सांगलीत 'बंटी-बबली'चा कहर! कमी दरात सोने देतो म्हणत सहा जणांना लाखोंचा गंडा
कमी दरात सोने देतो आणि झटपट नफा मिळवण्याची एक स्कीम आहे असे सांगत सांगलीमध्ये (sangli froud case) सहा जणांना एका दांपत्याने 52 लाख 90 हजाराचा गंडा घातलाय.
सांगली : कमी दरात सोने देतो आणि झटपट नफा मिळवण्याची एक स्कीम आहे असे सांगत सांगलीमध्ये सहा जणांना एका दांपत्याने 52 लाख 90 हजाराचा गंडा घातलाय. 10 हजाराने कमी दरात सोने मिळेल असे सांगून या बंटी-बबली जोडीने काही लोकांना पैसे गुंतवण्यास भाग पाडले. विराज विजय कोकणे आणि दीपाली विराज कोकणे असं या जोडीचं नाव आहे. सांगली शहर पोलीस स्टेशन मध्ये कोकणे दाम्पत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून सध्या हे कोकणे दांपत्य फरार असून त्याचा मोबाईल देखील बंद आहे. मोबाईल बंद ठेवत संपर्क तोडल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्या लोकांनी कोकणे दाम्पत्याकडे पैसे गुंतवले होते त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. लाखोंने पैसे गुंतवलेल्या सात जणांनी कोकणे दाम्पत्यावर फसवणुकीची तक्रार दाखल केलीय.
झटपट नफ्याचे आमिष आणि लाखोंची गुंतवणूक
याप्रकरणातील फिर्यादी भास्कर मुळीक यांचे मित्र दत्ता पाटील यांनी त्यांची विराज कोकणे याच्याशी ओळख करून दिली होती. त्यावेळी त्याने झटपट नफा मिळवण्यासाठी माझ्याकडे एक स्कीम असल्याचे त्यांना सांगितले. यात 10 हजार इतक्या कमी दराने सोनं मिळेल असे सांगून गुंतवणूक करण्यास सांगितले. अशाच आणखी काही लोकांना देखील झटपट नफा मिळेल असे सांगत पैसे गुंतवण्यास सांगितले आणि काही लोकांनी लाखोंनी पैसे गुंतवले.
आधी विश्वास संपादन मग फसवणूक
फिर्यादी भास्कर मुळीक यांनी सुरुवातीला कोकणेंकडे 3 तोळ्याची रोख दिली. कोकणेने या लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी दुसऱ्याच दिवशी मुळीक यांना तीन तोळे सोने आणि या सोन्याची अधिकृत पावती देखील दिली. कमी दरात सोने मिळतंय याची खात्री पटल्याने मुळीक यांनी कोकणेंला पुन्हा काही रक्कम दिली. यावेळी कोकणेने दोन दिवसात सोने आणून देतो असे सांगितले मात्र ते दिलेच नाहीत. मुळीक जेव्हा कोकणेच्या घरी गेली त्यावेळी तिथे कुणी नसल्याचे कळताच आपली फसवणूक झाल्याचे मुळीक यांच्या लक्षात आले. मुळीक यांच्याबरोबर आणखी काही लोकांनी कोकणेला झटपट नफ्याच्या अमिषापोटी आणि कमी दरात सोने मिळतेय या आमिषाने कुणी 8 लाख, कुणी 5 लाख तर कुणी 10 -14 लाख इतकी मोठी रक्कम दिली. यामुळे कोकणे दाम्पत्याने केलेल्या फसवणुकीचा आकडा हा 53 लाखाच्या जवळ गेलाय.