(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Beed : माझ्या बायकोच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मी खून करत राहणार; पोलिसांना आव्हान देत केला खून
बीडमध्ये एका शेतकऱ्याचा खून झाला असून त्याच्या मृतदेहाच्या शेजारीच सापडलेल्या चिठ्ठीमध्ये आपण आणखी खून करणार असल्याचं मारेकऱ्याने लिहिलं आहे.
बीड: जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली असून शिरूर तालुक्यातील आनंदगाव शिवारात सकाळी एका शेतामध्ये 65 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आला. अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने या शेतकऱ्यावर वार करून त्यांची हत्या केली आहे. कुंडलिक सुखदेव विघ्ने असं मृत शेतकऱ्याच नाव असून त्यांच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या चिठ्ठीमुळे पोलिसांसमोर मारेकर्याला पकडण्याचं आव्हान उभ राहिलं आहे.
वृद्धाचा खून करून मारेकऱ्याने मृतदेहाजवळ एक चिट्ठी ठेवली आहे. यामध्ये माझ्या बायकोचा खून झाला असून जोपर्यंत बायकोच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मी खून करत राहणार असं लिहून त्यांने पोलिसांना आव्हानच दिल आहे.
शेतात आपल्या पिकाची राखण करण्यासाठी गेलेल्या कुंडलिक विघ्रे यांच्यावर अज्ञात मारेकर्याने मध्यरात्री धारदार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या कुंडलिक विघ्ने यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी आपले वडील घरी परत का आले नाहीत हे पाहण्यासाठी त्यांचा मुलगा शेतात गेला असता रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह त्यांनं पाहिला आणि घटनेची माहिती गावकऱ्यांना दिली. गावकरी आणि पोलीस तात्काळ घटनास्थळावर गेल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणचा पंचनामा केला. यावेळी मृतदेहाजवळ एक चिठ्ठी आढळून आली आहे. माझ्या बायकोचा खून झाला असून जोपर्यंत माझ्या बायकोच्या मारेकर्यांना अटक होत नाही तोपर्यंत कुणाचं सत्र सुरूच राहील असा मजकूर या चिठ्ठीमध्ये लिहिलेला आहे.
मारेकर्यानं या चिठ्ठीमध्ये त्याच्या बायकोचा खून करण्यासाठी ज्यांनी-ज्यांनी सुपारी दिली त्यांच्या नावाचा उल्लेख केला असून त्यांना तात्काळ पोलिसांनी अटक करावी अशी विनंती केली आहे. तर लवकरच पत्रकार परिषद घेऊन पोलीस अधीक्षकांची आणि गृहमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं देखील त्यांनं चिठ्ठीत नमूद केलय. या प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली असून बीड पोलिसांची दोन पथकं या आरोपीला पकडण्यासाठी रवाना झाली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
- Washim News : धारदार शस्त्राने भोसकून पुजाऱ्याची हत्या, वाशिममधील घटनेने खळबळ
- Crime : मुंबईत हत्या, मेघालयमध्ये पकडले नायजेरिन आरोपी! दोन राज्यांच्या पोलिसांची समन्वयानं कामगिरी
- मजूर महिलेच्या बाळाचं अपहरण, अवघ्या 8 तासांत चिमुकल्याची सुखरुप सुटका; ओरोपी अटकेत