Manipur Violence : मणिपूर महिला विवस्त्र धिंड व्हिडीओ प्रकरणी दोन जण ताब्यात, इतरांचा शोध सुरू
Manipur Violence Viral Video : मणिपूर पोलिसांनी आता व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या आरोपींचा शोध सुरू केला असून आता दोघांना ताब्यात घेऊन इतर आरोपींची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.
Manipur Women Video Case : मणिपूरमधील कांगपोकपी या ठिकाणी दोन महिलांना विवस्त्र करून धिंड काढल्याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी कुणालाही दयामाया दाखवली जाणार नाही, दोषींना शिक्षा मिळणारच असं राज्याचे मुख्यमंत्री एन बीरने सिंह यांनी सांगितलं. मणिपूर हिंसाचाराच्या वेळी एका समूदायाने दोन आदिवासी महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढली होती, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याची प्रतिक्रिया संसदेतही उलटली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेवर भाष्य करताना दोषींना सोडणार नाही असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता राज्य सरकारने आरोपींचा शोध सुरू केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून दोघांना अटक करण्यात आली असून इतर आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणी तपास सुरू असून लवकरच सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात असतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
या दोन्ही महिला कुकू समुदायाच्या आहेत. मैतई समुदायाच्या जवळपास 800 जणांच्या जमावानं या कुटुंबावर हल्लाबोल केला. त्यात या महिलेचा 19 वर्षांचा भाऊ आणि वडिलांची हत्या केली. त्यानंतर या दोन महिलांची निर्वस्त्र धिंड काढली. त्यातल्या 21 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचाही आरोप आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मणिपूरच्या या घटनेचे पडसाद पाहायला मिळाले.
मणिपूरमधील ही घटना आहे 4 मे रोजीची. पण हा व्हिडीओ व्हायरल झाला बुधवारपासून. 21 जूनला गावच्या सरपंचानं याबाबत एफआयआर दाखल केली. पण त्यालाही एक महिने उलटूनही कुठे वाच्यता झाली नव्हती. आरोपींवर कारवाई होत नव्हती. अखेर या व्हिडीओनंतर संतप्त प्रतिक्रिया देशभरातून यायला लागल्या. त्यानंतर मणिपूर सरकारला जाग आली.
Manipur Violence Viral Video : काय आहे प्रकरण?
मणिपूर हिंसाचार प्रकरणी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका जमावाने दोन महिलांना निर्वस्त्र करून रस्त्यावरून फिरवलंय. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलेलं नाही तर संबंधित महिलांवर सामूहिक बलात्कारही करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संतापाची लाट उसळलीय. मणिपूरची राजधानी इंफाळपासून 35 किलोमीटरवर कांगपोकपी जिल्ह्यात 4 मे रोजीची ही घटना आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याला कांगपोकपी पोलिसांनी अटक केलीय. दरम्यान याचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करु नका असं आवाहन केंद्र सरकारने केलंय. तसंच जर कुणी व्हिडीओ व्हायरल केला तर त्याच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेशदेखील देण्यात आलेत.