विश्वनाथ चव्हाण, वय 63 (नाव बदललेलं आहे) गेली सात वर्षपासून किडनीविकाराने त्रस्त असून दिवसाआड डायलिसिस करत आहे. मात्र या कोरोनाच्या (कोविड -19) वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील काही लहान डायलिसिस सेंटर स्टाफ येत नसल्यामुळे बंद पडण्याची वेळ आली आहे. चव्हाण दक्षिण मुंबईतील एका रुग्णालयात नित्यनियमाने डायलिसिस घेत होते, परंतु आज सकाळी जेव्हा ते डायलिसिस घेण्याकरिता रुग्णालयात गेले तेव्हा त्यांना कळलं की काही काळापुरतं रुग्णालयातील ही सुविधा बंद करण्यात आली आहे. यांनतर दिवसभर त्यांचे नातेवाईक अनेक हॉस्पिटल आणि सेंटर मध्ये जाऊन चौकशी करत आहे, मात्र त्यांच्या पदरी निराशा आली आहे. परळ भागातील एका खासगी रुग्णालयात त्यांना सांगितलं की आम्ही डायलिसिस करू मात्र त्या करीता कोविड -19 ची चाचणी गरजेची आहे. त्याचा निकाल आल्यानंतर त्यांना डायलिसिस करण्यात येईल. या सर्व प्रकारामुळे डायलिसिसवर असलेल्या रुग्णांची परवड होत असताना दिसत आहे.


चव्हाण हे प्रतिनिधीक उदाहरण आहे. राज्यातील असंख्य चव्हाण आणि कुटुंबीय सध्या डायलिसिस करण्याकरिता भटकंती करत आहे. किडनी वाचविण्याचे सर्व उपचार झाल्यानंतर जेव्हा ती कार्य करणे थांबते तेव्हा किडनी निकामी होते. अशावेळी शरीरातील रक्त शुद्धीकरणाचे कार्य थांबते आणि ते कृत्रिमरित्या करणे आवश्यक असते. किडनीचे कार्य कृत्रिमरीत्या करणे म्हणजेच डायलिसिस होय, त्यावेळी किडनीविकारतज्ञ्च्या मदतीने डायलिसिस हा पर्याय रुग्णासाठी उरतो. तो या प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावतो. डायलेसिस मशीनचा आधार घेऊन रक्तातील अशुद्ध घटक बाहेर फेकून शुद्ध रक्त शरीरात पुरविले जाते. या प्रक्रियेमधून शरीरातील जास्तीचे पाणी बाहेर काढले जात असून शरीरातील क्षारांचे प्रमाण योग्य प्रमाणात ठेवले जाते.


याबाबत अधिक माहिती देताना बॉम्बे हॉस्पिटलचे वरिष्ठ किडनी विकारतज्ज्ञ डॉ. श्रीरंग बिच्छू सांगतात की, सध्या अनेक किडनी विकाराने ग्रासलेल्या रुग्णांचे फोन येत आहे. ते ज्याठिकाणी नियमितपणे डायलिसिस घेत होते ते छोटे सेंटर काही कारणास्तव बंद आहेत. तर काही रुग्णालयात कोविड प्रादुर्भावामुळे तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहे. बहुतांश रुग्णालयात किंवा सेंटर मध्ये रुग्णांच्या डायलिसिस उपचाराचं वेळापत्रक ठरलं असून बऱ्यापैकी सेंटर नवीन रुग्णांना प्रवेश देण्यास अगोदरच असमर्थ आहेत. त्यातच काही सेंटर बंद झाल्यामुळे रुग्णांची व त्यांचा कुटुंबीयांची धावपळ होत आहे. यामध्ये शासनाने तात्काळ लक्ष घालून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. किडनीविकार असलेलया रुग्णांची अगोदरच प्रतिकारशक्ती कमी असते आणि त्यांना संसर्ग होण्याचा धोका इतरांपेक्षा हा अधिक असतो. या रुग्णांनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना या काळात बाहेर पडणे धोक्यचे असते. या रुग्णांना जर डायलिसिस सारखे योग्य वेळी उपचार मिळाले नाही तर ते त्यांच्या जीवावर बेतू शकते असेही तज्ज्ञ मंडळी सांगत आहे.


डॉ श्रीकांत शिंदे, खासदार, कल्याण, यांना ठाण्यातील एक महत्वाच्या रुग्णालयातील डायलिसिस सेंटर बंद पडले आहे याविषयी विचारले असता त्यांनी सांगितले की, 'सध्या ठाणे येथील एक रुग्णालयात कोविड बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे तेथील काही रुग्णांना तात्काळ हलविण्याची कार्यवाही सुरु केली असून त्यांना ठाण्यातील अन्य रुग्णालयात हलविण्यात येत आहे. या सर्व प्रकारामध्ये डायलिसिस सेंटर सुद्धा बंद करण्यात आले आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेच्या निर्देशानुसार या रुग्णायाचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करून रुग्णांना कसा दिलासा देता येईल यासाठी आम्हा सर्वांचे प्रयत्न सुरु आहेत'. मुंबई महानगर परिसरात अंदाजे 20 हजारापेक्षा जास्त रुग्ण डायलेसिस घेत आहेत, असे रुग्ण व्यवस्थित उपचार घेतल्यानंतर दैनंदिन काम व्यवस्तिथ करून 15-20 वर्षापर्यंत चांगला आयुष्य जगू शकतात.


डॉ विश्वनाथ बिल्ला, अपेक्स किडनी केअर चे संचालक सांगतात, अनेक सेंटर बंद आहेत कारण कर्मचारी वर्ग कामावर येत नाही. त्यांचे कुटुंबीय त्यांना कामाला पाठवत नाही. कर्मचारी वर्ग नसताना काम करणे मुश्किल आहे. मला असं वाटत की, आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वानी कामावर जाणं गरजेचं आहे. कोरोनाचं हे संकट म्हणजे युद्ध आहे असं आपले मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सांगत आहे. अशा या युद्धात जर आरोग्य सेवेतील कर्मचारी ज्याची गणना सध्या सैनिक म्हणून केली गेली आहे. ते जर कामावर गेले नाही तर रुग्णांना उपचार कसे देणार, आहे त्या परिस्थितीत स्वतःची काळजी घेऊन आपण रुग्णांना उपचार देऊ शकतो. यामुळे नाहीतर काय होईल कोरोना राहील बाजूला रुग्ण दुसऱ्याच आजराने दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्याची आरोग्य यंत्रणा त्यांचं काम करत आहे. आपली पण काही जबाबदारी आहे ती आपण सगळ्यानी पार पडली पाहिजे. जी काही दक्षता घ्यायची आहे ती घ्या ,पण रुग्णांना उपचार हे मिळालेच पाहिजे.


या प्रकरणी आम्ही राज्य शासनाच्या आरोग्य विभागला काही मार्गदर्शकतत्वे दिली आहेत, बंद पडलेले सेंटर कशा पद्धतीने निर्जंतुकीकरण करून तात्काळ सुरू करता येतील. डायलेसिस सुरु असलेल्या रुग्नांना वेळेत उपचार देणे गरजेचे आहे, त्याकरिता हे सेंटर लवकर उघडणे गरजेचे आहे, असे इन्स्टिटयूट ऑफ रिनल सायन्सेस, ग्लोबल हॉस्पिटलचे संचालक डॉ. भरत शाह म्हणाले.


लेखात वापरलेलं रुग्णाचं नाव बदललेलं आहे.


संतोष आंधळे यांचे आणखी काही ब्लॉग


BLOG | फिनिक्सच्या पक्षासारखी मुंबई झेप घेणार