संपूर्ण भारतात कोरोनाबाधितांची संख्या आणि प्रादुर्भाव रोखण्याकरिता देशपातळीवर विविध उपाययोजना केल्या जात आहे. आपली आरोग्य यंत्रणा कोरोनाबाधितांवर उपचार करण्याबरोबरच त्याचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिताही दक्ष असून त्याचवरही त्यांनी काम सुरु केले आहे. गेल्या काही दिवसात राज्यातील रुग्ण संख्या सातत्याने वाढत आहे. अजूनही आपण दुसऱ्या टप्प्यात आहोत. मात्र, कोरोनाच्या संसर्गाचा फैलाव देशात किती प्रमाणात झाला आहे तसेच विषाणूचा प्रसार कशा पद्धतीने होत आहे, याची माहिती मिळविणे गरजेचं आहे. याकरिता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि राष्ट्रीय क्षयरोग संशोधन केंद्राने 21 राज्यातील 69 जिल्ह्यात स्वैर (रँडम) चाचणी करण्याचे ठरविले असून याकरिता आपल्या राज्यातील बीड, नांदेड, परभणी, जळगाव, अहमदनगर, सांगली या जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. यामुळे एक प्रकारे देशातील संसर्गाची चाचपणी होणार आहे. या सर्वेक्षणातुन मिळालेल्या निकालाची कोरोनासंदर्भांतील पुढील दिशा ठरविण्यासाठी मदत होऊ शकते.


या सर्वेक्षणात प्रत्येक जिल्ह्यातील 400 नागरिकांचे रक्ताचे नमुने घेऊन आयजीजी (इम्युनोग्लोबीन) एलिसा चाचणी करण्यात येणार आहे. यामुळे या चाचणी करण्यात येणाऱ्या नागरिकांच्या शरीरात प्रतिकारक शक्ती बहाल करणाऱ्या पेशी (अँटीबॉडीज) निर्माण झाल्या आहे का? त्याचे प्रमाण किती आहे?, तसेच त्यांना यापूर्वीच कोणत्या विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे का? हे कळण्यात मदत होणार आहे. ही चाचणी काही दिवसापूर्वीच, पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) कोविड-19 साठी अँटीबॉडीज शोधण्यासाठी स्वदेशी आयजीजी एलिसा चाचणी विकसित आणि प्रमाणित केली आहे त्यांच्या साहाय्याने होणार आहे. संसर्गाच्या संपर्कात असलेल्या लोकसंख्येचे प्रमाण समजून घेण्यासाठी, देखरेखीसाठी तसेच विषाणूचा संक्रमण किती प्रमाणात होत आहे याकरिता अँटीबॉडीज चाचणी महत्त्वपूर्ण आहे.


कोणत्याही विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर शरीरातील प्रतिकारशक्ती अधिक क्रियाशील होते. या विषाणूचा सामना करण्यासाठी प्रतिकारक शक्ती बहाल करणाऱ्या पेशी (अँटीबॉडीज) तयार होतात. त्यामुळे ज्या रुग्णांची प्रतिकारक शक्ती बहाल करणाऱ्या पेशी (अँटीबॉडीज) चाचणी पॉजिटीव्ह येते, त्यामुळे त्या व्यक्तीला संसर्ग झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.


डॉ. मनोज मुऱ्हेकर, संचालक, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, चेन्नई, सांगतात की, "या सर्वेक्षणामुळे देशातील विविध भागात संसर्ग किती पसरला आहे याची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. सर्वेक्षण आता सुरु होत आहे, तो संपूर्ण देशातील 69 जिल्ह्यात करण्यात येणार असून तो पूर्ण झाल्यावर याबाबत अधिक माहिती मिळू शकेल."


कोविड-19 हा साथीचा आजार 214 देशांमध्ये पसरला असून एकूण 44,42,466 लोकांना याची लागण झाली असून 2,98,322 जण मृत्यूमुखी पडले आहेत. जगभरातील देशांकडून विविध प्रकारच्या निदान चाचण्यांची वाढती मागणी आहे. कोविड-19 साठी बहुतांश निदान सामग्री इतर देशांतून भारतात आयात केली जाते. म्हणूनच भारतीय वैज्ञानिक कोविड-19 ला कारणीभूत असलेल्या सार्स -सीओव्ही -2 साठी स्वदेशी निदान पद्धती विकसित करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत.

ज्या चीन देशातून या कोरोना विषाणूची सुरुवात झाली त्या देशाची रुग्णसंख्या सध्याच्या घडीला 82 हजार 929 इतकी असून यात 4, 633 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना रुग्णसंख्येचं आकडा रोखण्यात यश प्राप्त झाले आहे.


भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 78 हजारांच्या वर गेली असून 2,549 व्यक्ती आजारामुळे मृत झाले आहेत. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या 25,922 असून, त्याखालोखाल गुजरात मधील रुग्णांची संख्या 9,267 असून तामिळनाडू मध्ये हीच संख्या 9,227 तर दिल्लीमध्ये 7,998 आणि राजस्थानमध्ये 4,328 इतकी रुग्ण संख्या आहे. इतर राज्यातील रुग्णांची संख्या यापेक्षा कमीच आहे.


याप्रकरणी राज्याच्या आरोग्य विभागाचे, राज्य सर्वेक्षण अधिकारी, डॉ प्रदीप आवटे सांगतात की, "या सर्वेक्षणातील माहितीची नक्कीच मदत आरोग्य यंत्रणेला मदत होणार आहे. त्यामुळे कोणत्या गोष्टींवर अजून जास्त लक्ष देण्याची गरज याचे नियोजन करण्यास फायदा होईल. हे सर्वेक्षण देशातील विविध भागात होणार या करितील राज्यातील काही जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे."


तीन दिवसानंतर लॉकडाउनचा तिसरा टप्पा संपणार असून आपण चौथ्या टप्प्यात प्रवेश करणार आहोत. यावेळी चौथा लॉकडाउन कशापद्धतीने असणार आहे यावर अजूनतरी कोणतीही स्पष्टता करण्यात आलेली नाही. मात्र देशातील सर्वच राज्य लॉकडाउन बाबत शिथिलता कशा प्रकारे करावी याचं नियोजन करताना वाढती रुग्णसंख्येचा विचार निश्चित करतीलच. एकंदर ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर नागरिकांनी जराही न घाबरता सजग राहणायची नितांत गरज आहे. त्याचबरोबर सुरक्षिततेसाठी आखून दिलेल्या सर्व नियमांचं पालन केल्यास कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवण्यात यशस्वी होऊ.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग