Nagpur : चारित्र्यावर संशय घेतो म्हणून बायकोनेच दिली कामगाराला नवऱ्याच्या हत्येची सुपारी; पोलीस अधिकाऱ्याची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात
Nagpur : नागपुरातील हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला असून नवऱ्याच्या हत्येची सुपारी बायकोनेच दिल्याचं स्पष्ट झालं. महिला आरोपीशी असलेल्या संबंधामुळे एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिकाही संशयास्पद आहे.
नागपूर : जिल्ह्यातील प्रदीप बागडे हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. प्रदीपची हत्या त्याच्याच पत्नीने पतीच्या कंपनीत काम करणाऱ्या तरुणाला सुपारी देऊन घडवल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. यामध्ये प्रदीपची बायको सीमा बागडे, सुपारी घेऊन हत्या करणारा आरोपी पवन चौधरी आणि एका विधिसंघर्ष बालकाचा समावेश आहे.
मृतक प्रदीप बागडे हा नेहमी त्याची बायको सीमाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यामुळे दोघांचे वैवाहिक संबंध ताणले गले होते. रोज-रोजच्या भांडणाला कंटाळून सीमाने तिचा परिचय असलेल्या पवनला प्रदीपच्या हत्येची जबाबदारी तीन लाखाच्या मोबदल्यात सोपविली. तशा प्रकारचा कबुली जबाब आरोपीने पोलिसांना दिला आहे.
नागपूरच्या अजनी भागात राहणारा मृतक प्रदीप बागडे प्रॉपर्टी डिलिंग तसेच कार वॉशिंगची कंपनी चालवायचा. 15 सप्टेंबर रोजी प्रदीप काही कामाच्या निमित्ताने घरून निघाला होता. मात्र दोन दिवसानंतर देखील तो घरी परतला नसल्याने त्यांची पत्नी सीमा बागडेने अजनी पोलीस ठाण्यात जाऊन पती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. दरम्यान 21 सप्टेंबर रोजी एका व्यक्तीचा मृतदेह नागपूर जिल्ह्यातील खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बडेगाव-खेकडानाला परिसरातील जंगलात आढळून आला. पोलिसांच्या तपासात तो मृतदेह प्रदीप बागडे यांचा असल्याचे निष्पन्न झाले.
सुरुवातीला पोलिसांना प्रदीपच्या हत्येमागील नेमक्या करणाचा शोध लागत नव्हता. मात्र पोलिसांनी मृतक प्रदीपच्या परिचितांची चौकशी सुरू केली, तेव्हा पती-पत्नीमधील ताणलेल्या वैवाहिक संबंधांची माहिती पोलिसांना कळाली. त्यानंतर पोलिसांच्या तपासाचा केंद्रबिंदू मृतकाची पत्नी सीमा झाली आणि या हत्या प्रकरणाचा उलगडा झाला.
हत्या करणाऱ्या पवन चौधरीने दिलेल्या कबुली जबाबानुसार सीमानेच त्याला पतीची हत्या करण्यासाठी तीन लाखांची सुपारी दिली होती. सौदा पक्का झाल्यानंतर 50 हजार रूपये अॅडव्हान्स म्हणून देण्यात आले होते. तर काम झाल्यानंतर उर्वरित अडीच लाख रुपये देण्याचे सीमाने कबूल केले होते. सीमा आणि पवननेच संगनमत करून प्लॅन तयार केला होता. त्यानुसार पवनने प्रदीपला नागपूर जिल्ह्यातील थडीपवनी गावात एक प्लॉट दाखवण्याच्या निमित्ताने नेले आणि त्याचे अपहरण करून प्रदीपची हत्या केली. हत्येनंतर मृतदेह पोत्यात भरून खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडेगाव-खेकडानाला परिसरातील जंगलात फेकून दिले होते.
दरम्यान, नागपूर शहर पोलीस दलातील एका अधिकाऱ्याची या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सीमा बागडेसोबत घनिष्ठ मैत्री असल्याचं समोर आलंय. त्या अधिकाऱ्यांची या हत्या प्रकरणामागे काही भूमिका तर नाही ना याचा शोधही पोलीस घेत आहेत.
संबंधित बातम्या :