Jhimma Marathi Movie: 19 नोव्हेंबरपासून चित्रपटगृहात रंगणार 'झिम्मा'चा खेळ
येत्या 19 नोव्हेंबरला 'झिम्मा' सिनेमा प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन पाहता येणार आहे. चित्रपटगृहे सुरू झाल्यापासून चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणारा 'झिम्मा' हा मराठीतील पहिला चित्रपट आहे.
Jhimma Marathi Movie: चित्रपटगृहे प्रदर्शित झाल्यापासून बॉलिवूडसह मराठीतील बिग बगेट सिनेमांनी आपल्या चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तारखा प्रदर्शित केल्या आहेत. चित्रपटगृहे सुरू झाल्यापासून चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणारा 'झिम्मा' हा मराठीतील पहिला चित्रपट आहे. त्यामुळे मराठी सिनेप्रेक्षकांना आता लवकरच सिनेमागृहात जाऊन झिम्माच्या खेळात सहभागी होता येणार आहे.
येत्या 19 नोव्हेंबरला 'झिम्मा' सिनेमा प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन पाहता येणार आहे. या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले आहे. अमितराज यांनी या चित्रपटाचे संगीत केले आहे. तर छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे. चलचित्र कंपनी प्रस्तुत अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि क्रेझी प्यू फिल्मस निर्मित 'झिम्मा' हा सिनेमा आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, छोटी सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले या अभिनेत्रींच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे विविध वयोगटातील अभिनेत्रींनी नटलेला हा चित्रपट असणार आहे. या सर्व अभिनेत्रींसोबत चित्रपटाची शान वाढवायला चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकरदेखील दिसणार आहे.
क्षिती जोग चित्रपटात अभिनेत्री म्हणून भेटीला येणारच आहे. परंतू क्षितीसह स्वाती खोपकर, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, अनुपम मिश्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. वेगवेगळ्या पाश्वभूमी, व्यक्तिमत्तव असलेल्या स्त्रिया जेव्हा आपल्या सर्व जबाबदाऱ्या बाजूला ठेऊन आपले आयुष्य मनमुराद जगण्यासाठी एकत्र येतात तेव्हा जी धमाल होते, ती 'झिम्मा' या चित्रपटात दाखविण्यात आली आहे.
'झिम्मा' चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले आहे. आंतरराष्टूीय महिला दिनाच्या निमित्ताने 'झिम्मा' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. या धमाकेदार टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवून ठेवली होती. पण सिनेमागृहे बंद असल्याने चित्रपट प्रदर्शित झाला नव्हता. आता सिनेमागृहे पुन्हा सुरू होणार असल्याने प्रेक्षकांना आता 'झिम्मा'चा मनमुराद आनंद घेता येणार आहे.
झिम्मानंतर आता अनेक मराठी सिनेमे प्रेक्षकांना सिनेमागृहात पाहता येणार आहेत. मराठीतील अनेक बिग बजेट सिनेमांचा यात समावेश आहे. प्रेक्षकांना आता उत्तम कथानक आणि सादरीकरण असलेले सिनेमे पाहता येणार आहेत.