(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Govinda Corona Positive : बॉलिवुडकरांना कोरोनाचा विळखा; अक्षय कुमारनंतर अभिनेते गोविंदा यांनाही कोरोनाची लागण
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाल्यानंतर आता अभिनेते गोविंदा यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. गोविंदा सध्या होम क्वॉरंटाईन असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नीने कोरोनावर मात केली होती.
मुंबई : संपूर्ण जगभरात कोरोनानं हैदोस घातला आहे. देशात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. अशातच बॉलिवूडलाही कोरोनानं ग्रासलं आहे. अनेक बॉलिवूडकर कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. अभिनेता अक्षय कुमार पाठोपाठ आता प्रसिद्ध अभिनेते गोविंदा यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. गोविंदा सध्या होम क्वॉरंटाईन असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती स्वतः गोविंदा यांनी दिली आहे. मला कोरोनाची लागण झाली असून माझा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मला सौम्य लक्षणं जाणवत आहेत. कुटुंबातील इतर सर्वांची कोरोन चाचणी केली असून त्या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आली आहे. पत्नी सुनीता हिने काही दिवसांपूर्वीच कोरोनावर मात केली होती, अशी माहिती अभिनेते गोविंदा यांनी दिली आहे. तसेच माझी प्रकृती ठिक असून मी सध्या होम क्वॉरंटाईन आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची काळजी घ्यावी, अशी विनंतीही गोविंदा यांनी दिली.
बॉलिवूडमधील 'खिलाडी' अक्षय कुमारला कोरोनाची लागण
कोरोनाच्या विळख्यात आता हळूहळू बॉलिवूड सेलिब्रिटी येताना दिसत आहेत. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाली आहे. अक्षयने स्वत: ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे. अक्षय सध्या होम क्वॉरंटाईन आहे. अक्षय कुमारने ट्वीट करत सांगितलं की, आज सकाळी माझी कोविड 19 टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मी सर्व प्रोटोकॉल पाळत स्वत:ला आयसोलेट केलं आहे. मी घरी क्वॉरंटाईन झालो आहे आणि सर्व आवश्यक वैद्यकीय उपचार घेत आहे. विनंती करतो की माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी त्यांची कोरोना टेस्ट करुन घ्यावी आणि स्वत: ची काळजी घ्यावी.
दरम्यान, आलिया भट्ट, रणबीर कपूर (Ranbir Kapoor), संजय लीला भंसाळी (Sanjay Leela Bhansali), मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee), क्रिती सेनन यांच्या काही बॉलिवूड सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :