देशात आणि राज्यात लसीकरण सुरु होऊन महिना होत आला आहे. आता तर लसीकरणाच्या दुसरी फेरीची सुरुवात होत आहे. मात्र, राज्यात कोरोनाचा आलेख जो उतरणीला होता तो पुन्हा वर गेला आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यभरात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे हे आता स्पष्ट झाले आहे. काही दिवसाचे राज्यातील वातावरण पाहिले तर नागरिकांनी कोरोनाला खूपच 'हलक्यात' घेतल्याचे चित्र सध्या राज्यभर पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे शासनाने सुरक्षिततेचे जे नियम आखून दिले ते आता केवळ औपचारिक ठरावेत अशा पद्धतीने त्या नियमांची अंमलबजावणी होताना दिसत आहे.


मास्क तोंडायला लावायचा आहे हे विसरून तो गळ्यात घालून हिंडणाऱ्याची संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. सोशल डिस्टन्सिंग तर लांबच राहिले आहे. सॅनिटायजरच्या बाटल्या घेऊन फिरणारे फारच कमी नागरिक दिसत आहे. एकंदरच सगळीकडे आलबेल असल्यासारखी परिस्थिती आहे. या अशा परिस्थितीत नागरिकांच्या दृष्टीने लोकलच्या वेळेत बदल केला आहे. त्यामुळे साहजिकच लोकलमधून प्रवास करणाऱ्याची संख्या वाढली आहे, तशीच परिस्थिती सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत दिसत आहे. महाविद्यालये आणि शाळा सुरु होण्याच्या मार्गावर आहेत. खरं तर जेव्हा कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे, अशा वातावरणात सगळ्यांनी आणखी नियमांचे कडक पालन त्याला हद्दपार करण्यासाठी एकत्रित होणे अपेक्षित असताना सध्या होणारी वाढ भविष्यातील 'धोक्यास' कारणीभूत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.


कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी त्यात एक जमेची बाजू म्हणजे या आजारामुळे मृत्यूमुखी होणाऱ्याचे प्रमाण त्या तुलनेने फार कमी आहे. याकरिता आरोग्य व्यवस्थेतील डॉक्टरांना धन्यवाद दिले पाहिजे. कारण त्यांनी जी या आजराविरोधात उपचारपद्धतीत विकसित केली आहे. त्या उपचार पद्धतीला रुग्ण चांगले प्रतिसाद देत असल्याचे यावरून अधोरेखित होते. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. याकरिता रुग्ण वेळेवर डॉक्टरांकडे पोहचणे अपेक्षित आहे. सध्या रुग्णांची वाढती संख्या काळजी करण्याचे कारण नसले तरी अशीच परिस्थिती राहिल्यास याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे या परिस्थितीवर मात करायची असेल तर 'प्रतिबंधात्मक उपायाची' कडक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.


नागरिकांनी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन कटाक्षाने करणे क्रमप्राप्त आहे. प्रशासनाने सुद्धा या पूर्वी जे शिस्तीचे निर्बंध आणले होते त्याची कडक अंमलबजावणी केली पाहिजे. कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे नियमांचे पालन होत नाही. आजही आपल्याकडे मोठ्या प्रमाणात अजून लसीकरण झालेले नाही. आरोग्य विभागातर्फे जो दैनंदिन अहवाल प्रदर्शित केला जातो त्यानुसार, 13 फेब्रुवारी रोजी, राज्यात 3 हजार 611 नवीन रुग्णांचे निदान झाले असून 38 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर 1 हजार 773 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुबंई आणि नागपूर परिसरात जास्त रुग्णांची नोंद होत आहे.


राज्यात सध्या आरोग्य कर्मचाऱ्यांसह अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरु आहे. 13 फेब्रुवारीपर्यंत 6 लाख 83 हजार कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. त्यापैकी 5 हजार 672 लाभार्थ्यांना कोव्हॅक्सीन लसीने लसीकरण करण्यात आले आहे. 16 जानेवारीसपासून राज्यात लसीकरण मोहिमेला सुरवात करण्यात आली होती. त्याला आता जवळपास महिना पूर्ण झाला असून आता आरोग्य कामाचाऱ्यांसाठी लसीकरणाची लवकरच दुसरी फेरी सुरु होणार आहे. 28 दिवसाच्या अंतरानंतर लसीचा दुसरा डोस घेणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणं 50 वयाच्या वर आणि सहाव्याधी असणाऱ्यांना लसीकरण मार्चमध्ये देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे राज्यात अजूनही काही मोठ्या प्रमाणात लसीकरण झालेले नाही. त्यामुळे सावधानगिरीचा उपाय म्हणून सगळ्यांनी सुरक्षिततेचे नियम पाळत राहणे क्रमप्राप्त आहे.


मुंबई शहराच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे अध्यक्ष आणि केइएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ अविनाश सुपे यांच्या मते, "या अगोदरच सांगितल्याप्रमाणे जर सुरक्षिततेचे नियम पाळले नाही तर रुग्णांची संख्या वाढणार यामध्ये काही शंका नाही. कारण कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. आपण कोरोनासारख्या आजारावर नियंत्रण मिळविले आहे. मात्र, संकट कायम आहे. कारण राज्यातही आजही मोठ्या संख्येने नवीन रुग्ण निर्माण होत आहे, हे वास्तव आहे. त्यामुळे लोकांनी सध्याच्या काळात सावधगिरी बाळगत आपला वावर ठेवला पाहिजे. या अशा परिस्थितीत सुरक्षिततेचे जे नियम आखून दिले आहेत. त्याचा वापर कटाक्षाने केला पाहिजे. कारण लसीकरण जितक्या प्रमाणात होणे अपेक्षित आहे त्यापद्धतीने अजूनही झालेले नाही. त्यामुळे अजून काही काळ तरी नियम पाळले पाहिजे. अजूनही आपल्याकडे 'हर्ड इम्युनिटी' लोकांमध्ये निर्माण झालेली नाही."


फेब्रुवारी 4 ला 'कोरोनावर नियंत्रण, संकट कायम' या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले होते. त्यामध्ये, कोरोविरोधातील लस येऊन लसीकरणाच्या मोहिमेस आरंभ झाला असून काही आरोग्य कर्मचाऱ्यांनी ती लस घेतली सुद्धा, मात्र मूळ मुद्दा कायम आहे. कोरोनाच्या साथीवर नियंत्रण मिळविण्यास आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. मात्र, कोरोनाचे संकट कायम असल्याचे चित्र सध्या राज्यात पाहावयास मिळत आहे. राज्याचा आरोग्य विभाग रोज कोरोनाच्या अनुषंगाने दैनंदिन आकडेवारी प्रसारित करत असतो. त्यानुसार राज्यात बुधवारी 3 फेब्रुवारी रोजी 2 हजार 992 नवीन रुग्णांचे निदान झाले असून 30 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी बोलकी असून यामुळे आजही जवळपास 3 हजाराच्या घरात कोरोनाचे नवीन रुग्ण राज्यात सापडत आहेत. त्यामुळे कोरोनाची भीती बाळगायची गरज नसली तरी सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून सर्वांनी आपला वावर ठेवला पाहिजे हे यावरून अधोरेखित होत आहे.


त्याच दिवशी 7 हजार 30 रुग्ण बरे होऊन घरी जात असले तरी नवीन रुग्ण निर्माण होत आहे. या गोष्टीकडे कानाडोळा करून चालणार नाही, यामुळे भविष्यात मोठे धोके संभवू शकतात. डॉक्टरांनी विकसित केलेली उपचारपद्धती रुग्णांना लागू पडत असल्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. याचा अर्थ कुणी कोरोनाची साथ आता संपली असा घेत असेल तर सपशेल चूक आहे. संसर्गजन्य आजराचा कधी उद्रेक होईल हे कुणालाच आजपर्यंत सांगता आलेले नाही. त्यामुळे ज्या पद्धतीने काही नागरिक सुरक्षिततेचे धाब्यावर बसवून किमान सार्वजनिक परिसरात मास्क न लावता हिंडत आहे त्यांनी या कालच्या आकडेवारीवरून बोध घेऊन नियमांचे पालन कसे होईल याकडे लक्ष दिले पाहिजे.

आपल्याकडे काही दिवसापूर्वी कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. मात्र, याचा अर्थ कोरोना हद्दपार झाला असा होत नाही. जी आकडेवारी कमी झाली होती आता पुन्हा वाढत आहे, हे आरोग्य विभागाच्या दैनंदिन अहवालावरून सिद्ध झाले आहे. यापूर्वीही कोरोनाची संख्या कमी झाली होती. त्यानंतर त्याच ठिकाणी कोरोनाच्या संख्येचा उद्रेक निर्माण झाल्याचे सगळ्यांनीच पाहिले होते. कोरोनाचे वर्तन आजपर्यंत कुणीही सांगू शकलेले नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय हीच काळाची गरज आहे. आजही राज्यातील मुंबई शहरात कोरोना बाधितांची संख्या ही तीन आकडी आहे. तर बहुतांश भागात दोन आकड्यांवर कोरोनाबाधितांची संख्या वरखाली होत आहे. खरे तर आपण सगळ्यांनीच सावधान राहण्याची वेळ आहे. कारण हळूहळू अर्थव्यस्था पूर्वपदावर येत असताना अशा रुग्णसंख्या वाढणे चांगले संकेत नाही.


कोरोना हा साथीचा आजार आहे, तो ज्या पद्धतीने कमी होतो आणि त्यांच्यावर योग्य नियंत्रण नाही मिळविले तर तो वाढतो सुद्धा हे मागील अनेकवेळा कोरोनाचे रुग्ण कमी-जास्त होण्याऱ्या आकडेवारीतून दिसून आले आहे. कोरोनाबद्दल अनेकांनी भविष्य वर्तविले होते. अमुक काळात कोरोना नष्ट होईल सगळे काही व्यवस्थित होईल. मात्र, तसे काही होताना दिसत नाही. काही दिवसापूर्वी चांगली परिस्थिती होती. मात्र, गेला आठवडाभरात कोरोनाची संख्या वाढीस लागली आहे. कोरोनाची लढाई ही केवळ प्रशासनासोबत नसून ती समाजातील सर्व घटकांसोबत आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील ही लढाई लढण्यासाठी सगळ्यांनी मिळून संगठीत होऊन ह्या लढाईचा मुकाबला केला पाहिजे.


संतोष आंधळे यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग