बंदी केली तरी विरोध, नाही केली तर शासनाला आरोग्याच्या आणीबाणीचा अलर्ट कळला नाही म्हणून टीका. अशा दुहेरी कात्रीत महाराष्ट्र शासनाचा संचारबंदीच्या निर्णयाबाबत विविध तर्क वितर्क लढवले जात आहे. अनेक स्तरांतून यावर विविध मतमतांरे आहेत. मात्र, अशापद्धतीने वेळीच उचललेलं प्रतिबंधात्मक पाऊल त्याचाच एक भाग म्हणजे रात्रीची संचारबंदी काहींना तकलादू वाटत आहे. कोरोनाच्या अनुषंगाने राज्यातील व्यवस्थेबाबत निर्णय घेताना वैद्यकीय दृष्टिकोन ठेऊन निर्णय घेणे क्रमप्राप्त आहे. कारण शेवटी कोरोनाच्या या संसर्गजन्य आजाराचा थेट राज्यातील नागरिकांचा आरोग्याशी प्रश्न निगडित आहे. कोरोनाच्या या रोगट वातावरणावर आरोग्य यंत्रणेचा नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने प्रवास सुरु असताना कोरोनाच्या या नवीन विषाणूचा अवतार निर्माण झाला. त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारने तात्काळ कडक पावले उचलली. नवीन विषाणूचा उगम असणाऱ्या देशातुन येणाऱ्या हवाई वाहतुकीस बंदी, तर देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत अव्वल असणाऱ्या महाराष्ट्र राज्याने महापालिकांच्या परिसरात रात्रीची संचार बंदी लावली.
अर्थ व्यवस्था सुरळीत होत असताना त्यावर अधिक जाचक बंधने न लावता, सद्य परिस्थिती लक्षात घेऊन नवीन वर्षासाठी होणाऱ्या स्वागताची पूर्वपार चालत आलेली पद्धत आणि नाताळ सणानिमित्त या दोन गोष्टीमुळे रात्री रस्त्यांवर, उपहारगृहात मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी आणि त्यातून होणारे दुष्परिणाम रोखण्याकरिता रात्रीची संचार बंदी असावी, असे म्हणायला काहीच हरकत नाही. तसेच वर्ष सरतेवेळी अनेक नागरिक पर्यटनाकरिता राज्याच्या विविध भागात आपल्या स्वकीयांसह जात असतात. त्या ठिकाणी मोठी गर्दी उसळत असते. ह्या गर्दीत अनेकवेळा सुरक्षिततेच्या नियमांचा फज्जा उडतोच. गेले 10 महिने सर्वच सण-सोहळे कोरोनाच्या सावटाखाली साधेपणाने साजरे होत आहेत. शासनाच्या आवाहनाला सर्वच स्तरातून योग्य प्रतिसाद आतापर्यंत मिळत आला आहे. संचारबंदीचा शासनाला फायदा होणार आहे का? तर याचे साधे उत्तर नाही असेच आहे. मात्र, नवीन विषाणू जो परदेशात सापडला आहे, त्या पार्श्वभूमीवर गर्दी कशी कमी करता येईल. यासाठी शासन नागरिकांना जास्त त्रास न देता विविध उपाय धुंडाळत असते. दिवसाची संचारबंदी करणे सध्याच्या घडीला परवडणारे नाही. कारण हळू-हळू जीवनमान आता पूर्वपदावर येत आहे. रात्रीच्या संचारबंदीतून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक वैद्यकीय उपचारासाठी आणि औषधासाठी नागरिकांना बाहेर जाताच येणार आहे. मात्र, जी अनाठायी गर्दी होते, जी टाळणे शक्य आहे त्याचा फारसा लोकांच्या जीवनमानावर परिणाम पडणार नाही, अशा गर्दीला काही काळासाठी थांबविण्यात आले आहे.
राज्य कोरोना विशेष कृती दलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक सांगतात कि, "सध्याचे दिवस पाहता रात्रीच्या काळात क्लब आणि पब्ज मध्ये मोठं मोठ्या पार्ट्याचे आयोजन होत असते, परिणामी गर्दी ही मोठ्या संख्येने होते. त्या ठिकाणी मद्याचे सेवन होत असते. अशावेळी कोरोनाच्या अनुषंगाने जे नियम आखून दिले आहेत त्याचे पालन होत नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे गर्दी कशा पद्धतीने टाळता येईल त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, त्यासाठी ही संचारबंदी असावी. त्याचप्रमाणे सध्या जो नवीन विषाणूचा अवतार सापडला आहे, त्याच्याबाबत सध्या जी माहिती उपलब्ध आहे ती अशी कि, त्याचा प्रसार फार वेगाने होतो. मात्र, त्याची तीव्रता फार नसल्याचे कळत आहे. आपल्याकडे आजतायगायत या विषाणूचा कुठलाही रुग्ण आढळून आलेला नाही. सध्या या विषाणूबाबत आपल्याकडे कोणतेही असे ठोस पुरावे नाहीत. मात्र, आपली आरोग्य यंत्रणा सध्या बारकाईने या गोष्टींवर लक्ष ठेवून आहे. पुढच्या 10-15 दिवसांत या नवीन विषाणूच्या बाबतीतील चित्र अधिक स्पष्ट होईल."
साथीचे आजार जेव्हा येतात त्यावेळी विविध प्रकारचे प्रतिबंधात्मक पावले त्या वेळेचे संबंधित प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा उचलत असते. विशेष म्हणजे या सर्व निर्णयाचा सर्व सामान्य जनतेतून विरोध होत असतो. कारण ते निर्णय लोकप्रिय किंवा नागरिकांना आवडणारे नसतात. मात्र, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असतात. त्याचप्रमाणे विलगीकरण आणि अलगीकरण हे दोन महत्त्वपूर्ण निर्णय कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात घेण्यात आले. सुरुवातीला अनेक नागरिकांनी याला विरोध केला. मात्र हळूहळू ज्यावेळी याचे फायदे लक्षात आले तेव्हा नागरिक स्वतःहून या गोष्टीची अंमलबजावणी करू लागलेत. साथीच्या आजारात घेण्यात आलेले निर्णय हे काही वेळेस रोगापेक्षा इलाज भयंकर असे असतात. मात्र, ते तशा स्वरूपचा इलाज करणे गरजेचे असते. त्याला त्यावेळी दुसरा पर्याय नसतो. शासनाच्या या निर्णयामुळे, दिवाळीनंतर नागरिकांमध्ये कोरोना संपल्याचे चित्र निर्माण झाले होते. कारण कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात कमी झाला होता आणि मृतांच्या आकड्याचे प्रमाण त्या तुलनेने कमी झाले होते. त्यामुळे बहुतांश ठिकाणी आलबेल झाल्यासारखे वातावरण होते. लस येण्याच्या बातमीने नागरिकांच्या मनातील आनंद द्विगुणित झाला होता. आता सगळे मस्त झालं आहे, या धुंदीत पर्यटनाचे, पार्ट्यांची तयारी सुरु झाली होती. त्यातच या नवीन विषाणूच्या बातमीने थोड्या प्रमाणात का होईना 'कोरोनाचा विसर पडल्याच्या वातावरणाला' ब्रेक लागला, पुन्हा एकदा कोरोनाच्या सुरक्षिततेच्या नियमाची उजळणी सुरु झाली. या नवीन प्रजातीच्या निमित्ताने कोरोनापासून सावध राहण्यासाठी कुटुंबांमध्ये, मित्र-मैत्रणीत, सहकाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा चर्चेच्या फैरी झडू लागल्या. व्हाट्सअप ग्रुप पुन्हा एकदा कोरोनाच्या चर्चाने 'गरम' झाला. 'नव्याने' कोरोनाची जनजागृती झाली.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांच्या मते, कोरोनासारख्या साथीच्या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी लोकप्रिय निर्णय न घेता शास्त्रीय दृष्टिकोनातून निर्णय घेणे अपेक्षित असतात. त्या निर्णयास लोकांचा विरोध असूही शकतो. मात्र, त्या निर्णयांमधून नागरिकांचे किमान आरोग्य हित साधले जाईल याचा विचार करणे गरजेचं असतं. रात्रीच्या संचारबंदीमुळे पूर्ण नाही पण मर्यादित यश नक्कीच मिळेल. कारण ज्या काळात ही संचारबंदी लावली आहे त्याकाळात मोठ्या प्रमाणात नागरिक रात्री घराबाहेर पार्ट्यासाठी बाहेर पडणार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या अशा अनाठायी गर्दीवर आळा मिळविणे प्रशासनाला शक्य होणार आहे. परिणामी, कोरोनाच्या प्रसाराला थोड्या प्रमाणात का होईना थांबविण्यास मदत होईल. दिवसाची संचारबंदी शक्य नाही. त्यामुळे विनाकारण होणारी रात्रीच्या वेळेची गर्दी टाळण्यासाठी संचारबंदी योग्य निर्णय असावा असे मला वाटते."
महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक सरकाने रात्रीची संचारबंदी काही दिवसांकरिता घोषित केली आहे. संचारबंदीमुळे नवीन वर्षाच्या निमित्ताने होणाऱ्या अनाठायी गर्दीवर नियंत्रण मिळविण्यास नक्कीच मदत होईल. गेल्या 2020 या वर्षातील कोरोनाची कुठलीही आठवण न घेता 2021 या नवीन वर्षाचे स्वागत करण्याचे सर्वांचे मनसुबे या नवीन प्रजातीच्या कोरोनाने धुळीस मिळाले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये विशेषतः तरुणांमध्ये कमालीचा असंतोष व्यक्त होत आहे. कोरोनाचे बऱ्यापैकी वातावरण निवळण्यास राज्यात सुरुवात झाली होती. मात्र, या सगळ्या सुखकर वातावरणात या कोरोनाच्या नवीन प्रजतीमुळे मिठाचा खडा टाकला गेला. मजा-मस्तीवर आलेलं बंधन कुणालाच आवडत नाही. मात्र, कोरोनाच्या या संसर्गजन्य आजारामुळे गेले वर्षभर अनेक उत्सवांवर आणि नागरिकांच्या उत्साहावर विरजण पडत आले आहे. गेल्यावर्षी सहन केलेल्या दुःखाची झलकसुद्धा नवीन वर्षात येऊ नये अशी अपेक्षा बाळगून ही बंदी शेवटची ठरावी.
संतोष आंधळे यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग
- BLOG | 'टेक केअर' पासून 'RIP' पर्यंत...!
- BLOG | कोरोनाचे आकडे बोलतात तेव्हा...
- BLOG | फिजिओथेरपीचं योगदान महत्वाचं!
- BLOG | 'डेक्सामेथासोन'!
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
- BLOG | कोरोना, टोळधाड अन् चक्रीवादळ कसं जगायचं!
- BLOG | खासगी रुग्णालयाचं 'हे' वागणं बरं नव्हं
- BLOG | रुग्णसंख्या आवरणार कशी?
- BLOG | रोगाशी लढायचंय, आकडेवारीशी नाही !
- BLOG | 'ती' पण माणसूच आहे
- BLOG | पुण्याची तब्बेत सुधारतेय, पण..
- BLOG | सावधान! मेनूकार्ड बघण्यापूर्वी इथे लक्ष द्या
- BLOG | बेफिकिरी नको, धोका टळळेला नाही...!
- BLOG | अरे, राज्यात कोरोना आहे!
- BLOG | आला थंडीचा महिना, मला लागलाय खोकला!
- BLOG | ये तो होनाही था!
- BLOG | कोरोनाचा सिक्वेल येणार
- BLOG | गुड न्युज! प्रतीक्षा संपली
- BLOG | 2021 : लसीकरणाच्या नावानं चांगभलं!
- BLOG | मृत्यूदर कमी होतोय!