एक्स्प्लोर
मराठा मोर्चात वऱ्हाड, आंदोलनास्थळीच लग्न!
ज्या आंदोलनस्थळी सरकारकडे मागण्यांचं दान मागितलं जात होतं, तिथेच प्रत्येक आंदोलक वधू-वरांना भावी आयुष्यांसाठी शुभेच्छा आणि आशिर्वांदाचं दान देत होतं.
अकोला: संपूर्ण महाराष्ट्रात आज आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजानं बंद पुकारला आहे. अकोला जिल्ह्यातही आज सकाळपासूनच या बंदचा परिणाम दिसून येतोय. घोषणा, आंदोलन, रॅली आणि काही ठिकाणच्या तोडफोडीच्या घटनांनी राज्यभरात या बंदची विविध रुपं पाहायला मिळाली.
मात्र, अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये या आंदोलनाचं एक वेगळंच रुप पहायला मिळालं. मराठा समाजाच्या मागण्या आणि एकीच्या घोषणांनी आसमंत दणाणून गेलं होतं. मात्र आज तेच आंदोलनाचं ठिकाण मंगलाष्टकांच्या मंजुळ स्वरांनी निनादलं.
ज्या आंदोलनस्थळी सरकारकडे मागण्यांचं दान मागितलं जात होतं, तिथेच प्रत्येक आंदोलक वधू-वरांना भावी आयुष्यांसाठी शुभेच्छा आणि आशिर्वांदाचं दान देत होतं.
अकोट तालुक्यातील देऊळगाव येथील तेजस्विनी गावंडेचा विवाह आज अकोला तालुक्यातील गांधीग्रामच्या अभिमन्यू अढावसोबत होता. अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी सदनमध्ये हा विवाह आयोजित करण्यात आला होता. या लग्नासाठी दोन्हीकडील पाहुणेमंडळी उपस्थित होते.
वधू तेजस्विनी आणि वर अभिमन्यूसह दोन्हीकडील मंडळींनी लग्नाआधी मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यातूनच पुढे आंदोलनस्थळीच लग्न लावण्याचा निर्णय दोन्हीकडील मंडळी आणि पाहुण्यांनी घेतला.
वधू-वर आणि पाहुणे मंडळी शिवाजी चौकातील आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी घोषणाही दिल्या. त्यानंतर गडबड सुरु झाली लग्नसोहळ्याची.
आरक्षणाच्या घोषणांच्या जागी मंगलाष्टकं सुरु झाली. मराठा समाज आणि आंदोलकांच्या साक्षीनं अभिमन्यू आणि तेजस्विनी वैवाहिक जीवनाच्या सूत्रात बांधले गेले.
आतापर्यंत मराठा क्रांती मोर्चाची अनेक ऐतिहासिक रुपं अख्ख्या माहाराष्ट्रानं, जगानं अनुभवली आहेत. मात्र, आजचं हे अकोटमधील लग्नाचं रुप या सर्व रुपांपेक्षा काहीसं वेगळं आणि भावनिक म्हणावं लागेल.
राज्यभरात आंदोलन, महाराष्ट्र बंद
गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा क्रांती मोर्चाने आज म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. या बंदमध्ये मुंबईचा समावेश असला, तरी नवी मुंबई आणि ठाण्यातील मराठा समाज सहभागी होणार नाही. मराठा समाज समन्वयक आणि पोलिसांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. वारंवार नागरिकांना वेठीस धरणं योग्य नसल्याचं सांगून नवी मुंबई आणि ठाण्यातील मराठा संघटनांनी बंदमधून माघार घेतली आहे. या ठिकाणी बंदऐवजी ठिय्या करुन निषेध नोंदवला जाणार आहे.
आजच्या बंदमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे. त्यामुळं दूध, शाळा-महाविद्यालये आणि वैद्यकीय सेवा नेहमीप्रमाणे सुरु राहतील. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील काही शाळांनी सुट्टी जाहीर केली आहे. काही दिवसांपूर्वीच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सुट्टीचा निर्णय मुख्याध्यापकांकडे सोपवला होता. यानुसार काही शाळांच्या मुख्याध्यापकांनी हा निर्णय घेतला आहे..
मराठा समाजाला आरक्षण द्यावं, आरक्षण जाहीर होईपर्यंत मेगा भरती स्थगित करावी, कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी द्यावी या प्रमुख मागण्यात मराठा आंदोलकांच्या आहेत. त्यापैकी मेगा भरती स्थगित करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 ऑगस्ट रोजी केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रीडा
गडचिरोली
राजकारण
Advertisement