Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार?
Ratnagiri News : बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या जुन्या शिवसैनिकांच्या सूचना ऐकल्या जात नाहीत असं म्हणत आमदार भास्कर जाधव यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.
रत्नागिरी : आपल्या रोखठोक भूमिकेने कायम चर्चेत असणारं एक मोठं नाव म्हणजे भास्करराव जाधव. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल ज्यांनी विझू दिली नाही, त्या खंद्या पाठीराख्या भास्कर जाधवांनी चिपळूणमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पक्षाला घरचा आहेर दिला. शिवसेनेची जवळ जवळ काँग्रेस झाली आहे, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या जुन्या शिवसैनिकांच्या सूचना ऐकल्या जात नाहीत असं भास्कर जाधव म्हणाले. यासंबंधित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जे पदाधिकारी काम करत नाहीत त्यांना बाजूला करायची आमच्यात हिंमत नाही. काम न करणाऱ्याला तो नाराज होऊ नये म्हणून दुसरं पद दिलं जातं असा आरोपही यावेळी भास्कर जाधव यांनी केला. पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर भास्कर जाधव यांची तीव्र नाराजी व्यक्त केली. शाखा प्रमुख, तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुख यांचा कार्यकाळ निश्चित करा अशी मागणी यावेळी त्यांनी केली. यावेळी मंचावर सचिव विनायक राऊत यांच्यासह जिल्हा प्रमुख संजय कदम हेदेखील उपस्थित होते.
याच सगळ्या पार्श्वभूमीवर पक्षातील ज्येष्ठ नेते विनायक राऊतांनी जाधवांचा मुद्दा योग्य होता असं म्हटलं. तर पक्ष अडचणीत असताना थोडं संयमानं घेण्याची सूचना संजय राऊतांनी केली.
उदय सामंतांची भास्कर जाधवांना खुली ऑफर
एकीकडे दोन्ही राऊत बाजू सावरत असताना दुसरीकडे उदय सामंत यांनी मात्र भास्कर जाधवांना शिंदे गटात येण्यासाठी खुली ऑफरच देऊन टाकली. भास्कर जाधव सिनियर नेते आहेत. भास्कर जाधवांना शिवसेनेत घ्यायचं की नाही हा निर्णय शिंदे साहेब घेतील. पण मी सांगतो ते खूप मोठे नेते आहेत. आम्हाला ते आमच्या पक्षात आले तर आवडेल असं उदय सामंत यांनी म्हटलं.
शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कोकणात विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा फटका बसला. भास्कर जाधव यांनी अनेकवेळा पक्षासंदर्भात आपली नाराजी बोलून दाखवली आहे. आताही पदाधिकारी बैठकीत जाधवांनी आपल्या मनातील सल बाहेर काढली.
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या जुन्या शिवसैनिकांच्या सूचना ऐकल्या जात नाहीत, शिवसेनेची जवळ जवळ काँग्रेस झाली आहे असं भास्कर जाधव म्हणाले. इतकंच नव्हे तर जाधवांनी निवडणुकीवेळच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही तीव्र नाराजी व्यक्त केली.
शिवसेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार?
गेल्या काही दिवसात शिवसेनेत धूसफूस असल्याच्या चर्चा सातत्यानं समोर येत आहेत. रत्नागिरीच्या राजापूरमधील राजन साळवींच्या नाराजीची चर्चा असो, किंवा मग महाविकास आघाडी सोडून स्वबळाची भाषा करणारी वक्तव्यं असोत. त्यामुळे आता शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर चांद्यापासून बांद्यापर्यंत आता उद्धव ठाकरे सेनेचे काय होणार हा प्रश्न आपसूक चर्चेत येतोच. अशातच आता आता पक्षातूनच आवाज उठत असल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.