Gold Smuggling Case : सांगली जिल्हा पुन्हा एनआयएच्या रडारवर; केरळमधील 100 किलो सोने तस्करी प्रकरणी सांगलीत तपास सुरु
Gold Smuggling Case : दुबईमधून जुलै 2020 मध्ये केरळ येथे 100 किलो सोने तस्करीचा प्रकार उघडकीस आला होता. याचा संबंध सांगली जिल्ह्याशी असल्याचं तपास यंत्रणांच्या चौकशीत उघड झाला होता. अशातच आता पुन्हा याप्रकरणी सांगली जिल्हा एनआयएच्या रडारवर आला आहे.
सांगली : जिल्ह्यातील पूर्वेकडील काही तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गलाई व्यावसायिक आहेत. या तालुक्यातील अनेक गलाई व्यावसायिक हे या व्यवसायाच्या निमित्ताने देशभरात विखुरले आहेत. त्यामुळे या व्यावसायिकाच्या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी होत असल्याचे एनआयए संस्थेच्या तपासात समोर येत आहे. जिल्ह्यातील पूर्व भागातील आटपाडी, खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ या तालुक्यातील अनेक लोक या व्यवसायात आहेत. सोने गाळण्याच्या व्यवसायात या लोकांचा कुणी हात धरू शकत नसल्याने हे लोक या व्यवसायाच्या निमित्ताने देशातील अनेक राज्यात वसले आहेत. त्यामुळे या व्यवसायाच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सोने तस्करी होत असावी, असा तपास यंत्रणांना संशय आहे. जिल्ह्यात अशा तस्करी झालेल्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या असून त्याचा तपास देखील सुरु आहे. आता दुबईतून केरळमध्ये आणलेले 100 किलो सोने तस्करीनेच सांगली जिल्ह्यात आणल्याची बाब समोर आल्याने तस्करीशी पुन्हा सांगलीचे कनेक्शन घट्ट असल्याचे स्पष्ट होत आहे.
दुबईमधून जुलै 2020 मध्ये केरळ येथे 100 किलो सोने तस्करीचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी केरळ कस्टमकडून 15 जणांना अटक करण्यात आली होती. जुलै 2020 मध्ये केरळमधून सांगलीत तब्बल शंभर किलो सोने तस्करी केल्याप्रकरणी काही संशयितांना कस्टम विभागाने अटक केली होती. त्यांच्याकडील चौकशीनंतर स्पष्ट झाले. तस्करीची व्याप्ती मोठी असल्याने, तसेच यामध्ये केरळमधील वरिष्ठ शासकीय अधिकारी तसेच तत्कालीन काही वरिष्ठ पदाधिकार्यांचाही समावेश असल्याचा संशय आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यात आला. त्यानंतर गतवर्षी जुलै अखेरपर्यंत सोने तस्करीप्रकरणात 15 जणांना एनआयएच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर तस्करीचे तब्बल 100 किलो सोने सांगली जिल्ह्यात पाठवल्याची माहिती उघड झाली आहे. ही माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारपासून एनआयएच्या एका पथकाने सांगलीत ठाण मांडले आहे. तर एनआयएकडून 9 जून रोजी सोने तस्करीचा मुख्य सूत्रधार मोहम्मद मन्सूर याला अटक करण्यात आली आहे.
तपासामध्ये मन्सूर याने 100 किलो सोने सांगली जिल्ह्यात पाठवल्याची कबूली दिली. यानंतर एनआयएच्या पथकाकडून 100 किलो सोने तस्करी प्रकरणी सांगली जिल्ह्यात छापे टाकण्यात आले आहेत. शनिवारी या एनआयएच्या पथकाने जिल्ह्यातील खानापूर, कवठेमहांकाळ, आटपाडी आणि तासगाव तालुक्यात तपासासाठी छापे टाकण्यात आल्याची माहिती समजत आहे. मन्सूर याने दिलेल्या माहितीवरून, ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र या कारवाईबाबत एनआयएकडून गुप्तात पाळण्यात आली आहे. दिल्लीमध्ये गेल्या वर्षी रेल्वे स्टेशन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी उघडकीस आली होती. त्याचे कनेक्शन सांगलीचे असल्याची माहिती समजली होती. त्यानंतर एनआयएचे पथक पहिल्यांदा सांगली जिल्ह्यात आले होते. या पथकाकडून अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. आता त्यानंतर दुबई मधून केरळ मार्गे करण्यात आलेल्या तस्करी मध्ये ही सांगली कनेक्शन समोर आल्याने एनआयएचे पथक दुसऱ्यांदा सांगली जिल्ह्यात दाखल झाले.
राजनैतिक अधिकाऱ्यांच्या नावाने पार्सल पाठवून सोन्याची तस्करी
महंमद मन्सूर आणि मोहम्मद शफीसह इतरांनी ते दुबईत असताना राजनैतिक अधिकाऱ्यांच्या नावाने पार्सल पाठवून त्याद्वारे सोन्याची तस्करी करण्याचा कट आखण्यात आल्याचे एनआयए तपासात उघड झाले आहे. त्यातून एनआयएने महंमद मन्सूर विरोधात इंटरपोलद्वारे समन्स बजावले होते. केरळच्या त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका डिप्लोमॅटिक बॅगेजमधून 30 किलो सोने दुबईतून तस्करी करुन जुलै 2020 मध्ये आणण्यात आले होते. राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सामानाची विमानतळावर तपासणी होत नाही. याचा गैरफायदा घेऊन ही तस्करी सुरु होती. या तस्करीच्या रॅकेटमधील मुख्य संशयित स्वप्ना सुरेश ही केरळच्या सत्ताधारी माकपच्या डाव्या लोकशाही आघाडी सरकारची निकटवर्ती आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
सांगलीत 21 लाखांचे विनापरवाना खत जप्त; कृषी विभागाच्या भरारी पथकाची कारवाई, संबंधितावर गुन्हा दाखल