एक्स्प्लोर
अहमदनगर : आंबेडकर जयंतीचा खर्च टाळून गरजू नववधूला आर्थिक मदत

आअहमदनगर : लातूरच्या शीतल वायाळ या तरुणीने हुंड्यासाठी पैसे नसल्याने मृत्यूला कवटाळलं. शीतलच्या मृत्यूने समाजातील अनिष्ट रुढी परंपरा चव्हाट्यावर आल्या. मात्र अहमदनगरला भीमशक्ती सामाजिक संघटनेने आंबेडकर जयंतीचा खर्च टाळून गरजू नववधूला आर्थिक मदत केली आहे. या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
अहमदनगरच्या भीमशक्ती संघटनेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी केली. बँड, मिरवणूक, डीजे यांचा खर्ज टाळून तो पैसा एका गरजू कुटुंबाला दिला.
भीमशक्ती संघटनेने गाडेकर कुटुंबातील गरजू मुलीच्या लग्नाला रोख सोळा हजाराची आर्थिक मदत केली. त्यामुळे बाबासाहेबांच्या जयंतीचा खरा उद्देश सफल झाला आहे. मात्र अशीच मदत शीतल वायाळला कोणी केली असती तर तिचाही जीव वाचला असता.
भीमशक्ती संघटनेसह ग्रामस्थांचाही आधार
वांबोरी हे साधारण वीस हजार लोकसंख्येचं गाव आहे. गावातच दत्तात्रय गाडेकर यांचं पत्नी आणि मुलांसह कुटुंब राहतं. हातावर पोट भरणाऱ्या या कुटुंबाला आजाराने ग्रासलंय. पत्नीला कर्करोग, तर पतीला पित्ताशयाचा आजार झाला आहे. उपचारासाठीच पैसे नसल्याने मुलीच्या लग्नासाठी पैसे कुठून आणायचे, असा प्रश्न गाडेकर कुटुंबासमोर आहे. मात्र भीमशक्ती संघटनेच्या मदतीने त्यांचं ओझं जरासं का होईना कमी झालं आहे.
गाडेकर दाम्पत्य आजारपण आणि परिस्थितीने त्रस्त आहे. मात्र या परिस्थितीत पोटाला चिमटा घेऊन त्यांनी मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. मुलगी अश्विनी कॉमर्सच्या तिसऱ्या वर्षांत तर मुलगा शंकर अकरावीत शिकतो. मात्र मुलीच्या लग्नाच्या काळजीने गाडेकर दाम्पत्य चिंतेत होतं. पण आता ग्रामस्थांनी मदतीचा हात पुढं केला आहे. सुभाष पाटील यांनी लग्नातील अन्नदान आणि मंडपाची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे डोंगराएवढं वाटणारं लग्नाचं ओझं आता हलकं झालं आहे.
वांबोरीत मे महिन्यात चार तारखेला अश्विनीचा विवाह आहे. गावकऱ्यांनी घरचं लग्न समजून मदतीचा हात पुढं केलाय. या लग्नाचा सर्व खर्च करण्याची तयारी भीमशक्ती संघटनेसह नागरिकांनी केलीये. इथंच न थांबता येत्या काळातही जयंतीचा खर्च गरजूंना देण्याचा भीमशक्ती संघटनेचा मानस आहे.
महापुरुषांच्या जयंतीला हल्ली इव्हेंटचं स्वरुप आलं आहे. मात्र भीमशक्ती संघटनेने अवास्तव खर्च टाळून वंचित मुलीच्या लग्नाला हातभर लावला. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची खरी शिकवण त्यांच्या अनुयायांनी अंगीकारली आहे. भीमशक्ती संघटनेचा हा निर्णय अनेकांना प्रेरणा देणारा ठरु शकतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बातम्या
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
