Mili : '20 दिवस उणे 15 डीग्री फ्रीजरमध्ये...' जान्हवी कपूरसाठी 'मिली'ची भूमिका किती कठीण होती?
Janhvi kapoor : मिली या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून हा चित्रपट 4 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून जान्हवी कपूर तिच्या आगामी 'मिली' चित्रपटामुळे चर्चेत आहे. 15 ऑक्टोबरला मिलीचा ट्रेलर रिलीज झाला होता, ज्यामध्ये जान्हवीची व्यक्तिरेखा पाहून सगळेच थक्क झाले. जान्हवी कपूरचा 'मिली' हा चित्रपट येत्या 4 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. दरम्यान, ही भूमिका किती कठीण होती हे जान्हवी कपूरने सांगितलं आहे.
या चित्रपटाच्या टीझर पाहिला असता त्यामध्ये जान्हवी फ्रीझर रूममध्ये बंद असलेल्या मायनस डिग्री तापमानात जगण्यासाठी संघर्ष करताना दिसते. ट्रेलर लॉन्चनंतर या चित्रपटाबद्दल बोलताना जान्हवीने यावर खुलासा केला. जान्हवीने हा चित्रपट मायनस डिग्रीमध्ये शूट केला आहे. त्याचबरोबर एक अभिनेत्री म्हणून हा चित्रपट तिच्यासाठी किती आव्हानात्मक होता हे तिने सांगितले आहे.
अलीकडेच जान्हवी कपूरने या चित्रपटाशी संबंधित पापाराझींच्या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. तिला विचारण्यात आलं की, एक अभिनेत्री म्हणून मिलीची भूमिका तिच्यासाठी किती आव्हानात्मक होते? या प्रश्नाला उत्तर देताना जान्हवी म्हणाली की, "हे खूप आव्हानात्मक होतं, जर मी तुम्हाला उणे 15 डिग्रीच्या फ्रीजरमध्ये 20 दिवस बंद केले तर ते आव्हानात्मक असणारच ना? आणि माझ्यासाठी ते आव्हानात्मक होतं."
'धडक' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर जान्हवी कपूरने अत्यंत कमी कालावधीत इंडस्ट्रीमध्ये तसेच लोकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहे. त्याचवेळी जान्हवी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेचा भाग असते.
ट्रेलर रिलीज झाल्यापासून 'मिली'बद्दल लोकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. जान्हवी कपूरशिवाय 'मिली' चित्रपटात सनी कौशलदेखील तिच्या प्रियकराच्या भूमिकेत तर मनोज पाहवा तिच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. हसलीन कौर, राजेश जैस या कलाकारांनी देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपटाची कथा‘मिली नौडियाल’या मुलीची आहे जी एका फ्रिजर रुममध्ये अडकते. जिवंत राहण्यासाठी मिली धडपडते.
मिली हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या हेलन या मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मथुकुट्टी झेवियर यांनी केले होते. जान्हवी कपूरचे वडील आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते बोनी कपूर यांच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
प्रदर्शित झाल्यानंतर 'मिली'ची जादू चालणार का? जान्हवी कपूर आपल्या अभिनयाची छाप सोडणार का? या प्रश्नांची उत्तरं आता 4 नोव्हेंबरलाच मिळतील.