कोरोनाबाधितांची संख्या कमी होणे म्हणजे कोरोना हद्दपार झाला असा भ्रम तयार होणे चुकीचे आहे. यापूर्वीही कोरोनाची संख्या कमी झाली होती त्यानंतर त्याच ठिकाणी कोरोनाच्या संख्येचा उद्रेक निर्माण झाल्याचे सगळ्यांनीच पहिले होते. कोरोनाचे वर्तन आजपर्यंत कुणीही सांगू शकलेले नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय हीच काळाची गरज आहे. आजही राज्यातील काही शहरात कोरोना बाधितांची संख्या ही पाच आकडी आहे. तर बहुतांश भागात चार आकडयांवर कोरोनाची संख्या वर खाली होत आहे. या संसर्गजन्य आजाराला आपण वैद्यकीय दृष्टीतून बघणे अपेक्षित आहे. सध्याच्या घडीला हजारो बाधित नागरिक रुग्णालयात उपचार घेत आहेत तर काही रुग्ण अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत व्हेंटिलेटरवर आहेत. आपल्या राज्यात आजही अनेक जण मास्क न लावता हिंडत असतात, राज्यात अशा मास्क न लावणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. लोकांना शिस्त लावण्याचे काम सुरु आहे. जोपर्यंत कोरोनविरोधात लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत सध्याच्या घडीला या आजारापासून दूर राहण्यासही मास्क हे एकमेव शस्त्र सध्या उपलब्ध आहे. जगभरात नागरिक मास्क लावून फिरत आहेत. आपल्याकडे हळू-हळू आरोग्य साक्षरता निर्माण होत आहे. आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी लागते ही समज नागरिकांमध्ये येत आहे.
आता तरी देवा मला पावशील का ?
सुख ज्याला म्हणत्यात ते दावशील का ?
आज या मराठीतील अजरामर गाण्याच्या ओळी आठवतात. कारणही तसेच आहे, राज्यातील प्रार्थनास्थळे उघडावीत म्हणून आंदोलने केली जात आहेत. शासन का नाही सुरु करत प्रार्थनास्थळं ? याचं उत्तर वैद्यकीय पातळीवर शोधणे गरजेचे वाटते. नागरिकांचं सुख कशात आहे ? निरोगी राहण्यात. मार्च महिन्यापासून अनेक सण साधेपणाने साजरे केले. तरीही गणपती उत्सव संपल्यानंतर काही प्रमाणात रुग्णसंख्येत वाढ झालीच होती. शासन टप्प्या-टप्प्याने सगळ्याच गोष्टी उघडत आहे. त्याप्रमाणे प्रार्थनास्थळेही उघडली जावीत ही भावना असणे रास्त आहे. काही दिवसाने शासन प्रार्थना स्थळं उघडतीलच. थोड्या फार प्रमाणात परिस्थिती आटोक्यात येत असल्याचे सध्या चित्र दिसत असले तरी कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही. बार आणि हॉटेल्स सुरु झाली आहेत. मुंबईकरांची लाईफ लाईन मानली जाणारी लोकल ट्रेन सर्वसाधारण नागरिकांसाठी बंदच आहे. केवळ अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यासाठी ट्रेनने प्रवास करण्यास मुभा दिलेली आहे. कोरोनाच्या अनुषंगाने शिथिलता देण्याचा विषय राजकीय दृष्टीने न हाताळता वैज्ञानिक स्तरावर कशा पद्धतीने टिकू शकेल याचा विचार करण्याची गरज आहे.
याप्रकरणी, राज्य कोरोना विशेष कृती दलाचे सदस्य डॉ शशांक जोशी सांगतात की, "काही दिवसाने हिवाळा सुरु होणार त्या काळात कोरोना कशा पद्धतीने वाढेल त्याचे अनुमान आताच सांगणे कठीण आहे. कृती दलाने प्रार्थनास्थळे कशा पद्धतीने सुरु करावी आणि किती काळजीपूर्वक उघडावी याच्या काही सूचना दिल्या आहेत. सध्या कुठे आपली परिस्थिती सुधारत आहे. सगळ्या गोष्टी टप्प्या टप्प्याने सुरु कराव्याच लागणार आहे त्यात प्रार्थनास्थळं आलीच ती सुरु करताना विशेष अशी काळजी घ्यावीच लागणार आहे. त्यामध्ये लगेच घाई करून चालणार नाही.
प्रार्थनास्थळं हा श्रद्धेचा विषय आहे एकदा ती उघडली कि तिथे, मॉल आणि हॉटेल्सच्या तुलनेने विशेष गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा या गर्दीत कशा पद्धतीने लोकांनी वागावे यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. त्यामुळे शासनाने याप्रकरणी अधिक सजग राहावे लागणार आहे. आपल्याकडे अनेकवेळा कोरोना या विषयाला शास्त्रीय नजरेतून बघण्यापेक्षा राजकीय दृष्टीकोनातून बघितलं जात आणि त्याच विषयवार चर्चा केंद्रित करून मूळ सामान्य रुग्णाचे प्रश्न बाजुला पडतात. कोरोनाचं भविष्य सांगणारा ज्योतिषी अजून जन्माला यायचाय, कुणीही याच्या भवितव्याबाबत अचूक अंदाज बांधू शकलेला नाही. ज्याक्षणी कोरोना आटोक्यात आला अशी परिस्थिती निर्माण होते त्याच्या काही दिवसानंतर मोठ्या पटीने रुग्णसंख्या वाढतानाचे सगळ्यांनीच पहिले आहे.
ऑक्टोबर 7,ला ' धोका टळलेला नाही ! ' या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले होते. त्यामध्ये दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत आहे, रुग्णसंख्येचा चढता आलेख उतरणीला लागला आहे. हे वास्तव असले तरी धोका मात्र अजिबात टळलेला नाही. कारण मागील काही काळातील आपण कोरोनाचे वर्तन बघितले तर लक्षात येते की ज्या ज्या ठिकाणची कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या कमी झाली होती. त्या परिसरातील संख्या पुन्हा एकदा वाढीस लागली होती. त्यामुळे राज्यातील काही शहरात आणि जिल्ह्यात ही संख्या कमी होत असली तरी कधीही वाढू शकते त्यामुळे नागरिकांनी रुग्णसंख्या कमी झाली असून सगळं काही आलबेल झालं आहे ह्या भ्रमात कदापीच न राहता अधिक सजग राहणे गरजेचे आहे नाहीतर गफलत होऊ शकते. कोरोना रुग्ण बरे होत असले तरी अनेक रुग्ण असे आहेत कि त्यांना घरी जाऊन त्यांना वेगळ्या काही व्याधींना सामोरे जावे लागत असून वेळ प्रसंगी रुग्णालयात पुन्हा उपचाराकरिता दाखल करावे लागत आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असून त्यापासून सुरक्षित राहायचे असल्यास सध्याच्या घडीला एक उपाय आहे तो म्हणजे सुरक्षिततेचे नियम पाळणे. कोरोनाची पहिली लाट येऊन गेली आहे, ही दुसरी लाट आहे, की आता पिक आहे हे शास्त्रीय आधारावर अजून कुणी सांगू शकलेले नाही, प्रत्येक जण आराखडे बांधत आहे. त्यामुळे कोरोना येत्या काळात कसा वागेल याचा थांगपत्ता कुणालाच नाही. अर्थव्यवस्था हळू हळू पूर्वपदावर येण्यासाठी काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे त्याचा कुणीही गैरफायदा न घेता केवळ आवश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे, कारण कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही.
राज्यात आजच्या घडीला सर्वच कोविडसाठी स्वतंत्र उपचार देणारे रुग्णालय आजही भरलेले आहेत. अनेक रुग्ण या कोरोनाच्या साथीमुळे खूप दिवसांपासून रखडलेल्या प्लान करून ठेवलेल्या शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयात न येणेच पसंत करत आहेत. अजूनही आरोग्यच्या दृष्टीने वातावरण सुरक्षित झालेले नाही. बहुतांश नागरिकांच्या मनात कोरोनाविषयी आजही भीती आहे. सोमवारी राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सध्याच्या घडीला 2 लाख 12 हजार 439 अॅक्टिव्ह रुग्ण असून विविध ठिकाणी उपचार घेत आहे. देशातही स्थिती तशाच पद्धतीने आहे. शासनाला प्रत्येक पाऊल टाकताना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. कारण हा थेट नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. फक्त प्रार्थनास्थळं उघडणेचे नव्हे, तर ती सुरु करण्याआधी मोठ्या नियोजनाची आवश्यकता आहे. प्रार्थना स्थळं सुरु होणे गरजेचे आहे, कारण त्यावर आधारित अशी मोठी रोजगाराची व्यवस्था आजच्या घडीला अडचणीत आली आहे त्यांचाही विचार शासन निश्चितच करत असेल यामध्ये दुमत नाही. त्याचप्रमाणे कोणती गोष्ट सुरु केल्यावर त्याचे काय संभाव्य परिणाम होऊ शकतात याचीही चाचपणी प्रशासनाने केली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासन याबाबत योग्य तो लवकरच निर्णय घेईल अशी आशा आहे.
2009 सालात आलेल्या स्वाईन फ्लू या साथीचे आजही रुग्ण मिळत आहे. त्यामुळे कोरोना असा तात्काळ नाहीसा होणार आजार नाही हे आपण सगळ्यांनीच मान्य केले पाहिजे. या पूर्वी अनेक वैद्यकीय तज्ञांनी जाहीरपणे सांगतिले आहेच की कोरोनाची साथ कधी संपेल कुणालाही ठाऊक नाही. त्यामुळे जो पर्यंत कोरोना बाधितांची रुग्णवाढ मोठ्या पद्धतीने थांबत नाही किंवा मृत्यूचा आकडा नगण्य होत नाही तोपर्यंत सगळ्यांनीच काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना हा आजार ज्यांना झालाय त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना याची दाहकता अधिक तीव्रतेने जाणवत असेलच. त्यामुळे राज्यात कोरोना आहे हे न विसरता नागरिकांनी सुरक्षित वावर ठेवणे काळाची गरज आहे.
संतोष आंधळे यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग
- BLOG | प्राणवायूची पुण्या-नाशिकात दमछाक!
- BLOG | 'टेक केअर' पासून 'RIP' पर्यंत...!
- BLOG | कोरोनाचे आकडे बोलतात तेव्हा...
- BLOG | फिजिओथेरपीचं योगदान महत्वाचं!
- BLOG | 'डेक्सामेथासोन'!
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
- BLOG | कोरोना, टोळधाड अन् चक्रीवादळ कसं जगायचं!
- BLOG | खासगी रुग्णालयाचं 'हे' वागणं बरं नव्हं
- BLOG | रुग्णसंख्या आवरणार कशी?
- BLOG | रोगाशी लढायचंय, आकडेवारीशी नाही !
- BLOG | 'ती' पण माणसूच आहे
- BLOG | पुण्याची तब्बेत सुधारतेय, पण..
- BLOG | सावधान! मेनूकार्ड बघण्यापूर्वी इथे लक्ष द्या
- BLOG | बेफिकिरी नको, धोका टळळेला नाही...!