(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ISRO EOS-01| इस्त्रोकडून अर्थ ऑब्जर्व्हेशन सॅटेलाईटचं यशस्वी प्रक्षेपण, आता आंतराळातूनही शत्रूवर नजर शक्य
चीनसोबत सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या उपग्रहाच्या प्रक्षेपणामुळे भारतीय लष्कराची क्षमता वाढणार आहे. तसेच देशांतर्गत दहशतवाद्यांच्या कारवायांवरही नजर ठेवणे शक्य होणार आहे.
श्रीहरिकोटा: इस्त्रोने EOS-01 अर्थ ऑब्जर्वेशन सॅटेलाईट आज यशस्वी प्रक्षेपण केले आहे. आजचे इस्त्रोचे हे प्रक्षेपण या वर्षीचे पहिलेच प्रक्षेपण आहे. सतीश धवन स्पेस सेंटर मधून PSLV-C49 रॉकेटच्या माध्यमातून भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजून 2 मिनिटांनी या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. याच्यासोबत विदेशी उपग्रहांचेदेखील प्रक्षेपण करण्यात आले आहे. उपग्रहांचे थेट प्रक्षेपण इस्त्रोच्या वेबसाईट, युट्युब, फेसबुक आणि ट्विटर चॅनेलवरुन करण्यात आले होते.
#PSLVC49 lifts off successfully from Satish Dhawan Space Centre, Sriharikota#ISRO #EOS01 pic.twitter.com/dWCBbKty8F
— ISRO (@isro) November 7, 2020
26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर अशा प्रकारच्या दहशतवादी कृत्यांवर तसेच देशातील अन्य काही ठिकाणांवर लक्ष ठेवण्यासाठी हाय रिझोल्यूशनची सुविधा असणाऱ्या उपग्रहाची देशाला गरज होती.
EOS-01उपग्रह हा शत्रू राष्ट्रावर नजर ठेवण्यायसाठी उपयुक्त ठरेल. याच्या सिंथेटिक अॅपर्चर रडाराच्या माध्य़मातून दिवसा तसेच रात्रीच्या वेळीही आणि कोणत्याही हंगामात शत्रूच्या हालचालीवर नजर ठेवण्यात येणार आहे. तसेच हा उपग्रह ढगांच्या अडथळ्यांना भेदून हाय रिझोल्युशनचे फोटो घ्यायला सक्षम आहे. त्यामुळे लष्कराच्या क्षमतेत वाढ होणार आहे. पाकिस्तान सोबत आता चीनच्या कुरापतीही भारतासाठी डोकेदुखी ठरल्या होत्या. या पार्श्वभूमीवर भारतासाठी हा उपग्रह अनेक अर्थानी फायदेशीर ठरणार आहे. भारत-चीनच्या सीमेवर नजर ठेवण्यासाठी या उपग्रहाचा उपयोग चांगल्या पध्दतीने होऊ शकतो. त्याचबरोबर कृषी, वने, भूविज्ञान या क्षेत्रात तसेच किनारी भागातील सुरक्षा मजबुत करण्यासाठीही होणार आहे.
आज प्रक्षेपित करण्यात आलेला उपग्रह हा या सीरीजमधील पाचवा उपग्रह आहे. हा उपग्रह याआधी रिसॅट म्हणून ओळखला जायचा. यापुर्वीचा चौथा उपग्रह गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये प्रक्षेपित करण्यात आला होता.
इस्त्रोचे अध्यक्ष के सिवन यांनी म्हटले की, कोरोनाच्या काळातही सुरक्षेचे सर्व नियम पाळून आणि गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता इस्त्रोच्या टीमने हे यश संपादन केलंय. हे मिशन इस्त्रोसाठी खूप महत्वाचे आहे. इस्त्रोच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करता येत नाही. प्रत्येकाला लॅबमध्ये उपस्थित रहावे लागते. अशा परिस्थितीतही कर्मचारी काम करत आहेत ही कौतुकाची बाब आहे.
महत्वाच्या बातम्या:
भारताचा हा 'तिसरा डोळा' ठेवणार आता शत्रूच्या हालचालीवर नजर, ISRO करणार EOS-01 उपग्रहाचे प्रक्षेपण
2021 च्या सुरूवातीला लॉन्च होणार चांद्रयान-3
सिग्नलवर शिकणारी मुलं जाणार इस्रोला, जगण्याची भ्रांत असलेल्या मुलांचा प्रेरक प्रवास