>> संतोष आंधळे


'दिवाळी सुट्टीचा आनंद घेऊन, कोरोना पुन्हा कामावर रुजू ' अशा पद्धतीचा संदेश असलेला मिम्स सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. हा हास्यस्पद वाटणारा संदेश तसा पहिला तर गांभीर्याने घेण्यासारखाच आहे असे म्हणावे लागेल. कारण सध्य परिस्थिती पाहता तो खरा ठरताना दिसत आहे. दिवाळी सणाला सुरुवात होण्यापूर्वी राज्यात कोरोनाच्या अनुषंगाने वातावरण पोषक असून बऱ्यापैकी कोरोनाच्या आकड्यांचा आलेख उतरणीला लागला होता. मात्र दिवाळी संपताच आकड्यामध्ये पुन्हा बदल होऊ लागले आहेत. काही दिवसांपासून नवीन रुग्ण निर्माण होण्याचे आकडे वाढताना दिसत आहेत. यामुळे आता दिवाळीच्या आधीची कोरोनाची साथ आणि दिवाळी नंतरची कोरोनाची साथ अशी विभागणी करून तुलनात्मक अभ्यास करण्याची गरज आहे. कारण सुरवातीच्या काळात कोरोना काय आहे कशा पद्धतीने उपचार करावेत हे समजायलाच अधिक काळ गेला. मात्र त्यानंतर जेव्हा सर्व काही लक्षात आले त्यानंतर मात्र रुग्ण बरे होण्याचे प्रमाण लक्षणीय होते. मृत्युदर कमी करण्यात डॉक्टरांना यश संपादन झाले होते. त्यामुळे आता सुरु होणाऱ्या कोरोना पर्व २ मध्ये शासन, प्रशासन आणि नागरिक या संसर्गजन्य आजाराचा सामना कशापद्धतीने करतात यावर राज्याचं ' आरोग्य ' ठरणार आहे. जर नागरिकांनी नियमांचं पालन केले नाही तर शासनाला काही गोष्टींवर कठोर निर्बंध लावावेच लागतील यामध्ये कुणाचे दुमत नसावे.


कोरोनाचा आजार हा काय प्रकार आहे? तो कसा होतो ? त्यावर उपचार कोणते ? तो होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी ? या आणि कोरोनाशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे वैद्यकीय तंज्ञांसह बहुतांश नागरिकांना मागच्या 8-9 महिन्यात मिळाली आहे. मास्क लावावा, सोशल डिस्टंसिंग पाळावे आणि हात धुताना सॅनिटायझरचा किंवा साबणाचा वापर करावा, अनावश्यक गर्दी करू नये या सर्व सुरक्षितेसंबंधितांच्या सूचना अनेकांच्या पाठ झाल्या असतील इतकी जनजागृती गेल्या काही महिन्यात झाली आहे. मग प्रश्न निर्माण होतो या सर्व गोष्टी माहिती असूनही नागरिकांकडून त्याचे पालन का होत नाही. या प्रश्नाचे उत्तर अजून कुणाला सापडलेले नाही. राज्यात मास्क लावण्याची सक्ती करण्यात आली आहे. मात्र तरीही दिवसागणिक मास्क न लावणाऱ्याची आणि त्याच्याबाबतीत दंड ठोठावाल्यांची संख्या वाढतच जात आहे. केवळ मुंबईचेच उदाहरण घेतेले तर आतापर्यन्त जवळपास 4 लाख नागरिक जे विना मास्क फिरत होते त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे त्या मोबदल्यात 8 कोटी पेक्षा जास्त रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ज्या लोकांनी दंड भरला आहे, त्याच्या मते मास्कचे महत्तव आहे कि नाही. अख्या जगात कोरोना पासून बचाव व्हावा म्हणून मास्क लावून फिरत आहे मग आपल्या देशात, राज्यात आणि शहरात काही नागरिक का मास्क लावत नसावेत. तज्ञांच्या मते जर सुरक्षिततेचे नियम पाळले तर कोरोना पासून बचाव होईल, मग एवढे साधं लोकांना का काळत नसावे.


रविवारी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजमाध्यमवरील थेट प्रेक्षणांमार्फत राज्यातील जनतेशी संवाद साधला यावेळी टाळेबंदी आणि संचारबंदी तूर्तास तरी करण्याचा विचार नसल्याचे सांगितले. मात्र त्याचवेळी त्यांनी सावधगिरीचा इशारा सुद्धा दिला, ते म्हणाले पाश्चात्य देशासह दिल्ली, अहमदाबाद आदी विविध ठिकाणी कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असून, कोरोनाची लाट नव्हे, तुसुनामीची भीती व्यक्त केली. कोरोनाचे निर्बंध शिथिल केले असले तरी कोरोनाचे संकट टळलेले नाही. राज्यात प्रार्थनास्थळे सुरु करण्यात आली आहे. अनेक गोष्टी अजून सुरु करण्यात येण्याची शक्यता असतानाच कोरोनाने आपले डोके पुन्हा वर काढले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. देशातील काही शहरात रात्रीची संचारबंदी सुरु करण्यात आली आहे. लॉक डाउनच्या पर्यायांबाबत अद्याप निर्णय घेतला नसली तरी परिस्थितीची चाचपणी सुरु आहेच. जर परिस्थिती हाताबाहेर गेली तर कठोर निणय घेण्याशिवाय पर्याय उरणार नाही. नागरिकांचे आरोग्य ही सरकारची प्राधान्यता आहे. त्यामुळे शास्त्रीय दृष्टिकोनातून या आजाराकडे पाहून वैद्यकीय तज्ञांच्या मतांवर खरं तर निर्णय घेणे अपेक्षित आहे. मात्र आपल्याकडे हे सुरु करा, ते सुरु करा अशा विविध मागण्या सातत्याने होत असतात. आता रुग्णसंख्या वाढायला लागली आहे, त्यामुळे सगळ्यांनी मिळून रुग्णसंख्या कशी आटोक्यात राहील यासाठी प्रयत्न करायला हवेत.


पुणे येथील श्वसन विकार तज्ञ डॉ स्वप्नील कुलकर्णी यांच्या मते, " हवामानातील बदल आणि गर्दी हे दोन मुख्य मुद्दे आहेत त्यामुळे रुग्णांची संख्या वाढू शकते. थंडी मध्ये असेही श्वसनास त्रास होण्याच्या व्याधींमध्ये दरवर्षीच रुग्ण दिसत असतात. या वर्षी तर कोरोनाची साथ जोडीला आहे, जो संसर्गजन्य आजार आहे तो सुरक्षिततेचे नियम नाही पाळले तर होणारच आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने लोकांनी दिवाळी मध्ये गर्दी केली होती त्याचे पडसाद आता दिसण्यास सुरवात झाली आहे. अजूनही हा आजार नियंत्रणात आहे, तो तसाच कायम ठेवायचा असेल तर नागरिकांनीच काळजी घेणे अपेक्षित आहे. आजर झाल्यावर त्यावर डॉक्टर उपाय करतीलच मात्र तो आजारच होऊ नये यासाठी आपण प्रयत्नशील असण्याची गरज आहे. आजही अनेक नागरीक सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवून बिनदिक्तपणे फिरताना दिसत आहे. जर नागरिक स्वतःहून कोरोनाला आमंत्रण देत असतील तर हा आजार होणारच, त्यामुळे या काळात दक्षता फार महत्त्वाची आहे. येणार काळ कसा असेल याबाबत आताच वाच्यता करणे चुकीचे ठरेल. कोरोना विषाणूची तीव्रता कमी होते कि जास्त हे पाहणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे विषाणूंमध्ये काही जनुकीय बदल होत आहे का ते पाहणे महत्त्वाचे आहे. साथीच्या आजारात कालांतराने विषाणूची तीव्रता कमी होताना दिसली आहे मात्र कोरोना मध्ये काय होईल त्याबाबत सर्वच अनभिज्ञ आहेत. माझं वैयक्तिक मत आहे दुसरी लाट ह्याबद्दल सर्व ठिकाणी जोरदार चर्चा आहे. मात्र लाट येईल हे खरे असले तरी खूप मोठी असेल असे वाटत नाही. यासाठी नागरिकांनी शासनाच्या सर्व सूचनांचे पालन केले पाहिजे नाही तर निकाल काय हाती येऊ शकतो हे आपल्या आजुबाजुंच्या राज्यातील परिस्थिती बघितले तर लक्षात येतेच."


कोरोनाविरोधातील लस केव्हा येणार, कधी मिळणार, कुणाला आधी मिळणार, ती कशी वाटणार यावर तर सध्या रोजच चर्चा होत आहे. या निर्मितीत असणाऱ्या कंपन्यांच्या वरिष्ठांकडून रोज सर्वसामान्य नागरिकांच्या आशा उंचवतील अशा बातम्या प्रसिद्ध होत असतात. प्रत्येक कंपनी त्यांच्या लशींच्या उपयुक्तेबाबत अमुक टक्के लस यशस्वी आहे असे निरनिराळे दावे करीत आहे. मात्र या सगळ्या प्रक्रियेत एकही कंपनी असे म्हणत नाही कि आमची लस या महिन्यात या तारखेला जनतेसाठी उपलब्ध असेल. लस वाटप हा मोठा कार्यक्रम आहे. सर्वाना हवी असणारी लस कधी मिळेल याबाबत अजूनही कुठली ठोस माहिती शासनातर्फे देण्यात आलेली नाही. त्यामुळे या आजरापासून वाचण्यासाठी आजही प्रतिबंधात्मक उपाय करणे हे एकमेव शस्त्र सध्या प्रशासनाकडे उपलब्ध आहे. त्यामध्ये काही गोष्टीवर कठोर निर्बध शासनाला आणावेच लागतील. नागरिक जर सूचना पाळत नसतील तर प्रशासनाकडे दुसरा पर्याय उपलब्ध नाही. डिसेंबर महिना म्हटलं की अनेक लोक याकाळात फिरण्यासाठी विविध पर्यटन स्थळी भेट देत असतात. अनेकांनी प्लॅनिंग करून अगोदरच बुकिंग करून ठेवले आहे. पर्यटन स्थळी भेट देत असताना त्यांनी सुरक्षेच्या नियमांचं पालन नाही केलं तर मोठे धोके संभवतात. त्याशिवाय नवीन वर्षाचे स्वागत करणे हा दिवस आपल्याकडे मोठ्या प्रमाणात जबरदस्त उत्साहात साजरा केला जातो. कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता थर्टी फर्स्टला लोकांच्या उत्साहाला लगाम लावणे काळाची गरज असणार आहे.


कोरोना पर्व 2 ला सुरुवात झाली असली तरी नागरिकांनी कशा पद्धतीने या काळात वावर ठेवायचा हे त्यांना आताच ठरवावे लागेल. ज्या पद्धतीने नागरिक मुक्त विहार नियमाचे पालन न करता करत आहेत त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाचे रुग्ण वाढतील त्यांना उपचार मिळतील. मात्र परिस्थिती हाताबाहेर जाईल अशी वेळ येता कामा नये यासाठी एकत्रित प्रयत्न करावे लागतील. गेली अनेक दिवस नागरिकांना 'ज्ञानाचे डोस' पाजले जात असले तरी लशींचे डोस मिळेपर्यंत त्यांना याच डोस वर अवलंबून राहावे लागणार आहे. या आजाराची लक्षणे दिसताच नागरिकांनी तात्काळ डॉक्टरांना भेटल्यास या आजरावर मात करणे सहज शक्य आहे.