Health Tips : वयाच्या साठीतही सांधे आणि स्नायूंचं दुखणं दूर राहील; 'ही' योगासनं रोज काही मिनिटं करा
Health Tips : वाढत्या वयाबरोबर निर्माण होणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष केले तर कधी कधी परिस्थिती बिघडते. यापैकी एक म्हणजे सांधेदुखीची समस्या.
Health Tips : वाढत्या वयानुसार, स्नायू आणि सांधेदुखीची समस्या वृद्धांमध्ये वाढत जाते. अनेकदा या समस्येमुळे त्यांना बसताना, उठतानाही त्रास होतो. अशा वेळी जर तुम्ही रोज काही मिनिटं योगासने केली तर वयाच्या साठीतही सांधे आणि स्नायूंचं दुखणं टाळता येऊ शकते.
खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयी आणि योगासनं यांचा जर तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनश्चर्येत समावेश केला तर वयानंतरही निरोगी आणि वेदनामुक्त जीवन जगता येते. या ठिकाणी अशाच काही योगासनांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
ताडासनामुळे स्नायूंच्या दुखण्यापासून आराम मिळेल
हे आसन करणे अगदी सोपे आणि लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी फायदेशीर आहे. यासाठी पाठ सरळ राहील अशा प्रकारे जमिनीवर उभे राहा आणि त्यानंतर हात वर करून हलके स्ट्रेच करा. या स्थितीत, 8 ते 9 वेळा दीर्घ श्वास घ्या. काही सेकंद श्वास रोखून धरा. त्यानंतर पुन्हा पूर्व स्थितीत या. हे आसन दोन ते तीन वेळा करा.
बालासन केल्याने आराम मिळेल
म्हातारपणात रोज बालासनाचा सराव केल्याने खूप फायदा होतो. पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासोबतच मनालाही शांत ठेवते आणि स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीदरम्यान होणाऱ्या समस्यांवरही ते फायदेशीर ठरते. या आसनामुळे गुडघे, घोटे आणि पाठीचे स्नायू ताणले जातात.
हे आसन करण्यासाठी दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून शरीराचा भार टाचांवर ठेवून बसा. या दरम्यान, दोन्ही टाच जवळ ठेवा. आता आरामात पुढे वाकून आपले डोके जमिनीवर ठेवा आणि हात पुढे ठेवा. या स्थितीत आराम करताना 20 ते 30 सेकंद आसन धरून ठेवा. या आसनाच्या 3 ते 4 फेऱ्या करता येतात.
पवनमुक्तासन तुमची पाठ आणि कंबर निरोगी ठेवेल
वाढत्या वयाबरोबर पाठ आणि कंबरदुखीची समस्या सामान्य आहे. त्याचबरोबर लोकांना बद्धकोष्ठता आणि गॅस सारख्या समस्यांनाही सामोरे जावे लागते. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी पवनमुक्तासन हे एक उत्तम योगासन आहे. हे आसन करण्यासाठी सर्वात आधी, योगा मॅटवर पाठीवर झोपा आणि दीर्घ श्वास घ्या. आता हळूहळू श्वास सोडत दोन्ही पायांचे गुडघे वाकवून पोटाच्या दिशेने आणा आणि हातांनी धरा. काही सेकंद धरा आणि जुन्या स्थितीत परत या.
रोज काही मिनिटे प्राणायाम करा
वाढत्या प्रदूषणामुळे लहान वयातच श्वसनाच्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. त्यामुळे अनुलोम-विलोम, भस्त्रिका असे प्राणायाम रोज केले पाहिजेत. हे तुमच्या फुफ्फुसांची क्षमता वाढवून त्यांना निरोगी ठेवतात.
जेवणानंतर वज्रासन करा
वाढत्या वयाबरोबर खराब पचन ही देखील एक सामान्य समस्या आहे. यासाठी दररोज जेवल्यानंतर काही वेळ फिरणे आवश्यक मानले जाते. जर तुम्ही बाहेर जाऊ शकत नसाल तर घरी काही मिनिटे वज्रासनात बसावे. ही योगासने दैनंदिन दिनचर्यामध्ये सकाळी करता येतात आणि जेवल्यानंतरही करता येतात.
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या बातम्या :