´गांधी´साठी सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनरचा ऑस्कर जिंकणार्या भानू अथैय्या यांचं निधन
भानु अथैय्या या पहिल्या भारतीय आहेत, ज्यांना चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला होता.1982 मध्ये रिचर्ड अँटेनबरोच्या जगप्रसिद्ध चित्रपट 'गांधी'साठी सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइनरचा पुरस्कार अथैया यांना मिळाला होता.भानू अथैय्या मूळच्या कोल्हापूरच्या असून त्यांचं नाव भानुप्रिया राजपक्षे असं आहे.
मुंबई : 1982 मध्ये रिचर्ड अँटेनबरोच्या जगप्रसिद्ध चित्रपट 'गांधी'साठी सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइनरचा पुरस्कार जिंकणार्या भानु अथैय्या यांचे मुंबईतील कुलाबा येथील घरी दीर्घ आजाराने निधन झाले. त्या 91 वर्षांच्या होत्या. भानू अथैय्या मूळच्या कोल्हापूरच्या असून त्यांचं नाव भानुप्रिया राजपक्षे असं आहे.
भानु अथैय्या आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑस्कर पुरस्काराने सन्मानित झालेले पहिले भारतीय व्यक्तिमत्व होते. 'गांधी' चित्रपटासाठी वेशभूषा डिझाईनर म्हणून त्यांनी जॉन मोलो यांच्यासमवेत सर्वोत्कृष्ट वेशभूषा डिझाइनरचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटाला एकूण आठ ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
भानु अथैय्या यांची मुलगी राधिका गुप्ता यांनी एबीपी न्यूजला आईच्या मृत्यूची माहिती देताना सांगितले की, “2012 मध्ये आईला ब्रेन ट्यूमर झाला होता, पण त्यावेळी तिने शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला होता. तर 2015 मध्ये तिला अर्धांगवायू झटका आला. तेव्हापासून तिचे चालणे-फिरणे बंद झाले होते. आज सकाळी आई झोपेत असताना तिचा मृत्यू झाला. तिचा मृत्यू झाला तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारची शांतता होती. विशेष म्हणजे आज दुपारी चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांचे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना अल्झायमर, अजिंक्य देव यांची माहिती
हिंदी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर भानु अथैय्या यांनी 2001 मध्ये रिलीज झालेल्या 'लगान' आणि 2004 मध्ये 'स्वदेश' रिलीज साठी काम केलं होते. हे दोन्ही चित्रपट प्रख्यात दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केले होते. जवळपास दहा वर्षांनंतर त्यांनी 'सिटीझन' या मराठी चित्रपटासाठी पोशाख डिझाइन केला, हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.
विशेष म्हणजे भानु अथैय्या यांनी कॉस्च्युम डिझायनर म्हणून 1956 साली गुरू दत्त दिग्दर्शित ‘सीआयडी’ चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. यानंतर त्यांनी गुरु दत्तच्या 'प्यासा', 'चौधवी का चंद' आणि 'साहिब बीवी और गुलाम' या चित्रपटासाठी कॉस्ट्यूम डिझाइन केले. गुरु दत्त व्यतिरिक्त त्यांनी यश चोप्रा, बीआर चोप्रा, विजय आनंद यांच्यासह अनेक नामवंत चित्रपट निर्मात्यांसोबत काम केले.
1991 आणि 2002 मध्ये सर्वप्रथम कॉस्च्युम डिझाइनर म्हणून त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरविण्यात आले.