गेल्या आठवड्यापासून कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे, त्यामुळे त्याबाबत राज्यात चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यकर्त्यांना याबाबत प्रश्न विचारले जात आहेत. प्रशासनाकडून उत्तरे मागितली जात आहे. सर्वच जण सगळ्यांनी सुरक्षिततेचे नियम पाळले जावे असा सूर लावत आहेत. नाहीतर कठोर निर्णय घ्यावे लागतील असा सूचना वजा इशारा देत आहेत. कोरोना बाधितांची संख्या वाढायला एकमेव प्रशासन जबाबदार आहे का? नागरिकांची काही कर्तव्ये आणि भूमिका नाही का? प्रशासनाने प्रत्येक नागरिकांच्या मागे तो नियम पाळत आहे का म्हणून फिरणे अपेक्षित आहे का? प्रत्येक वेळी कारवाई केलीच पाहिजे का? असे विविध प्रश्न या अनुषंगाने निर्माण होतात. कोरोनाचा उतरणीला लागलेला आलेख परत वर चढत आहे आणि सगळ्यांनाच कोरोनाची आठवण झाली, नाहीतर सगळे कोरोना संपला आहे या अविर्भावात वागत आहेत. आज राज्यातील मोठ्या प्रमाणात नागरिक मास्क न लावता आपले दैनंदिन व्यवहार करत आहे. सामाजिक अंतराचं तर कुणाला भान उरलेले नाही. सॅनिटायझरच्या रिकाम्या झालेल्या बाटल्या भरायची कुणाला आठवण राहिलेली नाही. या सर्व प्रतिबंधात्मक आणि सुरक्षिततेच्या उपायांना धाब्यावर बसवल्यावर कोरोना काय, असा हवेतून गायब होईल अशी अपेक्षा ठेवणे शास्त्रीय दृष्टिकोनातून मोठी चूक आहे. कोरोना वाढीच्या या सर्व प्रकाराला नागरिकच जबाबदार आहेत. त्यामुळे व्यवस्थेच्या नावाने शिमगा करण्यापेक्षा आपण कशा पद्धतीने याकडे थोडं लक्षं दिले पाहिजे याचा विचार करण्याची हीच ती वेळ.


प्रतिबंधात्मक उपायाची जोपर्यंत अंमलबजावणी व्यस्थतीत होती, तोपर्यंत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात आरोग्य व्यवस्थेला यश मिळालं होतं. मोठ्या प्रमाणात रुग्ण बरे तर त्या तुलनेत कमी प्रमाणात कोरोना बाधितांचे निदान होत होते. आरोग्य व्यवस्थेने चांगले नियोजन केले होते. मात्र काही दिवसांपासून पुन्हा एकदा नागरिकांनी सुरक्षिततेच्या नियमांच्या विरोधात असहकार पुकारल्याने कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. जर सध्या परिस्थिती हाताळण्याजोगी असली तरी अशाच पद्धतीने रुग्ण वाढीचा ट्रेंड राहिला, तर भविष्यात भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते. आज मोठ्या पद्धतीने लग्न सोहळे, मेळावे साजरे केले जात आहेत. या अशा परिस्थितीत सुरक्षेचे नियम मात्र बिनदिक्तपणे पायदळी तुडविले जात आहेत. राज्यात काही ठिकाणी शाळा, महाविद्यालये सुरु आहेत. मोठ्या प्रमाणात सगळ्याच क्षेत्रात मोकळीक देण्यात आली आहे, याचा अर्थ असा नव्हे की, नागरिकांनी नियम पाळायचे नाहीत. अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याकरता शासनाने ही मोकळीक दिली आहे. त्याचा गैरफायदा घेता कामा नये. कोरोबाधितांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी एकट्या प्रशासनाची किंवा आरोग्य यंत्रणेची नाही. हे प्रथम सर्व नागरिकांनी येथे समजून घेतले पाहिजे. नागरिकांनी कसंही वागायचं आणि दोष यंत्रणेला द्यायचा हे चालणार नाही. आरोग्याच्या आणीबाणीच्या या काळात जीव वाचविण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे, नाहीतर एकमेकांवर दोषारोप करण्यात या आजारामुळे काही हकनाक बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.


याप्रकरणी , राज्य कोरोना विशेष कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित सांगतात की, "सर्व प्रथम हा संसर्ग वाढीस लागू नये असे वाटत असेल तर नागरिकांनी सुरक्षिततेचे नियम पाळले पाहिजे, अन्यथा आपली जी जुनी परिस्थिती होती, ती पुन्हा उद्भवू शकते. प्रशासनाने म्हणजेच विशेष करून आरोग्य विभागाने आयात पूर्वी प्रत्येक एका पॉझिटीव्ह रुग्णांमागे 18-20 लोकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करुन त्यांच्या चाचण्या केल्या पाहिजे. तसेच पूर्वी सुरक्षिततेचे नियम पाळत नव्हते त्याकरिता ज्यापद्धतीने कारवाई केली पाहिजे, ती कारवाई अधिक कडक करण्याची गरज आहे. या दोन महत्त्वाच्या सूचना आजही राज्य सरकारला केल्या आहेत. कारण आता बहुतांश सर्वच गोष्टी खुल्या झाल्या आहेत. विशेष म्हणजे या रुग्णवाढीस काही प्रमाणात लोकल सुद्धा कारणीभूत आहे. कारण लोकलच्या गर्दीत कुणी मास्क घालत नाही. तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन होत नाही. याचे संभाव्य धोके भविष्यात दिसू शकतात. त्यामुळे शासनाने तत्काळ कठोर पावले उचलून नियमांची सक्त अंमलबजावणी केली पाहिजे."


14 फेब्रुवारीला, 'कोरोना रंग दाखवतोय!' या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले होते. त्यामध्ये, देशात आणि राज्यात लसीकरण सुरु होऊन महिना होत आला आता तर लसीकरणाच्या दुसरी फेरीची सुरुवात होत आहे. मात्र राज्यात कोरोनाचा आलेख जो उतरणीला होता, तो पुन्हा वर गेला आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यभरात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे. हे आता स्पष्ट झाले आहे. काही दिवसांचे राज्यातील वातावरण पहिले तर नागरिकांनी कोरोनाला खूपच 'हलक्यात' घेतल्याचे चित्र सध्या राज्यभर पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे शासनाने सुरक्षिततेचे जे नियम आखून दिले ते आता केवळ औपचारिक ठरावेत, अशा पद्धतीने त्या नियमांची अंमलबजावणी होताना दिसत आहे. मास्क तोंडायला लावायचा आहे. हे विसरून तो गळ्यात घालून हिंडणाऱ्याच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. सोशल डिस्टंसिंग तर लांबच राहिले आहे. सॅनिटायजरच्या बाटल्या घेऊन फिरणारे फारच कमी नागरिक दिसत आहे. एकंदरच सगळीकडे आलबेल असल्यासारखी परिस्थिती आहे. या अशा परिस्थितीत नागरिकांच्या दृष्टीने लोकलच्या वेळेत बदल केला आहे त्यामुळे साहजिकच लोकलमधून प्रवास करणाऱ्याची संख्या वाढली आहे, तशीच परिस्थिती सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत दिसत आहे. महाविद्यालयं आणि शाळा सुरु होण्याच्या मार्गावर आहेत. खरं तर जेव्हा कोरोनाचा संसर्ग कमी होतो अशा वातावरणात सगळ्यांनी आणखी नियमाचे कडक पालन करुन त्याला हद्दपार करण्यासाठी एकत्रित प्रयत्न होणे अपेक्षित असताना सध्या होणारी वाढ भविष्यातील 'धोक्यास' कारणीभूत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.


इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्र, डॉ. अविनाश भोंडवे यांच्या मते, "सध्या राज्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या कारणांमुळे गर्दी होत आहे. या गर्दीमध्ये अनेक वेळा लक्षणविरहित रुग्ण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गर्दीच्या ठिकाणी तर नियमांचा फज्जा उडालेला असतो. सुरक्षिततेच्या नियमांचे कुणी पालन करत नाही. तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हा प्रकार जसा पूर्वीच्या वेळी होता, तसा आता होताना दिसत नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने पूर्वी सारखे आता वागणे गरजेचे आहे. ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूचीचा वापर करण्याची ही वेळ आहे. नागरिकांना सर्व सूचना माहिती असून आणि संभाव्य धोके माहित असून का, असे वागतात हा एक मोठा प्रश्न आहे. देशातल्या इतर भागांत कोरोनाचे प्रमाण कमी होत असताना केरळ आणि महाराष्ट्रात मात्र कोरोना बाधितांची संख्या वाढणं हे चांगलं लक्षण नाही. त्यामुळे या संबंध प्रकाराला वेळीच आळा घातला पाहिजे."


नागरिकांनी या वाढणाऱ्या रुग्ण संख्येचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. राज्याला कोणत्याही परिस्थितीत आता लॉकडाउन परवडणारा नाही. जर रुग्णसंख्या वाढतच राहिली तर नागरिकांच्या आरोग्यच्या हिताच्या दृष्टीने शासन निर्णय घेईल सुद्धा पण त्या कठोर नियमांची झळ सगळ्यांचं सोसावी लागणार आहे. त्यापेक्षा तशी वेळच येऊ नये याकरिता नागरिकांनी स्वतःहून जर सुरक्षिततेचे नियम पाळले तर तशी वेळच आपल्यावर येणार नाही अशा पद्धतीने सुरक्षित वावर ठेवला पाहिजे. कोरोनाच्या मागच्या काळात अनेकांचे रोजगार गेले आहे, काही कुटुंब देशोधडीला लागलेत. काही रुग्णांना या आजरामुळे आपले प्राण गमवावे लागले असताना आपण मागच्या या सर्व घटनांमधून बोध घेणे गरजेचे आहे. लसीकरण सुरु झाले असून काही आठवड्यात ते सर्वसामान्यांसाठीही सुरु होणार आहे. त्यामुळे अजून काही महिने कळ सोसून दैनंदिन व्यवहार करताना सुरक्षिततेचे नियम पाळलेच पाहिजे. उद्याची आरोग्यदायी सकाळ तुमची वाट पाहत आहे मात्र त्याकरिता आजच शासनाने जे कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या विरोधात प्रतिबंधात्मक नियम आखून दिले आहे त्याचे पालन समाजातील सर्वच घटकांनी करणे गरजेचे आहे.


संतोष आंधळे यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग :