल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे. मिळालेल्या माहीतीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, संभाजीराजे यांनी शिवसेनेच्या या प्रस्तावात सुधारणा करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे. माझी उमेदवारी शिवसेनेच्या सहकार्याने महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर करावी, असा प्रस्ताव संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिल्याची माहिती मिळत आहे. संभाजीराजे यांच्या या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचार करुन कळवतो असे सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या: