>> संतोष आंधळे


ऑक्टोबर हिटपासून मुक्तता होऊन संपूर्ण देशासह राज्यातील अनेक ठिकाणी थंडीची चाहूल पाहावयास मिळत आहेत. अनेक भागात तर तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने अनेक जण गुलाबी थंडीचा आनंद लुटत आहे. दरवर्षीच या कालावधीत अशाच पद्धतीचे वातावरण असले तरी यंदाच्या या थंडगार मोसमासोबत कोरोना सुद्धा सोबतीला आहे विसरून चालणार नाही. गेली अनेक दिवस कोरोनाबाधित रुग्णसंख्या कमी असल्याचे चित्र पाहावयास मिळत असले तरी तज्ञांकडून सारखे सावधगिरीचे इशारे नागरिकांना देण्यात येत आहे. कोरोनाचा आलेख उतरणीला असताना आणि पहिली लाट संपण्याच्या टप्प्यावर असतानाच दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही यावर देशभर चर्चा सुरु आहे. आरोग्य यंत्रणा संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तयारी करताना दिसत आहे. परदेशात अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी आटोक्यात आला आहे म्हणून मोकळीक देऊन जनसामान्य जीवन पूर्वपदावर येत असतानाच तेथे कोरोनाने पुन्हा आपले डोके वर काढले असून परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की मोठ्या कालावधीकरिता पुन्हा तेथे लॉक डाउन करण्यात आला आहे. या सर्व परदेशात सध्या मोठ्या प्रमाणात थंडीचे वातावरण आहे. त्यादरम्यान अशा साथीच्या आजारात विशेषतः या कोरोनच्या बाबतीत दुसरी लाट येईलच का? याचे उत्तर मात्र सध्या कुणाकडे नाही मात्र इतर देशांची परिस्तिथी पाहता भारतात आणि त्यात महाराष्ट्रात अधिकच सतर्कता ठेवण्यात आली असून पूर्व तयारीच्या दृष्टीने नियोजन करून ठेवण्यात आले आहे.


काही दिवसापूर्वीच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेले राज्य टास्क फोर्स व डेथ ऑडिट कमिटीची बैठक घेतली. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करणे आणि कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीबाबत आढावा यावेळी घेण्यात आला. त्यांनी यावेळी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा असे आवाहनही राज्यातील नागरिकांना केले. दुसरी लाट येणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करणे वेगळे मात्र ज्या पद्धतीचे वास्तव अनेक देशात पाहावयास मिळत आहे ते नाकारूनही चालणार नाही, त्यामुळे पूर्वतयारी असणे ही काळाची गरज आहे.


या बैठकीला उपस्थित असणारे शहरातील मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी एबीपी माझा डिजिटल शी बोलताना सांगितले की, "मगरीला काही साथीच्या रोगांचा अभ्यास केला तर लक्षात येईल की त्या आजाराच्या दोन-तीन लाट येऊन गेल्या होत्या. त्याप्रमाणे एच 1 एन 1 च्या बाबतीतही तसेच घडले आहे. विशेष म्हणजे हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानात 10 अंश सेल्सिअसचा फरक दिसत आहे. या अशा वातावरणात विषाणूंची वाढ मोठ्या प्रमाणत होत असते. तसेच मोठ्या प्रमाणात सध्या प्रदूषण आणि धुके आहे, हवा कोरडी झालेली आहे. त्यात दिवाळीनिमित्त खूप मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यांवर मास्क न घालता उतरले आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर कोरोनाबाधितांची संख्या वाढू शकते. जर असे होऊन नये असे वाटत असेल तर लोकांनी सुरक्षिततेचे नियम पाळणे गरजेचे आहे. जगभरात किराणा दुकानदार, दूध विक्रेते, भाजीपाला विक्रेते, छोटे-मोठे व्यावसायिक, सार्वजनिक वाहतुकीतील कर्मचारी ज्यांचा लोकांशी कायम संपर्क येते अशा ‘सुपर स्प्रेडर’ यांच्या चाचण्यांवर भर देण्याची गरज आहे. टेस्टिंग मोठ्या प्रमाणात वाढविले पाहिजे. नागरिक टेस्टिंगसाठी रुग्णलयात येणार नाही तर त्याच्या घरी जाणारे गजरेचे आहे. ह्या सर्व बाबींवर सविस्तर चर्चा झाली."


30 सप्टेंबर ला ' मास्क हेच आता टास्क ' या शिर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले होते. त्यामध्ये महानायक अमिताभ बच्चन यांनी बुधवारी दिवसाची सुरुवात करताना समाजमाध्यमांवर ह्या ओळी टाकून स्वतःचा मास्क घातलेला फोटो ट्वीट केला आहे. त्यांनी या संदेशातून सर्व त्यांच्या चाहत्यांना आणि त्यांना फॉलो करणाऱ्यांना मास्कचे महत्त्व पटवून दिले आहे. संपूर्ण विश्वातून सध्या स्वतःला सुरक्षित ठेवायचे असेल तर नाका-तोंडावर मास्क लावणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले आहे. जागतिक आरोग्य परिषदेने आणि वैद्यकीय तज्ञांनी अनेकवेळा कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी मास्कचे महत्त्व अधोरेखित केले आहे. का कुणाला ठाऊक काही लोकांना मास्क लावायला काय समस्या आहे, कळत नाही. बाजारात उत्तम प्रकारचे मास्क आले आहेत, ज्यामुळे गुदमरायला होत नाही. काही जणांनी घरीच चांगले कापडी मास्क बनवून वापरण्यास सुरुवात केली आहे. मास्क ही गोष्ट लहान जरी वाटत असली तरी नागरिकांना थेट कोरोना सारख्या भयंकर अशा संसर्गजन्य आजार होऊ नये यासाठी तुमची मदत करते. सध्याच्या या वैश्विक महामारीत वैद्यकीय अनुषंगाने मास्कला अनन्यसाधारण महत्त्व आहे. येणारा काळ हा कठीण आहे. तंदुरुस्त राहायचे असेल तर मास्क वापरावाच लागेल नाही तर संपूर्ण राज्यात आता मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे.


वैद्यकीय तज्ञाचे मते, थंडीमध्ये बऱ्यापैकी हवामानात मोठ्या प्रमाणात फरक पडल्यामुळे सर्दी पडसाच्या रुग्णामध्ये वाढ होते खोकल्याचे रुग्ण अधिक प्रमाणात या कळत पाहायला मिळतात. तर ज्या व्यक्तींना श्वसन विकरांच्या व्याधी आहेत त्यांना या काळात अधिक त्रास जाणवत असते. त्यामुळे एकंदरच या काळात वातावरण चांगले असले तरी सुरक्षितता घेतलीच पाहिजे. त्यामुळे विशेष करून या करोनामय वातावरणात स्वतःला तंदुरुस्त ठेवायचे तर काळजी घेतलीच पाहिजे. सध्या काही दिवसांपासून समाज माध्यमांवर सध्या एक पोस्ट वायरल झाली आहे. त्यात मास्क लस आहे, सोशल डिस्टंसिंग हीच प्रतिकारशक्ती आणि हात धुणे हेच औषध आहे. कारण सध्या कोरोनाविरोधातील लस येण्याकरिता किती काळ जाईल हे कुणीही निश्चित सांगितलेले नाही. या अगोदर खुप तज्ञांनी कोरोनबाबत अंदाज बांधले होते. कोरोना अमुक या महिन्यात कमी होईल या काळापर्यंत तो वातावरणात राहिल मात्र कोरोनाने सर्व तज्ञाचे अंदाज आतापर्यंत फोल ठरवले आहे. त्यानंतर कुणीही तज्ञ कोरोनाचे वर्तन कसे हे सांगण्यापेक्षा कशा पद्धतीने काळजी घ्यावी यावर जास्त चर्चा करताना दिसतात.


राज्याची कोरोनाच्या अनुषंगाने परिस्थिती चांगली होत आहे. रुग्णसंख्या कमी आहे, मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे. मोठ्या प्रमाणात रुग्ण घरी बरे होऊन जात आहेत. काही प्रमाणात नवीन रुग्ण निर्माण होत आहे अशी परिस्थिती असली तरी आपल्याकडील डॉक्टरांना आता कोरोना आजच्याविरोधातील उपचारपद्धती कळून चुकली आहे. त्यामुळे रुग्ण जर वेळेत डॉक्टरांकडे पोहचला तर तो बरे होण्याच्या शक्यता अधिक असल्याचे आपल्याला दिसले आहे. मार्च महिन्यानंतरचे अनेक सण आपण सध्या पद्धतीने साजरे केले आहेत. त्याचप्रमाणे यंदाची दिवाळी साजरी करणे अपेक्षित आहे. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे दिवाळी साजरी केल्यास कोरोनच्या येणाऱ्या संभाव्य दुसऱ्या लाटेपासून आपला बचाव होऊ शकतो. आपली सुरक्षितता आपल्या हातात हाच एक मात्रक कोरोनच्या या काळात आपण सगळ्यांनी शिकणे गरजेचे आहे. आपल्याकडे पूर्वीच्या काळातील एक प्रसिद्ध गाणे आहे, आला थंडीचा महिना, झटपट शेकोटी पेटवा, मला लागलाय खोकला या ओळी आठविल्याशिवाय राहत नाही.


संतोष आंधळे यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग