(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona Vaccination | टीव्ही इंडस्ट्रीला लस द्या; फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर्स कौन्सिलचं आरोग्यमंत्र्यांना पत्र
पुन्हा लॉकडाऊन झाला तर उभारी घेऊ पाहणाऱ्या विविध क्षेत्रांना, इंडस्ट्रीजना पुन्हा ग्रहण लागेल. हीच भीती मनोरंजनसृष्टीलाही वाटू लागली आहे.
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढल्यामुळे लॉकडाऊनच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशावेळी पुन्हा लॉकडाऊन झाला तर उभारी घेऊ पाहणाऱ्या विविध क्षेत्रांना, इंडस्ट्रीजना पुन्हा ग्रहण लागेल. हीच भीती मनोरंजनसृष्टीलाही वाटू लागली आहे.
लॉकडाऊन उठल्यानंतर पुन्हा एकदा मनोरंजनसृष्टीने भरारी घ्यायला सुरूवात केली आहे. अनेक नव्या मालिका टीव्हीवर आल्या आहेत. अनेक नव्या चित्रपटांनी आपल्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. असं असताना पुन्हा एकदा कोरोनानं आपलं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे आता पुन्हा लॉकडाऊन लागला तर मात्र मनोरंजनसृष्टीचं अर्थचक्र पुन्हा कोलमडेल. लोकांचं रंजन करण्याचा हा वसा अव्याहत सुरू रहावा म्हणून फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर्स कौन्सिलने आता पुढाकार घेतला आहे.
पहिला लॉकडाऊन सुरु असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छोट्या पडद्यासाठी होणाऱ्या चित्रिकरणाला परवानगी दिली खरी. पण आता पुन्हा एकदा ही इंडस्ट्री धास्तावली आहे. म्हणूनच खबरदारीचा उपाय म्हणून इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर्स कौन्सिलने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना एक पत्र दिलं आहे.
Lockdown | पुन्हा लॉकडाऊन नको, बॉलिवूडची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
सदर पत्रात आरोग्य मंत्र्यांना एक विनंती करण्यात आली आहे. सध्या सर्वत्र मालिकांची चित्रिकरणं चालू आहेत. या इंडस्ट्रीशी निगडित प्रत्येकाला कोव्हिडची लस दिली जावी असं यात म्हटलं आहे. आज मितीला देशात ९० मालिकांची चित्रिकरणं चालू आहेत. या सर्वांत मिळून जवळपास 15 हजार कलाकार-तंत्रज्ञ काम करतात. त्या सर्वांचा यात समावेश होतो. या सर्वांना जर लस मिळाली, तर कोरोनाचा धोका टळेल. शिवाय कामही नीट चालू राहिल असा विश्वास या प्रोड्युसर्सना वाटतो. आज प्र्तयेक सेटवर योग्य ती खबरदारी घेऊन काम चालू आहेच. पण लस मिळाली तर आणखी जोमाने काम करता येईल असंही यांना वाटतं.
टीव्ही इंडस्ट्रीचा हा यज्ञ अहोरात्र चालू असतो. सेटवर एकदा कलाकार तंत्रज्ञ आले की ते जवळपास 12 तास सेटवर असतात. हे पत्र कौन्सिलने 31 मार्चला दिलं आहे. यावर अद्याप आरोग्यमंत्र्याकडून प्रतिसाद आलेला नाही. नियमानुसार 45 वर्षांवरच्या नागरिकांना ही लस दिली जातेच. पण मनोरंजनसृष्टीत सर्व वयोगटातली मंडळी काम करतात. त्या सर्वांनाच याचा फायदा होऊन ही इंडस्ट्री न थांबता सुरू राहील हाच यामागचा उद्देश आहे. सरकार याला कसा प्रतिसाद देतं ते येत्या काही दिवसांत कळेल.