Shirdi News : शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे वर्षाला वाचणार 20 कोटी रुपये, जाणून घ्या नेमकी कशी होणार बचत?
Shirdi News : देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत देवस्थान, अशी शिर्डीच्या साई मंदिराची ओळख आहे. साईबाबा संस्थानची आता वर्षाला तब्बल 20 कोटींची बचत होणार आहे.
शिर्डी : अवघ्या जगाला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणारे शिर्डीचे साईबाबा (Shirdi Saibaba). केवळ देशच नव्हे तर विदेशातून साईभक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात. साई मंदिर परिसरासह भक्तनिवास, प्रसादालय, साईबाबा हॉस्पिटल अशा विविध इमारतींची साई भक्तांसाठी निर्मिती करण्यात आली असून वर्षाकाठी तब्बल वीस कोटींचा खर्च साईबाबा संस्थानला विज बिलासाठी (Electricity Bill) येतो. मात्र, आता साईबाबा संस्थान (Saibaba Sansthan) वीज निर्मितीत स्वयंपूर्ण होणार असून पर्यावरणपूरक अशा सोलरच्या व पवनचक्कीच्या माध्यमातून आठ मेगावॅट वीज निर्मित होणार आहे. यामुळे साईबाबा संस्थानच्या तब्बल वीस कोटी रुपयांची वर्षाला बचत होणार असून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार कदाचित राज्यातील हे पहिलं तीर्थक्षेत्र ठरेल.
देश विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून साईबाबांकडे पाहिलं जातं. देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत देवस्थान अशी सुद्धा साई मंदिराची ओळख आहे. साईबाबा संस्थान अंतर्गत साई मंदिर, भक्तनिवास, हॉस्पिटल व प्रसादालय अशा विविध इमारती येतात. या सर्व ठिकाणी लागणारी वीज ही महावितरण कडूनच येते. मात्र, काही वर्षांपूर्वी साईबाबा संस्थानच्या मार्फत पारनेर तालुक्यातील सुपा येथे दोन पवनचक्की प्रकल्प उभारण्यात आला. तर त्यानंतर प्रसादालयाची इमारत पूर्णतः सोलरवर आधारित करण्यात आली.
शिर्डी साईबाबा संस्थान वीजनिर्मितीत होणार स्वयंपूर्ण
साईबाबा संस्थानला आठ मेगावॅट विजेची गरज आहे. मात्र सद्यस्थितीत चार मेगाव्हेट निर्मिती ही पवनचक्की व रूफटॉप सोलरमधून केली जाते. तर इतर ठिकाणी लागणारी वीज ही महावितरणकडून घेतली जाते. यासाठी वर्षाकाठी तब्बल वीस कोटींचा खर्च साईबाबा संस्थानला येतो. मात्र, काही दिवसांपूर्वीच झालेल्या महावितरण व साईबाबा संस्थानच्या बैठकीत साईबाबा संस्थान पूर्णतः स्वयंपूर्ण करण्यासाठी निर्णय घेण्यात आला. या अनुषंगाने पवनचक्कीची क्षमता वाढवणे. भक्तनिवास आणि रुग्णालयाच्या इमारतीवर सोलर युनिटबसून वीज निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वर्षाला तब्बल 20 कोटींची बचत
पुढील काही दिवसात या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार असून काम पूर्ण झाल्यावर साईबाबा संस्थानची तब्बल वीस कोटी रुपयांची वर्षाकाठी बचत होणार आहे. साईबाबा संस्थान वीज निर्मितीत स्वयंपूर्ण झाल्यानंतर शहरासाठी देखील महावितरणच्या वतीने सर्वे केला जाणार असून पूर्ण शहर पर्यावरणपूरक अशा सोलरवर करण्याचा मानस आहे. विजेच्या बाबतीत आठ मेगावॅट वीज निर्मिती करून साईबाबा संस्थान हे तीर्थक्षेत्र स्वयंपूर्ण होणार राज्यातील पहिला देवस्थान ठरेल या शंका नाही.
आणखी वाचा
शिर्डी विमानतळाला जंगम मालमत्ता जप्तीचं वॉरंट, थकबाकी वसुलीसाठी काकडी ग्रामपंचायतीकडून कारवाई