गेला महिनाभर राज्य प्रशासन कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपायांसोबत या संसर्गजन्य आजाराविरोधात लस उपलब्ध झाल्यावर ती कशा पद्धतीने द्यावी याच्या नियोजनाच्या व्यवस्थापनाबाबत काम करण्यास सुरुवात केली आहे. राज्य आणि महापालिका प्रशासनाच्या या अनुषंगाने बैठका झाल्या आहेत. सध्या तरी भारतात कोणत्याही लशीच्या कंपनीला सर्व सामान्यांच्या वापराला परवानगी दिली गेलेली नाही. मात्र लवकरच ती परवानगी मिळेल अशी आशा या क्षेत्रातील तज्ञ व्यक्त करीत आहे. 2020 हे वर्ष संपण्यासाठी आता काही दिवसच शिल्लक आहेत, हे वर्ष कसं होतं हे विचारण्याची हिम्मत कुणीच करणार नाही. या वर्षाने अख्या जगाला आजारपण दाखवलं, अनेक नागरिकांचा बळी सुद्धा घेतला. सगळ्यांनाच अपेक्षित असणारं शेवटी, हे 2020 वर्ष एकदाचं संपतंय. मात्र ह्या कोरोनाने जो काही वर्षभर गोंधळ घालून ठेवलाय तो आता व्यवस्थित करण्यासाठी पुढचं संपूर्ण नवीन वर्ष जाणार आहे यामध्ये तीळमात्र शंका नाही. त्यामुळे नवीन वर्ष 2021 मध्ये ' कुणी लस देता का लस ' या एकाच गोष्टीच्या अवतीभवती फिरणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
काही महिन्यापूर्वीची परिस्थिती बघितली तर कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी सध्या ती नियंत्रणात आहे असे म्हणण्यास वाव आहे. राज्यातील शासकीय आणि खासगी आरोग्य यंत्रणा त्यांचे काम करीत आहे. मृत्यू कमी करता येतील यासाठी ते शर्थीचे प्रयत्न करीत आहे. योग्य वेळी निदान आणि योग्य उपचारपद्धतीमुळे रुग्ण उपचारास उत्तम प्रतिसाद देत आहेत. सध्याची परिस्थिती या आजरच्या अनुषंगाने सकारत्मक असली तरी लोकांना आणि प्रशासनाला वेध लागले आहे ते लशीचे. संपूर्ण जग या लशीची वाट पाहत आहे त्यापैकी तीन चार देशात लसीकरण मोहिमेला सुरवात झाली आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांमध्ये नवीन उमेद निर्माण झाली आहे. आता प्रत्येक जण त्या लशीची वाट पाहत आहे. सरकारी परवानग्यांमुळे आपल्या देशात अजून कोणत्याही लस निर्मिती करणाऱ्या औषध कंपनीला परवानगी मिळालेली नाही. लवकरच ती मिळेलही. मात्र त्या अगोदर लस वाटपाच्या या महाकाय कार्यक्रमाचे नियोजन आखण्यास शासनाने सुरुवात केली आहे. संपूर्ण देशात आणि राज्यात नागरिकांना लसीकरण करणे हा खरं तर फार मोठा कार्यक्रम आहे. बहुतांश सरकारी यंत्रणा या कामी खर्ची करावी लागणार आहे.
हे ही वाचा - BLOG | संघर्ष : अॅलोपॅथी विरुद्ध आयुर्वेद!
नवीन वर्षात म्हणजे 2021 मध्ये, प्रत्येकाच्या तोंडी एकच प्रश्न असेल आणि तो म्हणजे लस आली का? कधी येणार? आली तर तुम्ही घेतली आणि आम्हाला केव्हा मिळणार? या आजराच्या भीतीने प्रत्येक जण लशीची वाट पाहत असले तरी ती सर्वसामान्यांना नेमकी केव्हा मिळेल याची माहिती मिळण्यासाठी आणखी काही वेळ वाट पाहावी लागणार आहे. लस आल्यामुळे या आजरामुळे बचाव होण्यास मदत होणार असल्याचे वैद्यकीय तज्ञांनी सांगितल्यामुळे नागरिकांना सतत त्याच विचारांमुळे 'जळी स्थळी काष्ठी पाषाणी' लस दिसणार आहे. त्याचवेळी तज्ञांनी हे सुद्धा जाहीर केले आहे कि लस ही प्रतिबंधात्मक उपचारपद्धती आहे. त्यामुळे हा आजार होऊ नये याकरिता लस घेईपर्यंत आणि घेतल्यावर काही महिने सुरक्षिततेचे सर्व नियम पाळणे अपेक्षित आहे. विशेष म्हणजे या काळात लशीचा काळाबाजार आणि बनावट लस निर्माण करण्याचा प्रयत्न काही समजाकंटाकाकडून होऊ शकतो. त्यामुळे लस देण्याच्या कुणाच्याही अमिषाला नागरिकांनी बळी पडता कामा नये. शासनाने ठरवून दिलेल्या संबंधित व्यक्ती किंवा संस्थांकडूनच लस घ्यावी. प्रत्येकाला लस मिळेल यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून याकरिता नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. जर कुणालाही लशीला घेऊन कुठे काही अनुचित प्रकार दिसून आल्यास त्याची तात्काळ पोलिसांना माहिती दयावी आणि संभाव्य धोक्यापासून सगळ्यांना सुरक्षित करावे. केंद्र आणि राज्य सरकारने लसीकरणाच्या या व्यवस्थापनासाठी विविध स्तरावर समिती गठीत केल्या आहेत.
पीआयबीने प्रसिद्धीस काढलेल्या पत्रकानुसार, डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड -19 लसीकरण धोरणाबाबत चर्चा करण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वपक्षीय बैठक घेतली. त्याचवेळी पंतप्रधानांनी अहमदाबाद, पुणे आणि हैदराबादमधील लस उत्पादन सुविधांना भेट देण्याचा आपला अनुभव यावेळी सांगितला तसेच सध्या चाचणीच्या वेगवेगळ्या टप्प्यात असलेल्या जवळपास आठ संभाव्य लसी भारतात तयार केल्या जातील, त्यामध्ये तीन देशी लसींचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली. लसीशी संबंधित मोहिमेची जबाबदारी सांभाळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारमधील तांत्रिक तज्ञ व अधिकारी यांचा समावेश असलेल्या राष्ट्रीय तज्ञ गटाची स्थापना करण्यात आली आहे. राष्ट्रीय तज्ञ गट राष्ट्रीय आणि प्रादेशिक आवश्यकतांनुसार एकत्रितपणे निर्णय घेईल. भारताचे लसी वितरणातील कौशल्य, लसीकरणासाठी अनुभवी आणि विशाल नेटवर्क क्षमता आणि त्यांचे अस्तित्व अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले की यामुळे कोविड लसीकरण सुलभ होण्यात मदत होईल. अतिरिक्त शीतगृह सुविधा आणि अशा प्रकारच्या अन्य वाहतूक विषयक गरजांसाठी राज्य सरकारांबरोबर सहकार्य केले जाईल. लस व्यवस्थापन आणि वितरणासाठीचे डिजिटल मंच (कोविड -19 व्हॅक्सीन इन्फॉरमेशन नेटवर्क को-विन) तयार केले असून त्याची चाचणी राज्य व जिल्हा पातळीवरील अधिकारी व अन्य हितधारकांच्या सहकार्याने घेण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे गेल्या आठवड्यात राज्य सरकारने लसीकरणासाठी तयारी सुरु केली आहे. कोरोना लसीकरणासाठी मुख्य सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय सुकाणू समितीची पहिली बैठक झाली. यावेळी राज्यात कोरोना लसीकरणासाठी सुरु असलेल्या पूर्वतयारीचा आढावा मुख्य सचिवांनी घेतला. लसीकरणासाठी प्राधान्यक्रम ठरविण्यात आला असून पहिल्या गटात शासकीय आणि खासगी रुग्णालयातील आरोग्यसेवक कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे कामगार आणि एकात्मिक बालविकास प्रकल्पातील कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी नऊ गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. दुसऱ्या गटात फ्रंटलाईन वर्करचा समावेश असून त्यामध्ये राज्य आणि केंद्रीय पोलीस, सशस्त्र कृती दल, गृहरक्षक दल, नागरी सुरक्षा संस्थांमधील कर्मचाऱ्यांसह आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवकांचा आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तिसऱ्या गटात 50 वर्षावरील आणि ज्यांना अन्य व्याधी आहेत. अशा 50 वर्षाखालील व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.
या सगळ्या प्रकारात आता नागरिकांची भूमिका फार महत्त्वाची असणार आहे. आपल्याकडे कुठलाही राष्ट्रीय योजनेचा कार्यक्रम हाती घेतला की त्यामध्ये सहभागी होण्याकरिता झुंबड उडते. लसीकरण हा तर थेट आरोग्याशी निगडित विषय असल्यामुळे या लसीकरणासाठी झुंबड उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या झुंबडीमध्ये होणाऱ्या मोठ्या प्रमाणात गर्दी मुळे कोरोनाचा प्रसार होण्यास मदत होऊ शकते याचा विचार प्रत्येक नागरिकांनी आतापासूनच करून ठेवायला हवा. येत्या नवीन वर्षात शासनापुढे सर्व नागरिकांचे लसीकरण करणे हे एक मोठं आव्हान असणार आहे. मात्र हे आव्हान पेलण्याकरिताच त्यांनी अगोदर पासून व्यस्थापनास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या नवीन वर्षात कोणत्या गोष्टी होतील कि नाही हे माहित नाही मात्र लसीकरणाच्या मोहिमेला नक्कीच बळ मिळेल याचे मात्र आपण सगळेच साक्षीदार असणार आहोत.
संतोष आंधळे यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग
- BLOG | 'टेक केअर' पासून 'RIP' पर्यंत...!
- BLOG | कोरोनाचे आकडे बोलतात तेव्हा...
- BLOG | फिजिओथेरपीचं योगदान महत्वाचं!
- BLOG | 'डेक्सामेथासोन'!
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
- BLOG | कोरोना, टोळधाड अन् चक्रीवादळ कसं जगायचं!
- BLOG | खासगी रुग्णालयाचं 'हे' वागणं बरं नव्हं
- BLOG | रुग्णसंख्या आवरणार कशी?
- BLOG | रोगाशी लढायचंय, आकडेवारीशी नाही !
- BLOG | 'ती' पण माणसूच आहे
- BLOG | पुण्याची तब्बेत सुधारतेय, पण..
- BLOG | सावधान! मेनूकार्ड बघण्यापूर्वी इथे लक्ष द्या
- BLOG | बेफिकिरी नको, धोका टळळेला नाही...!
- BLOG | अरे, राज्यात कोरोना आहे!
- BLOG | आला थंडीचा महिना, मला लागलाय खोकला!
- BLOG | ये तो होनाही था!
- BLOG | कोरोनाचा सिक्वेल येणार
- BLOG | गुड न्युज! प्रतीक्षा संपली