कोरोनाच्या रुग्णांच्या आणि मृतांच्या आकडेवारीच्या उच्चाकांचा खेळ पाहणारे राज्यातील दोन प्रमुख जिल्हे ते म्हणजे पुणे आणि मुंबई. दोन्ही जिल्ह्यांनी दिवसभरातील रुग्णसंख्या आणि मृत व्यक्तीच्या संख्याचा उच्चांक आकडेवारीचा अनुभव घेतला आहे. सर्वात जास्त कोरोनाचा प्रादुर्भाव या दोन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळापासून राज्यात सगळ्यात जास्त रुग्णसंख्या असणारा जिल्हा म्हणजे मुंबई हाच होता, कालांतराने या कोरोनाच्या या हॉटस्पॉटची जागा पुण्याने घेतली, अचानकपणे रुग्णसंख्या वाढली रुग्णांना बेड मिळेनासे झाले. मात्र, काही दिवसांपासून पुण्याची तब्बेत सुधारतेय म्हणायला हरकत नाही, अशी परिस्थिती आहे. मात्र, धोका निश्चितच टळलेला नाही. याचे कारण सोपे आहे कारण आजही या जिल्ह्यात रुग्णांच्या उपचारात वापरण्यात येणाऱ्या ऑक्सिजनचा वापर मोठ्या प्रमाणात करणारा जिल्हा म्हणून पुणे राज्यात क्रमांक एक वर आहे. याचा अर्थ या जिल्ह्यात असणाऱ्या रुग्णांना बऱ्यापैकी ऑक्सिजनची गरज आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सध्याचा घडीला 57 हजार 682 अॅक्टिव्ह रुग्ण केवळ पुणे जिल्ह्यात असून ती राज्यात सर्वाधिकच आहे. त्यामुळे रुग्णसंख्या कमी होत असली तरी पुणेकरांनी सावध राहण्याची गरज आहे.
अन्न आणि औषध प्रशासन विभागाने 2 ऑक्टोबर रोजी राज्यात कोरोना रुग्णांना उपचार करणाऱ्या रुग्णालयात ऑक्सिजन वापराची माहिती जिल्हानिहाय दिली आहे. त्यामध्ये केवळ एकट्या पुणे जिल्ह्यात 209 मेट्रिक टन इतका ऑक्सिजनचा वापर केला गेला आहे. साहजिकच रुग्णसंख्या जास्त असल्याने याचा वापर मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यात होत आहे. शिवाय या जिल्ह्यात कोरोनाशी निगडित रुग्णलयाची संख्याही अधिक असून ती 208 इतकी आहे. त्या खालोखाल मुंबई जिल्ह्याचा ऑक्सिजनचा वापर अधिक प्रमाणात होत असून 105.54 मेट्रिक टन ऑक्सिजन रुग्णांसाठी वापरण्यात आला असून या जिल्ह्यातील कोरोना रुग्णालयांची संख्या 75 इतकी असून पुण्याच्या तुलनेनं तशी कमीच आहे.
"हे खरंय संपूर्ण जिल्ह्यातील रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र, त्याचवेळी आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की ऑक्सिजन लागणाऱ्या रुग्णांचे प्रमाण मुंबईच्या तुलनेत पुणे जिल्ह्यात अधिक आहे. याची विविध कारणे असू शकतात. पहिलं म्हणजे पुणे जिल्ह्यात केवळ याचं जिल्ह्यातील रुग्ण नसून आजूबाजूच्या जिल्ह्यातून रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. त्यामुळे रुग्ण संख्या अधिक आहे. शिवाय अनेक रुग्ण हे आजार अंगावरच काढत असतात, आणि अधिक गंभीर झाले की रुग्णालयांकडे धाव घेत असतात. त्यामुळे रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत असते. जर रुग्ण वेळेवर रुग्णालयात आले तर ऑक्सिजनचा वापर करावयाची गरज भासणार नाही. औषधउपचाराने ते बरे होऊन घरी जाऊ शकतात. त्यामुळे कुणीही लक्षणे दिस्लायस तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणे अपेक्षित आहे. लोकांनी आजार होऊन घाबरण्यापेक्षा हा आजार होऊ नये म्हणून जे सुरक्षिततेचे नियम आहे, त्याला घाबरून ते व्यवस्थित पाळले पाहिजे, म्हणजे आपोआपच या आजाराचा प्रादुर्भाव थांबायला मदत होईल." असे, डॉ. स्वप्नील कुलकर्णी सांगतात. ते सध्या पुणे येथील केइएम रुग्णालयाचे श्वसनविकार तज्ञ म्हणून कार्यरत आहेत.
राज्यात 14 लाख 16 हजार 513 रुग्ण कोरोना आजाराने प्रभावित झाले असून त्यापैकी 11 लाख 17 हजार 720 रुग्ण होऊन घरी गेले आहेत. तर 37 हजार 480 नागरिकांचा या आजराने मृत्यू झाला आहे. तर आजच्या घडीला राज्यातील विविध भागात 2 लाख 60 हजार 876 रुग्ण उपचार घेत आहेत. पुण्यातील रुग्णसंख्या मंदावली असली तरी मुंबईच्या दैनंदिन रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र राज्यात सध्या पाहायला मिळत आहे. मुंबई मध्ये दिवसभरात 2 हजार 440 रुग्ण सापडले असून पुन्हा एकदा मुंबईच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. राज्य शासनाने राज्यात 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहीम सुरु केली आहे. त्यात घरोघरी जाऊन रुग्णाची तपासणी केली जात आहे.
सह्याद्री हॉस्पिटल येथे श्वसनविकार तज्ञ म्हणून रुग्णांना उपचार देणारे डॉ. विशाल मोरे सांगतात की, "पहिली गोष्ट म्हणजे येथे पुणे जिल्ह्यात रुग्ण अगदी गंभीर झाला कि डॉक्टरांकडे येण्याचं प्रघात आतापर्यंत दिसून आला आहे. त्यानंतर अधिक महत्त्वाचे म्हणजे स्वतः मेडिकलमध्ये जाऊन औषध घेत आहे. अर्धवट उपचार घेत आहेत. डॉक्टरांना भेटून योग्य तो वैद्यकीय सल्ला घेणे अपेक्षित आहे. त्यामुळे अनेकवेळा घरी उपचार घेऊन अधिक अस्वस्थ झाल्यावर ते डॉक्टरांकडे येतात आणि त्यांना मग ऑक्सिजनची गरज भासू लागते. त्यामुळे नागरिकांनी लक्षणे दिसल्यावर घरी वेळ न दवडता योग्य त्या तज्ञांकडून उपचार घ्यावेत. तसेच पुण्यात बाहेरच्या जिल्ह्यातून रुग्ण येण्याचे प्रमाण अधिक आहे त्यामुळे सर्वात अधिक रुग्ण संख्या पुणे जिल्ह्यात दिसत आहे."
28 जुलैला 'पुणे करूया 'उणे' या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले होते. यावेळी पुण्याची रुग्णसंख्या भरमसाट प्रमाणात वाढली होती. त्यामध्ये राज्यात कोरोनाची साथ सुरु झाल्यापासून मुंबई शहर हा कोरोनाचा हॉटस्पॉट झाला होता. सगळ्या देशाचे लक्ष मुंबईच्या 'तब्येतीकडे' होते. काही दिवसांपासून थोड्या फार प्रमाणात का होईना मुंबईच्या प्रकृतीत सकारात्मक बदल दिसायला सुरुवात झाली आहे. मात्र, या हॉटस्पॉटची जागा आता बदलली असून मुंबई नजीकच्या पुणे जिल्ह्यात कोरोनाने तांडव करण्यास सुरवात केली आहे. गेल्या काही दिवसापासून पुण्यातील रुग्णसंख्या वाढण्याचे प्रमाण अधिकच वाढले आहे. पुणे शहर आणि जिल्हा ज्या पद्धतीने बदलत गेला, त्या पद्धतीने तेथील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मात्र जैसे थे आहे. काही खासगी रुग्णालये सोडली तर शासनाने कींवा महापालिकेने फार क्रांतिकारक बदल आरोग्य व्यस्थेत केलेले दिसत नाहीत. खरं तर पुण्याला साथीचे आजार नवीन नव्हे, मात्र तरीही यावेळच्या संसर्गजन्य आजाराने या जिल्ह्याला अधिकच छळले आहे. अनेक साथीच्या आजाराचे केंद्र सुरुवातीपासून पुणेच राहिले आहे. इतिहास कालीन प्लेग, स्वाईन फ्लू आणि आता कोरोना या आजाराची सुरवात पुण्यातूनच झाली आहे. विशेष म्हणजे सध्या संपूर्ण देशात जो साथरोग नियंत्रण कायदा 1897 लागू करण्यात आला आहे. त्याची निर्मितीच मुळात 1896-97 च्या पुण्यातील महाभयंकर प्लेगच्या साथी नंतर करण्यात आली आहे. सध्याच्या घडीला कोरोनाने प्रशासन व्यवस्थेपुढे मोठे आव्हान उभे केले.
जोशी हॉस्पिटल येथे भूलतज्ञ म्हणून काम करणारे डॉ. काशिनाथ बांगर गेले अनेक दिवस कोरोनाचे रुग्ण असलेल्या अतिदक्षता विभागात काम करीत आहे. ते सांगतात कि, "मुळात शासनाने हा कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणूं काही सुरक्षिततेचे नियम बनवून दिले आहेत ते पाळत नाही. अनेक तरुण पुण्यात फिरताना फाजील आत्मविश्वास बाळगत रस्त्यांवर हिंडत असतात. अशा प्रवृत्तीची लोकं हा समाजासाठी धोका आहे. रुग्णाला उपचार मिळतील परंतु तो आजार होऊ नये यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय घेण्याची गरज आहे ते आजही काही नागरिक घेताना दिसत नाही. माझा वैयक्तीक अनुभव आहे माझ्या क्लिनिकमध्ये एकजण मास्क न घालता आला होता. कारण काय तर विसरलो, असे बेफिकिरीने वागणे किती धोकादायक असू शकते याची त्यांना कल्पना पण नसते. अनेक लोकांचा जीव यामुळे अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने अशा मास्क न घालणाऱ्या लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे असे माझे मत आहे. त्या शिवाय पुण्याची संख्या आता हळूहळू कमी होत आहे. मात्र, यापूर्वी गंभीर म्हणून दाखल झालेले रुग्ण आहेत ते अजूनही रुग्णालयात आहे. त्यामुळे वैद्यकीय ऑक्सिजन वापराचे प्रमाण पुणे जिल्ह्यात जास्त आहे. नागरिकांनी सहकार्य केले तर नक्कीच पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होण्यास मदत होणार आहे."
पुण्यातील रुग्णसंख्या कमी होणे चांगले संकेत असले तरी वास्तवात परिस्थिती अजूनही गंभीर आहे हे विसरून चालणार नाही. दैनंदिन रुग्णसंख्या कमी होणे सध्या काळाची गरज आहे. मात्र नागरिकांनी सजग राहिले पाहिजे. कारण मुंबईची रुग्णसंख्या कमी होती ती आता पुन्हा त्यात वाढ दिसू लागली आहे, असे काहीसे चित्र राज्यातील विविध भागात दिसत आहे. यावरून एक अर्थ लक्षात घेतला पाहिजे कि रुग्णसंख्या जी कमी झाली आहे, ती कायम तशीच राहील अशी कोणतीही खात्री कुणालाच देता येणार नाही. त्यामुळेच राज्यातील सगळ्यांच नागरिकांनी या काळात काळजी घेणे गरजेचे आहे कारण धोका अजून टळलेला नाही.
संतोष आंधळे यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग
- BLOG | प्राणवायूची पुण्या-नाशिकात दमछाक!
- BLOG | 'टेक केअर' पासून 'RIP' पर्यंत...!
- BLOG | कोरोनाचे आकडे बोलतात तेव्हा...
- BLOG | फिजिओथेरपीचं योगदान महत्वाचं!
- BLOG | 'डेक्सामेथासोन'!
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
- BLOG | कोरोना, टोळधाड अन् चक्रीवादळ कसं जगायचं!
- BLOG | खासगी रुग्णालयाचं 'हे' वागणं बरं नव्हं
- BLOG | रुग्णसंख्या आवरणार कशी?
- BLOG | रोगाशी लढायचंय, आकडेवारीशी नाही !
- BLOG | 'ती' पण माणसूच आहे