एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मालेगाव मध्य विधानसभा | संवेदनशील असलेला गड काँग्रेस राखणार?
मालेगाव मध्य मतदारसंघात खरी लढत आमदार आसिफ शेख आणि मौलाना मुफ्ती यांच्यातच रंगणार असल्याने आमदार आसिफ शेख कॉंग्रेसचा गढ राखतात की त्याला मौलाना मुफ्ती खिंडार पाडतात हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.
यंत्रमागाचे शहर अशी संपूर्ण महाराष्ट्रात ओळख असलेल्या मालेगावमध्ये निवडणुकीचे बिगुल वाजताच मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातील वातावरण चांगलेच ढवळून निघण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात संवेदनशील अशी ओळख असलेला हा मतदारसंघ सध्या काँग्रेसच्या ताब्यात असून कॉंग्रेसच्या या गडाला कोण सुरुंग लावणार? याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.
मालेगाव मध्य या मतदार संघावर सलग पंचवीस वर्ष जनता दलाचे निहाल अहमद यांची आपली पकड कायम ठेवली होती. निहाल अहमद यांनी आपल्या सत्ता काळात यंत्रमाग कामगारांचे हक्क, रजा, बोनस याचबरोबर मुलभूत हक्कांसाठी आंदोलन करत त्यांनी कामगारांच्या मनात आपल स्थान पक्क केलं. त्यातच जातीय दंगलीची पार्श्वभूमी त्याला पूरक ठरली. याच कारणामुळे निहाल अहमद यांनी 1978 ते 1995 असे सतत पंचवीस वर्ष या मतदारसंघावर अधिराज्य गाजविले. मात्र मतदारसंघाचा हवा तसा विकास होऊ शकला नाही. त्यामुळे कधीकाळी त्यांचे शिष्य असलेले कॉंग्रेसचे रशीद शेख यांनी या मुद्द्यावरुन निहाल अहमद यांना घेरत जनतेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. याचाच परिणाम म्हणून 1999 च्या विधानसभा निवडणुकीत रशीद शेख यांनी आपल्या गुरुला धोबीपछाड देत विधानसभा गाठली. 2004 च्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा विजय मिळत निहाल अहमद यांचं मतदारसंघावर असलेलं वर्चस्व संपुष्टात आणून मतदारसंघ कॉंग्रेसमय केला.
मुस्लीम समाजाचे 80 टक्के प्रभुत्व असलेल्या या मतदारसंघात 2009 साली मुस्लीम धर्मगुरु मौलाना मुफ्ती ईस्माइल यांची राजकारणात एन्ट्री झाली आणि राजकीय समीकरणं बदलत गेली. धार्मिक विरुध्द राजकीय अशी किनार या निवडणुकीत दिसली आणि आमदार रशीद शेख यांचा पराभव झाला. दहा वर्षाच्या काळात आमदार रशीद शेख यांनी केलेली विकासकामं धार्मिकतेच्या मुद्यापुढे फिकी पडली. याच काळात मालेगाव मध्यमधील मतदार संघाचे विभाजन होऊन हिंदू बहुल भाग हा मालेगाव बाह्य मतदारसंघात गेला. त्यामुळे कॉंग्रेसची हक्काच्या हिंदू मतांचं विभाजन होऊन त्याचा फटका आमदार रशीद शेख यांना बसला.
आमदार रशीद शेख यांच्या काळात महापालिका निवडणुका झाल्या आणि त्यांनी महापौरपदी आपला मुलगा आसिफ शेख याची वर्णी लावत शहरावर आपली पकड मजबूत केली होती.
2014 साली मात्र रशीद शेख यांनी निवडणूक न लढवता आपला मुलगा आसिफ शेख याला निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले. उच्च शिक्षित असलेल्या आसिफ शेख यांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत तरुणाईला आपलेसे केले. तर दुसरीकडे दखनी-मोमीन अशी जातीय पेरणी होऊ लागली. यंत्रमाग उद्योगाला सवलती, मुस्लीम आरक्षण या प्रश्नावर आसिफ शेख यांनी आंदोलन करत आमदार मौलाना मुफ्ती यांचा प्रभाव कमी केला. त्यामुळे 2014 सालच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत मौलाना मुफ्ती यांचा पराभव करत आसिफ शेख विजयी झाले.आपल्या आमदारकीच्या काळात आसिफ शेख यांनी विविध समाजपयोगी कामांचा धडाका लावला. त्यातच त्यांनी स्थानिकांना रोजगार देत तयार केलेल्या मालाची सर्वत्र ओळख व्हावी म्हणून मालेगाव महोत्सवांसारख्या कार्यक्रमांचं आयोजन करत जनतेशी आपली नाळ जोडण्याचा प्रयत्न केला.
यंदाच्या निवडणुकीत काय होऊ शकते
आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली तर मौलाना मुफ्ती यांना उमेदवारी मिळू शकणार नाही. त्यामुळे सध्य परिस्थितीला मौलाना मुफ्ती उमेदवारी बहुजन वंचित की एमआयएम पक्षात जायचे याची चाचपणी करीत आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली नाही तर ते पुन्हा राष्ट्रवादीकडून उमेदवार म्हणून उभे राहतील. तर तिकडे एमआयएमकडून माजी उपमहापौर युनूस ईसा किंवा त्यांचे पुत्र डॉ.खालीद हाजी हे उमेदवार असू शकतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने निवडणूक ही अपेक्षेप्रमाणे तिरंगी होणार आहे.
आमदार आसिफ शेख यांची जमेची बाजू म्हणजे मालेगाव महापालिका कॉंग्रेस-शिवसेना यांच्या ताब्यात असून त्यांचे वडील म्हणजेच माजी आमदार रशीद शेख हे सध्या महापालिकेचे महापौर आहेत. त्यातच ग्रामविकास मंत्री दादा भुसेंची मदत विकास कामांना मिळत असल्याने त्याचा फायदा आमदार आसिफ शेख यांना होणार आहे.
मालेगाव मध्य विधानसभा एकूण मतदार - 2,83,812
2014 साली उमेदवारांना मिळालेली मतं
आसिफ रशीद शेख - कॉंग्रेस-71731
मौलाना मुफ्ती - राष्ट्रवादी-57189
बुलंद इकबाल - जनता दल-6487
साजीद अख्तर - शिवसेना-1319
दरम्यान मालेगाव हे यंत्रमागाचे शहर असल्याने टेक्सटाईल पार्कला चालना मिळू शकलेली नाही. आज ही शहरात अस्वच्छता,अतिक्रमण आणि बेशिस्त वाहतूक यावर उपाय योजना झालेल्या नाहीत. घरकुल योजनेत सुविधांचा अभाव असे प्रश्न अद्याप सुटू शकलेले नाही.
एकूणच मालेगाव मध्य मतदारसंघात खरी लढत आमदार आसिफ शेख आणि मौलाना मुफ्ती यांच्यातच रंगणार असल्याने आमदार आसिफ शेख कॉंग्रेसचा गढ राखतात की त्याला मौलाना मुफ्ती खिंडार पाडतात हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.
जाणून घ्या या मतदारसंघाविषयी
- मालेगाव बाह्य मतदारसंघ : विरोधक प्रबळ उमेदवार देणार की दादा भुसे चौथ्यांदा जिंकणार?
- कन्नड विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन जाधव पुन्हा आमदार होणार ?
- साक्री विधानसभा मतदारसंघ | काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजप बाजी मारणार?
- बागलाण विधानसभा मतदारसंघ | बोरसे आणि चव्हाण या कुटुंबांभोवती फिरतंय तालुक्याचं राजकारण
- जालना विधानसभा मतदारसंघ | जालन्यात वंचितची काँग्रेसला धास्ती
- परळी विधानसभा | भावा-बहिणीमधील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
- येवला-लासलगाव मतदारसंघ | छगन भुजबळ विजयी चौकार लगावणार?
- अक्कलकोट विधानसभा | स्वामींच्या नगरीत अभय कुणाला? भाजप आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर
- परभणी विधानसभा मतदारसंघ : भाजपच्या खेळीने शिवसेना अडचणीत
- मुर्तिजापूर विधानसभा : तिकीटासाठी भाजप नेत्यांमध्ये स्पर्धा तर 'राखीव' मतदारसंघ राखण्याचं 'वंचित'समोर आव्हान
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement