येत्या काही दिवसात संपूर्ण देशात लसीकरणाच्या मोहिमेस शुभारंभ होणार आहे. मात्र, त्या आधी लसीच्या परिणामकारकतेच्या मुद्द्यावरून जी काही चर्चा झाली ती अख्या देशाने पाहिली, ऐकली आणि मिळेल त्या व्यासपीठावर काही त्याबाबतीत व्यक्तही झाले. यावरून सिरम इन्स्टिटयूट आणि भारत बायोटेक यांच्यात शाब्दिक देवाण घेवाण झाली. आरोग्याच्या या आणीबाणीच्या काळात नागरिक सुरक्षित पर्याय म्हणून लसीकडे पाहत असताना अशा पद्धतीचा 'धुराळा' उडाला तर लोकांमध्ये लसीवरुन गोंधळ उडण्याची किंवा संभ्रमाचे वातावरण तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लशीची उपयुक्तता, परिणामकारता आणि सुरक्षितता या तीनही गोष्टी शास्त्रीय आधारावर टिकल्या पाहिजे, त्यांना परवानगी देताना याची काळजी यासंदर्भातील संबंधित संस्था घेत असाव्यात कारण हा प्रकार थेट लोकांच्या आरोग्याशी निगडित आहे. येथे चुकीला माफी नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांनी सुरळीत लसीकरणासाठी कटीबद्ध असल्याचे संयुक्त निवेदनाद्वारे जाहीर केले आणि लसीकरणाची मोहीम देशात व्यवस्थित पार पडावी म्हणून 'हम साथ साथ है' असल्याचे सूचित केले.


लसीकरण हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे, यामध्ये कोट्यवधी लोकांचा सहभाग येत्या काळात नोंदविला जाणार आहे. प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी आहे. केंद्र सरकारने या लशींवर शिक्कमोर्तब केल्यामुळे सर्वसामान्य नागरिक लस टोचून घेणार आहेत. लसीकरण मोहीमेकडे जात असताना लसीच्या परिणामकारकतेवरून गोंधळ निर्माण होणं हे चांगलं नाही. जे काही दावे आणि प्रतिदावे विज्ञान जगतासमोर मांडणे गरजेचे आहे. त्याची काळजी लस निर्मिती मधील कंपन्या नक्कीच घेतील. वैद्यकशास्त्रातील तज्ञांनी यावर चर्चा करणे मत व्यक्त करणे यात काहीच गैर नाही. मात्र, या सगळ्या चर्चांचा शेवट सकारात्मक व्हावा आणि त्याचा फायदा नागरिकांना कसा होईल यादृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे. राजकारण्यांनी लसी वर भाष्य करताना विचार करून भाष्य केले पाहिजे कारण त्यांच्या विचाराचे अनुकरण करणारे लाखो चाहते असतात, त्यांच्यामध्ये त्या मुद्द्यावरून गैरसमज निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लसीकरणाची तयारी बहुतांश सर्वच राज्यात पूर्ण झाली असावी त्याअनुषंगाने रंगीत तालीमही झाली आहे, अजून एकदा रंगीत तालीम होणार आहे. लस घ्यावी कि घेऊ नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक मुद्दा आहे. मात्र, तसा, निर्णय घेताना वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्याकडे किंवा मतांकडे दुर्लक्षित करू नये. लसीकरणाच्या दरम्यान लसीच्या अवतीभवती अनेक अफवा उठविल्या जातील त्याबाबत मात्र लोकांनी सावध राहिले पाहिजे. सत्यता पडताळून मगच निर्णय घेतले पाहिजे.


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी यापूर्वीच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये याबाबत आवाहन केले आहे. लसीकरणाच्या मोहिमेदरम्यान केंद्र आणि राज्य सरकारने शेवटच्या घटकातील नागरिकांशी सहज सोपा संवाद राहील. त्यांना लसीच्या अनुषंगाने शासकीय स्तरातून योग्य ती कळेल त्या भाषेत माहिती मिळाली पाहिजे. लसीकरणाच्या या राष्ट्रीय कार्यक्रमात नागरिकांसोबत कुठेही संवादाचा अभाव राहणार नाही याची काळजी राज्य सरकारने घेणं गरजेचं आहे. कारण याकाळात काही 'उपद्रवी' या मोहिमे दरम्यान काही चुकीची माहिती पसरवू शकतात. त्यामुळे नागरिकांना गरजेची आणि आवश्यक अशी माहिती, माहिती वितरणाची उपलब्ध असलेली सर्व व्यासपीठ आहे, त्याचा अचूक पद्धतीने वापर केला पाहिजे. योग्य संवादातून ह्या मोहिमेस मोठे बळ प्राप्त होईल यामध्ये शंका नाही. लसीकरणाच्या बाबतीत कोणतेही राजकारण होणार नाही याची सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी काळजी घेतली पाहिजे. उलट लसीकरणाच्या बाबतीत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलली पाहिजेत.


"लसीकरणसारख्या मोठ्या मोहिमेला सुरुवात होत असताताना सर्वच कंपन्यांनी अशा पद्धतीची एकमेकांवरची टीका टीप्पणी टाळली पाहिजे. त्यामुळे नागरिकांमध्ये विनाकारण संभ्रम निर्माण होऊ शकतो. ज्या लसीच्या कंपन्यांना केंद्र सरकारने परवानगी दिली आहे त्या दोन्ही कंपन्या या लस निर्मितीतील जगातील बलाढ्य अशा कंपन्या आहेत. भारत बायोटेकच्या चाचण्या दोन महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. सध्या सुरुवातीच्या काळात ज्या नागरिकांना लस देण्यात येणार आहे, त्यामध्ये बहुधा सिरम इन्स्टिट्यूटच्या लसीचा समावेश असू शकेल. ज्यांना कुणाला भारत बायोटेकची लस द्यावयाची असेल तर ते नागरिकांची पूर्व परवानगी घेतील असे मला वाटते. भारत हे लसीकरण निर्मितीच्या बाबतीत जगातील मोठे केंद्र आहे." असे राज्य कोरोना विशेष कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना सांगितले.

2 जानेवारी ला 'अफवा आणि मोफत लसीकरण?' या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आलं. त्यामध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण देशाला आनंदाची बातमी मिळाली ती म्हणजे कोरोनाच्या विरोधातील लस उपलब्ध झाल्याची. त्यामुळे देशातील लसीकरण मोहिमेस लवकरच प्रारंभ होण्याची शक्यता आहे. मात्र, या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी, 2 जानेवारी रोजी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लशीच्या अनुषंगाने दोन महत्त्वपूर्ण विधाने केली. त्यापैकी पहिले म्हणजे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. लसीची उपयुक्तता आणि सुरक्षितता हेच प्राधान्य असून याबाबत काळजी घेण्यात आली आहे. तसेच अशाच प्रकारच्या अफवा पोलिओ लसीकरणाच्या वेळी करण्यात आले होते. मात्र, नागरिकांनी लस घेतली आणि आज भारत देश पोलिओ मुक्त झाला आहे. दुसरे विधान देशभरातील नागरिकांना ही लस मोफत देणार असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यानंतर काही मिनिटातच ट्विटर वरून माहिती देत लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ही एक कोटी आरोग्य कर्मचारी आणि दोन कोटी 'फ्रंट लाईन' कर्मचारी यांना मोफत लस देण्यात येईल. जुलैपर्यंत उर्वरित 27 कोटी जनतेच्या(म्हणजे प्राधान्यक्रम असलेल्या.. ज्येष्ठ नागरिक वगैरे) लसीकरणाचा निर्णय घेतला जाणार आहे. यामुळे देशातील सर्व नागरिकांना लस मोफत मिळणार कि नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारला याबाबत लवकरच स्पष्टता आणावी लागणार आहे. लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात होण्याची शक्यता असतानाच अशा पद्धतीचा 'गोंधळ' होणे नक्कीच चांगलं नाही. लसीकरणाचा कार्यक्रम देशभर यशस्वी करायचा असेल तर केंद्र आणि राज्य शासनाने लसीच्या संदर्भातील सर्व माहिती नागरिकांसमोर व्यवस्थितपणे मांडली पाहिजे. त्यामध्ये कुठल्याही संवादाचा अभाव राहता कामा नये.


सध्याच्या घडीला भारतात आपतकालीन वापरासाठी दोन लशीला परवानगी मिळाली असली तरी येत्या काळात विविध कंपन्यांच्या लस बाजारात येण्याची शक्यता आहे. सरकारने लसीकरणाच्या मोहिमेकरीता जी काही मार्गदर्शक तत्वे आखून दिली आहे त्याचे तंतोतंत पालन होते कि नाही यासाठी जमल्यास यासाठी स्वतंत्र यंत्रणा नेमावी. या मोहिमे दरम्यानच्या छोट्या चुकांमुळे मोठे धोके संभवू शकतात हे लक्षात घेऊन या मोहिमेत काम करणाऱ्या सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना उत्तम प्रशिक्षण दिले पाहिजे. नागरिकांना लसीकरण दरम्यान कोणताही अनाठायी त्रास होणार नाही याची दक्षता घेणं गरजेचे आहे. लसीकरण हा वर्षभरापेक्षा अधिक काळ चालणारा कार्यक्रम आहे त्यामध्ये कोणतीही बाधा येणार नाही याची शासनासोबत नागरिकांनीही जबाबदारी पार पडली पाहिजे. आपल्याकडे काही वेळा रुग्णाचे नातेवाईक रुग्णलयात गोंधळ घातला असल्याच्या घटना ऐकिवात आहे, त्याचप्रमाणे काही कोरोना केंद्रातही काही अनुचित प्रकार घडल्याच्या घटना सगळ्यांनी पहिल्या आहेत. मात्र लसीकरणाच्या बाबतीत असे कोणतेही अनुचित प्रकार घडणर नाही याची सर्वानीच काळजी घेतली पाहिजे.

संतोष आंधळे यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग