Washim News : धारदार शस्त्राने भोसकून पुजाऱ्याची हत्या, वाशिममधील घटनेने खळबळ
Washim crime News : वाशीम केकतउमरा रस्त्यावरील दुर्गामातेच्या मंदिरात पुजाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. मारोती पुंड असे हत्या झालेल्या पुजाऱ्याचे नाव आहे.

Washim News Update : वाशीम ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केकतउमरा गावालगत असलेल्या दुर्गा मातेच्या मंदिरातील पुजाऱ्याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. ही घटना आज सकाळी घडली आहे. मारोती लक्ष्मण पुंड असे हत्या झालेल्या पुजाऱ्याचे नाव आहे.
गेल्या 12 ते 15 वर्षा पूर्वी वाशीम केकतउमरा रस्त्यावर आपल्या शेतात मारोती पुंड यांनी दुर्गामातेच्या मंदिराची स्थापना केली होती. मंदिराची देखभाल आणि पूजाअर्चा मारोती करत असत. हे मंदिर रस्त्याला लागूनच असल्यामुळे भाविकांचा मोठा ओढा या मंदिरात होता. त्यामुळे मंदिरातील दान पेटीत चांगल्या प्रकारे दान मिळत होते. यासाठी मंदिरात तीन दानपेट्या लावण्यात आल्या होत्या. मिळालेल्या दानातून अन्नदान केलं जात असे. मात्र ही बाब चोरट्याच्या लक्षात आली. त्याने पुंड मंदिरात एकटे असल्याचे पाहून त्यांची हत्या केली आणि दोन दानपेट्या घेऊन फरार झाला.
वाशीम केकतउमरा रस्त्यावरून ये-जा करणारे प्रवासी मंदिर परिसरात विश्रांतीसाठी थांबत असत. त्यामुळे नेहमीप्रमाणे संशयित मंदिरात विश्रांतीसाठी थांबला आणि मारोती पुंड एकटे असल्याचा फायदा घेत धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यात आणि मानेवर वार करून हत्या केली.
नेहमीप्रमाणे आज सकाळी मारोती यांचा मुलगा वडिलांना झोपेतून उठवण्यासाठी मंदिरात गेला असता वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. घाबरलेल्या गणेश याने याबाबत गावातील नागरिकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर नागरिकांनी याबाबत पोलिसांना कळवले. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटना स्थळी डॉगस्कोड आणि फिगर एक्स्पर्ट तज्ञांसह पाहणी केली. मंदिरातील तीन दान पेट्यांपैकी दोन पेट्या गायब असल्यामुळे चोरीच्या उद्देशाने हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
दरम्यान, तपासानंतर पुंड यांची हत्या कोणी आणि का केली हे स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले. वाशीम स्थानिक गुन्हे शाखा आणि ग्रामीण पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
























