![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपची बेस्ट परफॉर्मन्सकडे वाटचाल, देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्रिपदाचे दावेदार!
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: महायुतीला खटाखट मतं मिळाली, मविआला प्रचंड मोठा धक्का; विधानसभा निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागण्याची शक्यता
![Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपची बेस्ट परफॉर्मन्सकडे वाटचाल, देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्रिपदाचे दावेदार! Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 bjp best performance Devendra Fadnavis will be strong CM Candidate after BJP big win Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपची बेस्ट परफॉर्मन्सकडे वाटचाल, देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्रिपदाचे दावेदार!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/23/fa295bd85be5ae0d107cd147639141401732339237837954_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश बाजूला सारुन महायुतीने विधानसभा निवडणुकीत मोठा राजकीय चमत्कार करुन दाखवला आहे. शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या तीन तासांमध्ये महायुतीला (Mahayuti) प्रचंड मोठे यश मिळताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने राबवलेली लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) गेमचेंजर ठरल्याचे निकालांवरुन दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला (BJP) प्रचंड मोठा फटका बसला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत भाजपने योग्य उमेदवारांची निवड, ग्राऊंड लेव्हलला केलेले काम, स्थानिक पातळीवर साधलेली जातीय समीकरणे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मिळालेली साथ या जोरावर प्रचंड मोठे यश मिळवले आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेले यश अनेक अर्थांनी महत्त्वाचे मानले जात आहे. सध्याच्या कलानुसार भाजपचे उमेदवार 120 जागांवर आघाडीवर आहेत. हे भाजपचे आतापर्यंतचे सर्वात मोठे यश मानले जात आहेत. त्यामुळे आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार, अशी चर्चा सुरु झाली आहे. महायुतीमध्ये भाजप 131 शिंदे सेना 55 आणि अजित पवार गट 35 जागांवर आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार अवघ्या 60 जागांवर आघाडीवर आहेत. मविआत काँग्रेस 22, ठाकरे गट 20 आणि शरद पवार गटाचे 16 उमेदवार आघाडीवर आहेत.
एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन राज्यात महायुतीची सत्ता स्थापन केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज्यात मुख्यमंत्री म्हणून जम बसवला होता. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपने एकट्याच्या बळावर 100 जागांचा आकडा पार केल्याने आता देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदावरील दावा आणखी भक्कम झाला आहे. भाजप नेतृत्त्वाने विधानसभा निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली लढवत असल्याचे सांगितले होते. मात्र, आता निवडणुकीत भाजपला मिळालेल्या प्रचंड यशानंतर मुख्यमंत्रीपदी भाजपचाच नेता बसेल, याबद्दलची शक्यता वाढली आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस आता दिल्लीत जाणार, अशी चर्चा सुरु होती. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत भाजपला अपयश मिळाले असते तर देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला मोठा फटका बसला असता. मात्र, या विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या घवघवीत यशामुळे देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्त्व आणखी झळाळून निघाले आहे.
आणखी वाचा
एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेले सगळे आघाडीवर; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, राजकीय घडामोडींना वेग
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)