सिंधुदुर्ग, विजयदुर्ग किल्ल्यांसह कुडोपीतील कातळशिल्पांना मिळणार ‘जागतिक वारसा नामांकन’
सिंधुदुर्ग, विजयदुर्ग किल्ल्यांसह कुडोपीतील कातळशिल्पांना मिळणार ‘जागतिक वारसा नामांकन’, युनेस्कोने प्रस्तावाला दिली तत्वत: मान्यता, राज्य सरकारने केंद्रामार्फत पाठवला होता प्रस्ताव.

सिंधुदुर्ग : आज जागतिक वारसा दिन असून महाराष्ट्र शासनाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षणामार्फत युनेस्कोला सादर केलेल्या ‘महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य’ आणि ‘कोकणातील कातळशिल्पे’ यांना ‘जागतिक वारसा नामांकन’ मिळण्याच्या प्रस्तावांचा तत्वत: स्वीकार करण्यात आला आहे. ‘जागतिक वारसा नामांकन’ मिळणाऱ्या स्थळांमध्ये सिंधुदुर्ग, विजयदुर्ग किल्ल्यांसह राज्यातील अनेक किल्ले, रत्नागिरी जिल्ह्यातील कातळशिल्पांसह कुडोपीतील कातळशिल्पे यांचा समावेश आहे.
युनेस्कोतर्फे जगातील पातळीवर जनजागृतीसाठी दरवर्षी 18 एप्रिल हा जागतिक वारसा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी ‘गुंतागुंतीचा भूतकाळ आणि विविधतापूर्ण भविष्य’ (Complex Past and Diverse Future) ही संकल्पना पुढे ठेऊन हा दिवस साजरा होत आहे. राज्याचे पुरातत्व संचालक तेजस गर्गे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षणामार्फत ‘महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य’ (ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोंगरी व समुद्री किल्ल्यांचा समावेश आहे.) आणि ‘कोकणातील कातळशिल्पे’ हे प्रस्ताव युनेस्कोला पाठवले होते. युनेस्कोने या प्रस्तावांचा तत्वत: स्वीकार केला असुन सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी हे जागतिक वारसा नामांकन युनेस्कोकडून मिळवण्यास महाराष्ट्र शासन कटिबद्ध असेल अस म्हटलं आहे.
युनेस्कोतर्फे जागतिक पातळीवर जनजागृतीसाठी दर वर्षी १८ एप्रिल हा #जागतीक_वारसा_दिवस म्हणून साजरा करण्यात येतो, या वर्षी ‘#जटिल_भूतकाळ_आणि_वैविध्यपूर्ण_भविष्य’ ही संकल्पना पुढे ठेऊन हा दिवस साजरा होत आहे. #WorldHeritageDay #WorldHeritageDay2021 pic.twitter.com/63qNuBxtVL
— Amit V. Deshmukh (@AmitV_Deshmukh) April 18, 2021
या नामांकन प्रक्रियेत रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, प्रतापगड, लोहगड, पन्हाळा, रांगणा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग, कुलाबा आदि किल्ल्यांचा समावेश आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडोपी कातळशिल्पांसह रत्नागिरी जिल्ह्यातील कशेळी, बारसू, रुंढेतळी, देवीहसोळ, जांभरुण, अक्षी या कातळशिल्पस्थानांचा समावेश आहे. तसं ट्विट सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
