Shivsena : मोठी बातमी : राजूल पटेल ते प्रतिमा खोपडे, तुमच्या बंडखोरांमुळे आमचे 11 उमेदवार पडले, शिंदेसेनेने भाजपला खडसावलं, आकडेवारीच दाखवली
Shivsena : शिवसेनेला मुंबई महापालिकेत 29 जागांवर विजय मिळाला. भाजपच्या बंडखोरांमुळं शिवसेनेला फटका बसल्याचं समोर आलं आहे.

मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीत (BMC Election 2026) भाजप (BJP) आणि शिवसेनेच्या (Shivsena) युतीला बहुमत मिळालं आहे. भाजपनं 89 जागांवर विजय मिळवला तर एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेला 29 जागांवर विजय मिळाला. मुंबई महापालिकेत बहुमताचा आकडा 114 असून 118 जागांवर महायुतीला विजय मिळाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं 92 जागा लढवल्या होत्या. मात्र, मुंबई महानगर पालिकेत भाजपला बहुमत न मिळाल्याने काही नेत्यांनी शिवसेनेला सोडलेल्या 92 जागांवर बोट ठेवले जातेय. याचवेळी शिवसेनेच्या नेत्यांकडूनही भाजपच्या बंडखोरांमुळे मुंबईत 11 ठिकाणी पराभव पत्करावा लागला असा आरोप होत आहे. मुस्लीम बहुल भागात पराभव डोळ्यासमोर ठेवून त्या जागा शिवसेनेच्या माथी मारल्याचेही बोलले जात आहे.
Shivsena : शिवसेना लढत असलेल्या 30 ठिकाणी बंडखोरी
समाधान सरवणकर यांनी तर भाजप पदाधिकाऱ्यांचे व्हॉट्स अॅप चॅट समोर आणून सहकार्य न केल्याचे आरोप केले आहेत. तर प्रभाग क्रमांक 173 मधून शिवसेनेचे माजी नगरसेवक रामदास कदम यांनी कटकारस्थान करून भाजपने त्याचा उमेदवार निवडून आणल्याचा आरोप केला आहे. जागावाटपात शिवसेनेकडे गेलेल्या जवळपास 30 प्रभागांमध्ये भाजपच्या इच्छुकांनी बंडखोरी करून शिवसेनेपुढे आव्हान उभे केले होते. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांच्या विजयाची वाट खडतर झाली,असा आरोप होत असून पक्ष नेतृत्वानंही याकडे गांभीर्याने पाहावे, असे पराभूत उमेदवारांचे म्हणणे आहे.
भाजप बंडखोरांमुळं शिवसेनेला कोणत्या ठिकाणी फटका?
अंधेरी इस्ट - वॉर्ड क्रमांक 121 मध्ये शिवसेनेच्या प्रतिमा खोपडे यांचा अवघ्या 14 मतांनी पराभव झाला आहे. या प्रभागात भाजपच्या मंडल अध्यक्ष जयश्री वळवी यांनी बंडखोरी केली होती. वळवी यांनी 175 मतं घेतली आहेत.
दिंडोशी - वॉर्ड क्रमांक 41 मधून मानसी पाटील या शिवसेनेच्या उमेदवार होत्या. त्यांचा अवघ्या 596 मतांनी पराभव झाला. त्या ठिकाणी भाजपचे मंडल सचिव दिव्येश यादव यांनी बंडखोरी केली होती. त्यांना 1260 मतं मिळाली आहेत.
अणूशक्ती नगर- प्रभाग क्रमांक 143 मध्ये शिवसेनेच्या शोभा जयभाये यांना 943 मतांनी पराभवाचा सामना करावा लागला. तिथे भाजपच्या महिला तालूका अध्यक्ष स्वाती उम्रटकर यांनी बंडखोरी केली होती.
कुर्ला - प्रभाग क्रमांक 169 मध्ये शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांचा मुलगा जय याचा 970 मतांनी पराभव झाला. तिथे भाजपचे बंडखोर उमेदवार (जिल्हा कमिटी मेंबर) अमित शेलार यांनी तब्बल 3225 मतं घेतली आहेत.
वर्सोवा- प्रभाग क्रमांक 61 मध्ये शिवसेनेच्या राजूल पटेल यांचा 2005 मतांनी धक्कादायक पराभव झाला. या ठिकाणी भाजपच्या मंडळ अध्यक्ष उर्मिला गुप्ता यांनी बंडखोरी करून 2737 मतं घेतली आहेत.
दिंडोशी - प्रभाग क्रमांक 39 मध्ये विनया सावंत यांचा 2352 मतांनी पराभव झाला. तिथे भाजपच्या मंडळ अध्यक्षाची पत्नी सुमन सिंग यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढवली होती. तिथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेला अपेक्षित सहकार्य केले नसल्याचा आरोप होतोय.
मागाठाणे – प्रभाग क्रमांक 12 मध्ये शिवसेनेच्या सुवर्णा गवस यांचा 2884 मतांनी पराभव झाला. तिथे भाजपचे बंडखोर प्रिती दांडेकर उभ्या राहिल्या होत्या.
वांद्रे पूर्व - पल्लवी सरमळकर यांचा प्रभाग क्रमांक 94 मधून 2360 मतांनी पराभव झाला. तिथे भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष रेश्मा मालुसरे यांनी बंडखोरी करून तब्बल काही हजार मतं घेतली. ही बंडखोरी झाली नसती तर पल्लवी सरमळकर यांचा सहज विजय झाला असता.
सायन कोळीवाडा - प्रभाग क्रमांक 173 मधून पूजा कांबळे या शिवसेनेच्या उमेदवार होत्या. त्यांचा 4974 मतांनी पराभव झाला. तिथे भाजपच्या बंडखोर उमेदवार शिल्पा केळुसकर यांना मिळालेली मतं 9310 आहेत . केळूसकर या भाजपच्या मंडळ अध्यक्ष आहेत.
कुलाबा- प्रभाग क्रमांक 225 ची जागा सुजाता सानप यांची शिवसेनेची स्टॅडींग सीट असताना त्या ठिकणी भाजपने हर्षिता नार्वेकर यांना उमेदवारी देवून ती जागा मैत्रीपूर्ण लढतीत जिंकली.




















