दुसरी लाट येण्याची शक्यता, त्यासाठी लागणारी पूर्वतयारी आणि दुसरी लाट आली तर ती सौम्य स्वरूपाची असेल. वैद्यकीय तज्ञांचा इशारा आणि प्रशासनाचे आवाहन. रस्त्यांवर आणि बाजारपेठातील गर्दी आणि दिवाळी साधेपणाने साजरी करा. या आणि संबंधित सगळ्या विषयांवर दिवाळीच्या आधी मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली होती. मात्र, नागरिकांनी जे करायचे ते केलेच, काहींनी नियमांचे पालन केले तर काहींनी बिनधास्तपणे दिवाळी साजरी केली. या सगळ्या प्रकारात जे परिणाम दिसायचे होते ते दिसण्यास सुरुवात झाली. खरं तर दिल्लीची परिस्थिती आपल्या सगळ्यांना दिसत होती, संसर्गाचा उद्रेक तेथे दिवाळीच्या अगोदर आणि दरम्यान झाला होता.


महाराष्ट्र सरकारने तात्काळ प्रतिबंधात्मक पावले उचलण्यास सुरवात केली. पुन्हा एकदा यंत्रणा सतर्क झाली, जी अगोदरपासून होतीच. मात्र, कोरोनाच्या अनुषंगाने नवे आदेश कधी काढायचे याची बहुदा ते वाट बघत असावेत. त्याला सुरुवात शुक्रवारपासून झाली. शाळा सुरु होण्याचे संकेत यापूर्वीच देण्यात आले होते. मात्र, राज्य सरकारने ह्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यावा असे म्हटले आहे, त्याप्रमाणे मुंबईमध्ये शाळा आता नवीन वर्षात सुरु होणार असल्याचे मुंबई महापालिका प्रशासनाने जाहीरही केले आहे. त्यामुळे तज्ञांनी अपेक्षित केलेली अशी परिस्थिती निर्माण व्हायला सुरवात झाली आहे. आता नागरिकांनी सुद्धा 'पूर्वीचा कोरोना काळ' आठवून तशी परिस्थिती येऊन द्यायची नसेल तर सुरक्षिततेला प्राधान्य देणे गरजेचे आहे.


वैद्यकीय तज्ञांच्या मते, नोव्हेंबर-डिसेंबर या काळात असेही श्वसन विकाराच्या व्याधींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. सालाबादप्रमाणे यंदाही ती दिसणारच आहे. मात्र, आतापर्यंत अशा रुग्णांमध्ये कधी कोरोनाची चाचणी करण्यात येत नव्हती. डॉक्टर रुग्णांची लक्षणे पाहून त्यांना जी उपचारपद्धती निश्चित होती त्याप्रमाणे उपचार करत होते. मात्र, यंदाचा डिसेंबर हा वेगळा असणार आहे, डॉक्टरांना त्यांच्या उपचार पद्धतीत अँटीजेन, आर टी - पी सी आर आणि एच आर सी टी या चाचण्यांची पडणार आहे, कोरोना ह्या संसर्गजन्य आजाराने हा नवीन पायंडा पाडून दिला आहे. या काळात हवा कोरडी असल्याने श्वसनाच्या आणि फुफ्फुसाच्या व्याधींमध्ये वाढ होत असते. विशेष करून ज्यांना अगोदर दम्याचे विकार आहेत त्यांना या काळात अधिक त्रास होण्याची शक्यता बळावत असते. त्यामुळे आधीच आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक काळ त्यात कोरोनाची भर त्यामुळे निश्चितच रुग्णांचा क्रमांक वाढेल. मात्र, ते रुग्ण सौम्य आणि मध्यम स्वरूपाच्या लक्षणांचे असल्यास डॉक्टरांना त्यांच्यावर उपचार करणे शक्य असून ते लवकर बरे होऊन घरी जाऊ शकतात. कोरोनाच्या काळात डॉक्टरांचा भर सर्वात अधिक असेल तो मृत्यूदर कमीत-कमी ठेवण्यावर असणार आहे.


याप्रकरणी मुंबईतील श्वसन विकार तज्ञ डॉ. समीर गर्दे सांगतात की, "हे सगळेच अपेक्षित आहे, त्याप्रमाणे घडत आहे, असंही ह्या काळात श्वसनविकाराच्या रुग्णांचा आकडा वाढतो. पहिली गोष्ट म्हणजे नागरिकांनी घाबरण्याची अजिबात गरज नाही. आपल्याकडील डॉक्टरांना कोरोनाचे रुग्णांना कशा पद्धतीने उपचार द्यायची याच्या बाबत उत्तम ज्ञान आहे, त्यामुळेच तर मोठ्या प्रमाणात रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. योग्य रुग्णांला योग्य उपचार पद्धती देणे हे आपल्याकडील तज्ञ डॉक्टरांना माहित आहे. त्यामुळे कोरोनाचा आजार झाला तर उगाचच घाबरण्या सारखे काहीच नाही हे आधी ध्यानात घ्यायला पाहिजे. लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला मात्र नागरिकांनी घेतला पाहिजे, उगाच आजार अंगावर काढणे योग्य नाही. रुग्ण वाढतील मात्र दुसरी लाट मोठ्या प्रमाणात असेल वैगरे मला वैयक्तिक वाटत नाही, मात्र नागरिकांनी सुरक्षिततेचे नियम आखून दिले आहेत ते मात्र कटाक्षाने पाळले पाहिजे."


नोव्हेंबर, 9 ला ' सुपर स्प्रेडरवर इतकं का लक्ष? या मथळ्याकही बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामध्ये, 'जस जशी दिवाळी जवळ येऊ लागली आहे, राज्यातील नागरिकांना कोरोनाच्या अनुषंगाने दक्ष राहण्याचे आवाहन सर्व स्तरातून करण्यात येत आहे. कोरोनाची आज रुग्णबाधितांची संख्या कमी होत असली तरी ती कायम तशीच टिकवण्याचे सर्वस्वी नागरिकांच्या हातात आहे. वैद्यकीय तज्ञांच्या मते, कोरोनाचे थंडीतील वर्तन कसे असेल हे आताच सांगणे मुशकील आहे. त्यामुळे सगळ्याच नागरिकांनी सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून आपला वावर सुरक्षित ठेवला पाहिजे. विशेष म्हणजे येत्या काळात दिवाळीच्या सणांनिमित अनेक नागरिक घराबाहेर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर गर्दी होऊ शकते अशा काळात संभाव्य दुसऱ्या लाटेची पूर्वतयारी म्हणून आरोग्य विभाग सज्ज आहे. यामध्ये त्यांचे लक्ष 'सुपर स्प्रेडर' यांच्यावर असणार असून त्यांच्या चाचण्या करण्यावर अधिक भर देण्यात येणार आहे. सुपर स्प्रेडर म्हणजे राज्यभरात किराणा दुकानदार, दूध विक्रेते, भाजीपाला विक्रेते, छोटे-मोठे व्यावसायिक, सार्वजनिक वाहतुकीतील कर्मचारी ज्यांचा लोकांशी कायम संपर्क येते अशा ‘सुपर स्प्रेडर’ यांच्या चाचण्यांवर भर देण्याचे निर्देश क्षेत्रिय पातळीवरील यंत्रणेला देण्यात आले आहेत.

पुणे येथे प्रॅक्टिस करणारे आणि इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र अध्यक्ष डॉ अविनाश भोंडवे सांगतात की, "कोरोनाचे रुग्ण पुणे आणि मुंबईमध्ये वाढू लागले आहेत. दिवाळी सुरु होण्याच्या अगोदर रुग्णवाढीचा आलेख जो उतरणीला दिसत होता तो पुन्हा हळू-हळू वाढताना दिसत आहे. त्यामुळे नक्कीच नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. शासनाने टेस्टिंगची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविणे गरजेचे आहे. आज नागरिकांमध्ये फिरत आहे त्यांची तात्काळ चाचणी करणे महत्त्वाचे आहे. अन्यथा ते अनेक नागरिकांमध्ये हा आजर पसरवू शकतात. मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक पावले उचलण्याची गरज आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा शोध घेणे फायदेशीर ठरणार आहे. कारण मोठ्या प्रमाणात दिवाळीच्या काळात लोक रस्त्यावर उतरले होते. परिणामी अनेक ठिकाणी गर्दी दिसत होती. नागरिकांनी असे अजिबात समजू नये कोरोनाची साथ संपली आहे. मोठ्या प्रमाणात इतर राज्यात रुग्ण पाहायला मिळत आहे."


दुसरी लाट मोठ्या प्रमाणात असणार कि छोट्या प्रमाणात असणार हे सर्वस्वी नागरिकांच्या हातात आहे. जर सगळे व्यवस्थित कटाक्षाने पाळले तर नक्कीच कमी प्रमाणात रुग्णसंख्या असू शकते, आणि तसे न केल्यास मोठ्या प्रमाणात रुग्ण येतील आणि पूर्वीसारखीच परिस्थिती उद्भवू शकते. पूर्वीची कोरोनाकाळातील परिस्थिती आता परवडण्यासारखी नाही. काही दिवसात मुंबईकरांची लाइफ लाइन मानली जाणारी लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत विचार होऊ शकतो. मात्र, ती सुरु करताना नक्कीच कोरोनाच्या ह्या स्थितीचा विचार करूनच निर्णय घेण्यात येईल. सध्या सर्व राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यात आली आहे. काही प्रमाणात तेथे गर्दी होईल. त्यामुळे तज्ञांनी जी भीती व्यक्त केली होती त्याप्रमाणे ' ये तो होनाही था ' ही परिस्थिती आज उद्भवण्यास सुरवात झाली आहे. मात्र ती परिस्थिती आटोक्यात ठेवण्याची जबाबदारी नागरिकांवर आहे.


संतोष आंधळे यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग