Bjp Meeting : चार राज्यात सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी घेतली पाच तास बैठक, उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत सस्पेन्स
पंजाब वगळता अन्य चार राज्यात भाजप सरकार स्थापन करणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी तब्बल पाच तास महत्त्वाची बैठक झाली.
Bjp Meeting : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळालं आहे. पाचपैकी पंजाब वगळता अन्य चार राज्यात भाजप सरकार स्थापन करणार आहे. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने सत्ता स्थापन केली आहे. दरम्यान, या चार राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी तब्बल पाच तास महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा उपस्थित होते.
दरम्यान, येत्या 24 मार्चला उत्तर प्रदेशमध्ये भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत योगी आदित्यनाथ यांची औपचारिकपणे नेतेपदी निवड होणार आहे. योगी आदित्यनाथ यांचा शपथविधी कार्यक्रम 25 मार्चला लखनौमधील शहीद पथावरील एकना स्टेडियमवर होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक ज्येष्ठ भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
21 मार्च म्हणजे आज विधिमंडळ पक्षाची बैठक होणार होती. मात्र, ती पुढे ढकलण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर उत्तर प्रदेशमध्ये सरकार स्थापनेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांना पक्षाकडून निरीक्षक आणि सहनिरीक्षक बनवण्यात आले आहे.
उत्तराखंड
उत्तराखंडचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. याचा निर्णय आज डेहराडूनमध्ये होणाऱ्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत घेतला जाणार आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची मुख्यमंत्र्यांबाबत महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, संघटनेचे सरचिटणीस बीएल संतोष आणि राज्याचे केंद्रीय निवडणूक प्रभारी प्रल्हाद जोशी उपस्थित होते. धामी, प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक, माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत, ज्येष्ठ नेते सतपाल महाराज, माजी केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्याशी या नेत्यांमध्ये चर्चा झाली. उत्तराखंडमध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळाले पण मुख्यमंत्री धामी यांना खतिमा यांच्याकडून पराभवाला सामोरं जावं लागलं. अशा स्थितीत सरकारचे नेतृत्व कोण करणार, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
गोवा
आज गोव्यात भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असून, शपथविधीची तारीखही ठरवली जाणार आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. गोव्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी प्रमोद सावंत आणि विश्वजित राणे हे प्रमुख दावेदार मानले जात आहेत.
मणिपूर
मणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांवरील सस्पेन्स संपला आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या काल झालेल्या बैठकीत एन बिरेन सिंग यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. सिंग हे सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत केंद्रीय निरीक्षक निर्मला सीतारामन आणि सह-पर्यवेक्षक किरेन रिजिजू उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या: