(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tejashri Pradhan : 'प्रेमाची गोष्ट'; 'पंचक' आणि आता 'लोकशाही'; महाराष्ट्राची लाडकी सून बॉक्स ऑफिसवर उडवणार धुरळा
Tejashri Pradhan : छोट्या पडद्यावरील लाडकी सून तेजश्री प्रधान 2024 मध्ये बॉक्स ऑफिस गाजवणार आहे.
Tejashri Pradhan : अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या कलाकृतींची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत असतात. 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Gosht) या मालिकेच्या माध्यमातून तेजश्रीने 2023 मध्ये छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. आता 2024 ची सुरुवातही तिने धमाकेदार केली आहे.
तेजश्री प्रधानची 'प्रेमाची गोष्ट'
तेजश्री प्रधानने 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेच्या माध्यमातून 2023 मध्ये छोट्या पडद्यावर कमबॅक केलं. तिची ही मालिका टीआरपीच्या शर्यतीतदेखील अव्वल आहे. सर्वत्र या मालिकेची चर्चा आहे. मालिकेचं वेगळं कथानक प्रेक्षकांना भावलं आहे. एकंदरीतच तेजश्रीचं कमबॅक यशस्वी ठरलं आहे.
तेजश्री गाजवणार रुपेरी पडदा
तेजश्री प्रधानने मालिकांसह सिनेमांतही काम केलं आहे. तिचे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले आहेत. 'ओलीसुकी','झेंडा','तिची कथा','ती सध्या काय करते','डॉ. प्रकाश बाबा आमटे','लग्न पहावे करुन',शर्यत' अशा अनेक सिनेमांत तेजश्रीने काम केलं आहे.
View this post on Instagram
'ओलीसुकी'नंतर नववर्षात तेजश्री 'पंचक' (Panchak) या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. 'पंचक' या सिनेमात तेजश्रीची भूमिका छोटी असली तरी महत्त्वाची आहे. त्यातच माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) निर्मित सिनेमात तिला अभिनय करता आला. त्यामुळे नक्कीच हा सिनेमा तिच्यासाठी खूप खास आहे.
तेजश्री प्रधान बॉक्स ऑफिसवर उडवणार धुरळा
'पंचक' या सिनेमानंतर तेजश्री आता 'लोकशाही' (Lokshahi) या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेप्रेक्षकांमध्ये या सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. 9 फेब्रुवारी 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तेजश्री सामाजिक कार्यकर्ती आणि राजकीय घराण्यातील वारसदार इरावती चित्रे नामक पात्र साकारणार आहे.
प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचवणारा 'लोकशाही' सिनेमा संजय अमर यांनी दिग्दर्शित केला असून सिनेमा 9 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 'लोकशाही' सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना सिनेमागृहात महाभारतातील पात्रे आणि त्यांच्या सत्ता संघर्षासारखाच आजच्या कलियुगातील माणसांच्या राजकारण आणि राजघराण्यातील सत्तासंघर्षाचा विलक्षण अनुभव घेता येणार आहे. 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेआधी तेजश्रीने ह्या गोजिरवाण्या घरात, तुझंनी माझं घर श्रीमंताचं, लेक लाडकी ह्या घरची, अग्गंबाई सासूबाई, फुलाला सुगंध मातीचा या मालिकांमध्ये काम केलं आहे.
संबंधित बातम्या