ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना अल्झायमर, अजिंक्य देव यांची माहिती
अजिंक्य देव यांची ट्वीटरवरून माहितीत्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी चाहत्यांनी प्रार्थना करावे अशी भावनिक साद.
मुंबई: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री सीमा देव या अल्झायमर या आजाराशी लढत आहेत. याबद्दलची माहिती त्यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव यांनी त्यांच्या ट्विटरवरून दिली. त्याचबरोबर सीमा देव यांच्या आरोग्याबद्दल त्यांच्या चाहत्यांनी प्रार्थना करावी अशीही भावनिक साद त्यांनी दिली. त्यांच्या या ट्विटवर अनेक चाहत्यांनी सीमा देव या लवकर बऱ्या व्हाव्यात अशा सदिच्छा व्यक्त केल्या. अभिनेते अजिंक्य देव म्हणाले की, "माझी आई श्रीमती सीमा देव मराठी फिल्मी इंडस्ट्रीतील जेष्ठ अभिनेत्री या अल्झायमरशी लढा देत आहेत. आम्ही संपूर्ण देव कुटुंबीय त्या या आजारातून लवकर बऱ्या व्हाव्या यासाठी प्रार्थना करत आहोत. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रानेही त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी."
My mother Shrimati. Seema Deo doyen of marathi film industry is suffering from Alzheimer’s we the entire Deo family have been praying for her well being wish whole of Maharashtra who loved her so much also pray for her well being 🙏@mataonline @lokmanthannews @LoksattaLive
— Ajinkkya R Deo (@Ajinkyad) October 14, 2020
78 वर्षीय सीमा देव या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री आहेत. त्यांनी आतापर्यंत 80 पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केलं आहे. काही काळानंतर त्यांनी हिंदी चित्रपटांत काम करणे बंद करून केवळ मराठी चित्रपटांत काम करायला सुरुवात केली. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळाच ठसा उमटवला आहे. सीमा देव यांचा जन्म मुंबईतील गिरगाव येथे झाला. पुढे त्यांचा विवाह अभिनेते रमेश देव यांच्याशी झाला. अभिनेते अजिंक्य देव आणि दिग्दर्शक अभिनय देव ही त्यांची अपत्यं आहेत. 2013 साली त्यांनी त्यांच्या लग्नाची पन्नाशी साजरी केली होती.
इ.स. १९५७ सालच्या 'आलिया भोगासी' या मराठी चित्रपटाद्वारे सीमा देव यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात त्यानी रमेश देव यांच्या बहिणीची भूमिका केली होती. त्यांनी भूमिका साकारलेले जगाच्या पाठीवर, मोलकरीण, यंदा कर्तव्य आहे, , या सुखांनो या, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला हे चित्रपट विशेष गाजले. 'आनंद' या अत्यंत गाजलेल्या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका आजही कायम लक्षात राहते.
2017 साली पुणे येथे झालेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (पिफमधील) पुरस्कार सोहळ्यात त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
अल्झायमर म्हणजे काय? अल्झायमर हा आजार स्मृतीशी संबंधित आजार आहे. हा एक प्रकारचा डिमेन्शियाचा म्हणजे स्मरणशक्ती कमी होण्याचा आजार आहे. यात दिवसेंदिवस स्मृती कमी कमी होत जाते. काही अल्झायमर रोगात प्रामुख्याने मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. सुरुवातीस रुग्णाला नुकत्याच घडलेल्या घटना आठवत नाहीत. काळानंतर साध्या साध्या गोष्टीही लक्षात राहत नाहीत. या रुग्णाची स्पष्टपणे विचार करण्याची क्षमता नाहीशी होते.