RBI Launch Digital Rupee : RBI लाँच करणार डिजिटल रुपया, आता रोख रक्कम ठेवावी लागणार नाही, काय आहेत फायदे?
RBI Launch Digital Rupee : RBI आजपासून डिजीटल रुपया जारी करणार आहे. सध्या देशातील पायलट प्रोजेक्ट म्हणून याची सुरुवात करण्यात येणार आहे.
RBI Launch Digital Rupee : गेल्या अनेक महिन्यांपासून आरबीआयच्या (Reserve Bank of India) डिजिटल करन्सीबाबत (Digital Rupee) चर्चा सुरु आहे. अखेर 1 नोव्हेंबरपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मोठ्या डीलमध्ये डिजिटल रुपीचा पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. यासाठी एकूण 9 बँकांची निवड करण्यात आली आहे. डिजिटल रुपीचा वापर प्रथम मोठ्या पेमेंट आणि सेटलमेंटसाठी केला जाईल. क्रिप्टोकरन्सीच्या वाढतं प्रस्थ आणि जोखीम पाहता सरकारनं अर्थसंकल्पात डिजिटल चलन आणण्याची घोषणा केली होती. यानंतर रिझव् र्ह बँकेनं डिजिटल रुपी लाँच करण्याची ब्लू प्रिंट तयार केली. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, सरकारी सिक्युरिटीजच्या खरेदी आणि विक्रीवरील सेटलमेंट रक्कम म्हणून डिजिटल रुपी वापरली जाईल. यानंतर महिनाभरात किरकोळ व्यवहारांसाठी डिजिटल रुपीचा पायलट प्रोजेक्टही सुरू केला जाईल.
RBI आज डिजिटल रुपी लाँच करणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी पहिल्यांदाच डिजिटल चलनाचा उल्लेख केला होता. "डिजिटल रुपया या आर्थिक वर्षात रोल आऊट केला जाईल", असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं होतं.
भारतीय रिझर्व्ह बँकेनं 7 ऑक्टोबर रोजी CBDC (सेंट्रल बँक डिजिटल करन्सी) वर एक कॉन्सेप्ट नोट सादर केली होती. ज्यामध्ये लवकरच डिजिटल रुपी लॉन्च करण्याबाबत उल्लेख करण्यात आला होता. दरम्यान, सध्या केवळ पायलट लॉन्च केलं जात आहे, जे निवडक लोकांसाठी आणलं जाईल. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या या पायलट यूज केसमुळे वापरकर्त्यांमध्ये डिजिटल रुपीबद्दल जागरुकता निर्माण होईल. तसेच, यामुळे युजर्सना भविष्यात असं चलन वापरताना कोणतीही अडचण येणार नाही.
CBDC म्हणजे काय?
भारतीय रिझर्व्ह बँकेनं CBDC ची व्याख्या 'केंद्रीय बँकेद्वारे डिजिटल स्वरूपात जारी केलेली कायदेशीर निविदा' (legal tender issued by a central bank in a digital form) अशी केली आहे. हे फियाट चलनासारखंच आहे. तसेच, फियाट चलनासारखंच हे वन टू वन एक्सचेंज करता येऊ शकणार आहे. सोप्या शब्दांत सीबीडीसी हे राष्ट्रीय चलनासारखं आहे. फक्त हे डिजिटल स्वरूपात असणार आहे. त्यामुळे यात क्रिप्टोकरन्सीसारखी अस्थिरता दिसणार नाही.
परंतु, नियमित डिजिटल व्यवहार आणि सीबीडीसी यामध्ये अजूनही मोठा फरक आहे. जो डिजिटल रुपीला वेगळं करतो. BHIM, Google Pay किंवा PhonePe सारख्या युनायटेड पेमेंट्स इंटरफेस (UPI) प्लॅटफॉर्मद्वारे केलेल्या डिजिटल व्यवहारांमध्ये बँकिंग प्रणालींचा वापर समाविष्ट असतो. ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी युजर्सना त्यांची बँक खाती UPI शी लिंक करणं आवश्यक आहे. मग ते पेमेंट किंवा मनी ट्रान्सफरसाठी असो. मात्र सीबीडीसी बँकिंग प्रणालीचा वापर करणार नाही. हे वित्तीय संस्थांऐवजी मध्यवर्ती बँकेवर म्हणजेच, आरबीआयशी थेट व्यवहार करेल.
डिजिटल रुपीचे फायदे
RBI नं CBDC-W आणि CBDC-R या दोन श्रेणींमध्ये डिजिटल चलनाची विभागणी केली आहे. CBDC-W हे घाऊक चलन म्हणून वापरलं जाऊ शकते, तर CBDC-R किरकोळ चलन म्हणून वापरलं जाऊ शकतं. सर्व खाजगी, गैर-आर्थिक ग्राहक आणि व्यवसाय ते वापरण्यास सक्षम असतील. आरबीआयच्या मते, डिजिटल चलनामुळे भारताची डिजिटल अर्थव्यवस्था वाढेल.
कॅशमध्ये कनव्हर्ट करणं शक्य
RBI च्या मते, CBDC (Digital Rupee) हे पेमेंटचं एक माध्यम असेल, जे सर्व नागरिक, व्यवसाय, सरकार आणि इतरांना कायदेशीर निविदा म्हणून जारी केलं जाईल. त्याचं मूल्य सुरक्षित स्टोअरच्या कायदेशीर टेंडर नोट (चालू चलन) च्या बरोबरीचे असेल. युजर्स ते सहजपणे बँक मनी आणि कॅशमध्ये रूपांतरित करू शकतील.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर टी रबी शंकर म्हणाले होते की, "बिटकॉईन सारख्या इतर आभासी चलनांना काढून टाकून हे डिजिटल चलन बाजारात एक उत्तम स्थान निर्माण करेल. आम्ही तुम्हाला सांगतो, केंद्रीय बँक सुरुवातीपासूनच क्रिप्टो आणि बिटकॉइनसारख्या आभासी चलनाला विरोध करत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Digital Rupee: डिजिटल करन्सी भारतासाठी का महत्वाची? CBDC चं महत्व काय?