कल्याण डोंबिवलीत 'स्थानिक' पातळीवर दिलेला पाठिंबा काढून घेण्यास राज ठाकरेंना सांगणार का? उद्धव ठाकरेंना हा प्रकार माहीत होता का, ते बोलणार का? संजय राऊत काय म्हणाले?
कल्याण डोंबिवलीत शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानंतर शिवसेना ठाकरे गटात प्रचंड नाराजी पसरली आहे. उद्धव ठाकरे सुद्धा नाराज आहेत.

Sanjay Raut: शह-काटशहाच्या राजकारणामध्ये नीतिमत्ता ओंडक्यासारखी वाहून जाऊ नये एवढंच आमचं म्हणणं आहे. कल्याण-डोंबिवलीत जे घडलं ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संदर्भात त्यांची पक्षाची भूमिका नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. स्वतः राज ठाकरे यांना सुद्धा ती भूमिका मान्य नाही, ती पक्षाची भूमिका नाही हे त्यांच्याशी चर्चा झाल्यावर आमच्या लक्षात आलं असल्याची प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली. कल्याण डोंबिवलीत शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानंतर शिवसेना ठाकरे गटात प्रचंड नाराजी पसरली आहे. उद्धव ठाकरे सुद्धा नाराज आहेत.
शिंदे गटाने महाराष्ट्राच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला
संजय राऊत म्हणाले की, तुम्हाला जर स्थानिक लोकांना अशा प्रकारची युती करायची होती, तर तुम्ही कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेनेबरोबर (ठाकरे गट) युती करायला हवी होती. आमची भूमिका कठोर आणि कडवट आहे. शिंदे गटाने महाराष्ट्राच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलेला आहे. शिंदे आणि भाजप महायुती म्हणून एकत्र येऊन सरकार बनवू शकतात, त्यांच्यात इतरांनी (मनसे) घुसायचं कारण नाही हे माझं मत आहे. ते पुढे म्हणाले की, आमच्याकडे आलेल्या अशा प्रस्तावांना आम्ही केराची टोपली दाखवतो. जिथे अत्यंत अस्थिरता आहे, तिथे आम्ही शिंदेंबरोबर कदापि जाणार नाही. जर काही पर्याय उपलब्ध असतील, तर त्या संदर्भात पक्षप्रमुख (उद्धव ठाकरे) निर्णय घेतील, पण परस्पर कोणी निर्णय घेणार नाही, असे त्यांनी सांगितले.
मिळालेले यश शिंद्यांना आणि गद्दारांना धडा शिकवण्यासाठी
ते म्हणाले की, मनसेनं घेतलेल्या स्थानिक पातळीवरील निर्णयावर भाष्य करताना राऊत म्हणाले की, "त्यांनी तो निर्णय कोणत्या पातळीवर घेतला आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे, त्याच्यावर आम्ही अंतर्गत चर्चा करू". मनसेकडून हा स्थानिक पातळीवरचा निर्णय असल्याचे सांगितले जात असले तरी, मुंबईत झालेल्या बैठकांची खडानखडा माहिती उद्धव ठाकरे यांच्याकडे पहिल्या दिवसापासून होती. लोकांच्या मनामध्ये शिंदेंविरुद्ध जो राग आहे, तो पाहिल्यावर लक्षात येईल की अशा प्रकारची कोणतीही युती मराठी माणूस मान्य करत नाही. मुंबईत शिवसेनेला मिळालेले यश हे "शिंद्यांना आणि गद्दारांना धडा शिकवण्यासाठी मिळाले आहे, असे त्यांनी नमूद केले.
इतर महत्वाच्या बातम्या




















