Colours Marathi New Serial Baipan Zindabad: आठ दिग्गज अभिनेत्री साजरा करणार 'स्त्रीत्वाचा उत्सव'; छोट्या पडद्यावर येतेय नवीकोरी मराठी मालिका, कधी, कुठे पाहाल?
Colours Marathi New Serial Baipan Zindabad: कलर्स मराठी नेहमीच आपल्या प्रेक्षकांच्या मनाला भिडणाऱ्या आणि समाजाचं वास्तव दाखवणाऱ्या कथा सादर करत आलं आहे. आता घेऊन येत आहे एक सशक्त अँथॉलॉजी मालिका - 'बाईपण जिंदाबाद'.

Colours Marathi New Serial Baipan Zindabad: सध्या छोट्या पडद्यावर अनेक नवनव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यापैकी अनेक मालिका कित्येक वर्ष प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. सामाजिक, ऐतिहासिक, कौंटुंबिक विषयावर अनेक मालिका येत असतात. अशातच आता एक नवी मालिका कलर्स मराठीवर (Colours Marathi) येत आहे. 'बाईपण जिंदाबाद' (Baipan Zindabad) असं या मालिकेचं नाव असून 26 ऑक्टोबरपासून ही मालिका प्रसारित केली जाणार आहे.
कलर्स मराठी नेहमीच आपल्या प्रेक्षकांच्या मनाला भिडणाऱ्या आणि समाजाचं वास्तव दाखवणाऱ्या कथा सादर करत आलं आहे. आता घेऊन येत आहे एक सशक्त अँथॉलॉजी मालिका - 'बाईपण जिंदाबाद', जी स्त्रीच्या असंख्य रूपांना, तिच्या त्यागाला, संघर्षाला आणि सामर्थ्याला सलाम करणार आहे. ती आई आहे, जी मुलांच्या आनंदात स्वतःचं आयुष्य शोधते, ती पत्नी आहे जी पतीच्या प्रत्येक संकटात खंबीर उभी राहते, ती सून आहे जी नव्या घरात रुजते, आणि ती मुलगी आहे जी आईवडिलांचं जग उजळवते. ती प्रेम, त्याग, सहनशीलता आणि सामर्थ्याचं मूर्त रूप आहे… पण या सगळ्याच्या पलीकडे ती स्वतः आहे: विचारशील, संवेदनशील आणि ठाम. तिच्या आयुष्यातील तुटलेल्या स्वप्नांपासून नव्यानं उभं राहण्यापर्यंतचा प्रवास ही मालिका दाखवेल. कारण ती फक्त घर नाही सांभाळत, ती संपूर्ण जग सांभाळते. तिच्या या सामर्थ्याचा, तिच्या बाईपणाचा उत्सव म्हणजेच 'बाईपण जिंदाबाद!'
'बाईपण जिंदाबाद!'मध्ये मराठी अभिनेत्री सुकन्या मोने, शुभांगी गोखले, सुचित्रा बांदेकर, क्रांती रेडकर, शलाका पवार, दीपा परब, उर्मिला कोठारे आणि प्रार्थना बेहेरे झळकणार आहेत. या सर्वजणी एका समान सूत्रानं जोडल्या गेल्या आहेत, 'स्त्रीत्वाचा उत्सव'. प्रत्येक अभिनेत्री आपल्या व्यक्तिरेखेतून वेगवेगळ्या भावनांना आकार देते. कधी संघर्षाची कहाणी सांगते, कधी सोडून देण्याचं धैर्य दाखवते, तर कधी जगण्याचा नवा अर्थ शोधते. ही मालिका प्रत्येक मराठी स्त्रीला स्वतःचा आरसा दाखवणारा प्रयत्न आहे. आईपणाचं उबदारपण, पत्नीपणाचं ओझं आणि 'स्वतः' असण्याची धडपड या मालिकेच्या प्रत्येक भागात जिवंत होते. मालिकेची पहिली कथा 'असिस्टंट माझी लाडकी' ही स्वप्नाळू माधवी (सुकन्या कुलकर्णी मोने) हिची आहे, जी एका वर्कहोलिक बॉसकडे (प्रार्थना बेहेरे) असिस्टंट म्हणून काम करते. वर्कहोलिक बॉस आणि तिची नवी असिस्टंट एकमेकांना तोडीस तोड ठरणार की, त्यांच्यात एक छान मैत्रीचं नातं निर्माण होणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
View this post on Instagram
'बाईपण जिंदाबाद'च्या प्रत्येक कथेतून स्त्रीचं अंतर्मन, तिचं धैर्य, आत्मसन्मान आणि स्वतःचा आवाज पुन्हा शोधण्याचा प्रवास दिसतो. समाजाच्या चौकटीत न अडकता ती स्वतःच्या पद्धतीनं जगण्याचा हक्क मिळवते. तिचं बाईपण म्हणजे, फक्त नात्यांचं ओझं नव्हे, तर प्रेम, जीवनसृजन आणि आत्मभानाचं प्रतीक आहे. ही मालिका स्त्रीच्या अश्रूंमागचं सामर्थ्य, शांततेतील आवाज आणि हसण्यातली जिद्द दाखवणारी हृदयस्पर्शी सफर आहे. कलर्स मराठीची ही नवी मालिका सांगते "ती फक्त जगत नाही, ती जीवन घडवते... तिचं बायपण खरंच भारी आहे."


















