Aurangabad News: औरंगाबाद शहरातील वर्दळीच्या शहागंज परिसरातील अतिक्रमणावर महापालिकेने फिरवला जेसीबी
Aurangabad News: काही व्यापाऱ्यांनी सार्वजनिक रस्त्यावर दहा बाय दहा, दहा बाय पंधरा या आकाराचे पत्र्याचे शेड उभारून अतिक्रमण केले होते.

Aurangabad News: औरंगाबादच्या (Aurangabad) वर्दळीच्या शहागंज परिसरात गेल्या काही वर्षात मोठ्याप्रमाणावर अतिक्रमण (Encroachment) झाल्याने रस्ता छोटा झाला होता. त्यामुळे वाहनधारकांना नेहमीच त्रास सहन करावा लागत होता. मात्र अखेर औरंगाबाद महापालिकेच्या (Aurangabad Municipal Corporation) वतीने मंगळवारी शहागंज भाजीमंडई भागात अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात आली. या ठिकाणी काही व्यापाऱ्यांनी सार्वजनिक रस्त्यावर दहा बाय दहा, दहा बाय पंधरा या आकाराचे पत्र्याचे शेड उभारून अतिक्रमण केले होते. हे सर्व शेड उखडून टाकत 50 फूट रस्ता मोकळा करण्यात आला आहे. महानगरपालिकेने या कारवाईची माहिती दिली आहे.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहागंज येथील मुख्य रस्ता दुर्गाप्रसाद आरोग्यधाम येथून कारवाईला सुरुवात झाली. नागरिकांनी केलेले शेड आणि जमिनीलगतचे सिमेंट बांधकाम, ओटे उखडून टाकण्यात आले. याआधी हा रस्ता फक्त दहा फूटच राहिला होता. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. जेसीबीच्या साह्याने ओटे, अतिक्रमणे काढून हा सर्व रस्ता मोकळा करण्यात आला. सुरुवातीला काही व्यापाऱ्यांनी कारवाईला विरोध केला, परंतु सिटी चौक पोलिसांना बोलावून ही कारवाई पुन्हा सुरू करण्यात आली. या रस्त्यावर एकूण 40 ते 50 अतिक्रमण धारक होते. यांमध्ये ड्रायफूट विक्रेते, चिकन आणि बकरा मटन विक्रते, तसेच भाजी विक्रेते यांचे अतिक्रमण होते. ही सर्व अतिक्रमण मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने काढले आहेत.
व्यापाऱ्यांनी विरोध केल्याने पोलिसांना करावे लागले पाचारण
शहागंज भाजीमंडई भागात करण्यात आलेले अतिक्रमण काढण्याबाबत तीनवेळा यापूर्वी प्रशासनाने आदेशित केले होते. त्यावेळी व्यापाऱ्यांनी तोंडी विनंती करून वेळ मागून घेतला होता. परंतु त्यानंतर देखील अतिक्रमण काढले नव्हते. त्यामुळे अखेर मंगळवारी महानगरपालिकेने थेट जेसीबी नेत सर्व अतिक्रमण काढून घेतले. यावेळी सुरुवातीला काही व्यापाऱ्यांनी कारवाईला विरोध केला. त्यांना समजून सांगितल्यावर देखील ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे अखेर सिटी चौक पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलीस येताच व्यापाऱ्यांनी नरमाईची भूमिका घेतली आणि अखेर अतिक्रमण काढण्यात आले.
फिश मार्केटही मोकळा
याच भागात महानगरपालिकेने जवळपास दोन कोटी रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय धर्तीवर फिश मार्केट तयार केले आहे. या फिश मार्केट लगतसुद्धा काही व्यापाऱ्यांनी अतिक्रमण करून आपली दुकाने थाटली होती. तेही अतिक्रमण जेसीबीच्या साह्याने काढण्यात आले. आता शहागंजपासून स्टेट टॉकीजकडे जाणारा 50 फुटांचा रस्ता मोकळा झाला आहे. महाराष्ट्र हिंदी विद्यालयाशेजारील 30 बाय 10 ची दुकानांचे अतिक्रमणही काढण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
