कोरोना बाधितांच्या आकडेवारीत देशात महाराष्ट्र आणि राज्यात मुंबई शहर हॉटस्पॉट बनले होते. सर्वात जास्त रुग्णांची आणि या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूची नोंद मुंबई शहरात नोंदवली गेली होती. अख्या देशाचे आणि राज्याचे लक्ष मुंबईच्या तब्येतीकडे लागले होते. अनेक जण मुंबई सोडून गावी जात होते. मात्र मुंबईत हा आजार झपाट्याने वाढत होता. महापालिका प्रशासनाचे अथक प्रयत्न त्यांची आणि खासगी रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा यामुळे मुंबई शहरात 3 जानेवारी रोजी या आजाराने मृत्यू होणाऱ्यांची संख्या केवळ तीन एवढीच नोंदली गेली. वैद्यकीय तज्ञांच्या मते खऱ्या पद्धतीने 'मिशन झिरो' दिशेने वाटचाल सुरु असून आरोग्य यंत्रणेने विकसित केलेली उपचारपद्धती अचूक असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. तर राज्यातील अनेक जिल्ह्यात मृत्यू पावणाऱ्यांची संख्या शून्य आहे. यामुळे या आजाराचा संसर्ग जरी नागरिकांना होत असला आणि नवीन रुग्ण निर्माण होत असले तरी मृत्यू दर कमी करण्यात प्रशासनाला चांगलेच यश प्राप्त झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी या आजाराचे लक्षण दिसताच तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घेतल्यास नवीन रुग्ण निर्माण होण्याचे प्रमाणही कमी होण्यास मदत होणार आहे.


राज्याचा आरोग्य विभाग रोज कोरोनाच्या रुग्णांबाबत आकडेवारी जाहीर करत असतो. त्यानुसार, 3जानेवारी रोजी राज्यात 2 हजार 064 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 3 हजार 282 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 35 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही महिन्यात मुंबई महापालिकेने, विषाणूचा पाठलाग (चेस द व्हायरस) या धोरणातून बाधित, संशयित रुग्णांचा व्यापक मोहीमेतून शोध घेणे, त्यांच्या संपर्कातील व्यक्तिंचे अधिकाधिक संस्थात्मक अलगीकरण करणे, घरोघरी जाऊन व फिरत्या दवाखान्यांच्या माध्यमातून तसेच विशेष शिबिरांतून जास्तीत जास्त चाचण्या करीत रुग्ण वेळीच शोधणे व त्यांच्यावर उपचार करणे, रुग्णालयांसह ठिकठिकाणी उभारलेल्या तात्पुरत्या रुग्णालयांमध्ये पुरेशा व गुणवत्तापूर्ण उपचार सुविधा निर्माण करणे, परिणामकारक अशा औषधी साठा उपलब्ध करुन त्या आधारे उपचारांवर भर देणे अशा एक ना अनेक चौफेर उपाययोजनांनी कोविड १९ संसर्ग नियंत्रणात आणायला मदत झाली आहे. प्रशासनाने 22 जून रोजी मिशन झिरो या शीघ्र कृती अभियानाचा प्रारंभ केला होता.


3 डिसेंबर रोजी, ठाणे, ठाणे मनपा, कल्याण डोंबिवली मनपा, उल्हासनगर मनपा, भिंवडी निजामपूर मनपा, पालघर, रायगड, पनवेल मनपा, नाशिक, मालेगाव मनपा, अहमदनगर मनपा, धुळे, धुळे मनपा, जळगाव, जळगाव मनपा, नंदुरबार, पुणे, पिंपरी चिंचवड मनपा, सोलापूर मनपा, कोल्हापूर, कोल्हापूर मनपा, सांगली, सांगली मिरज कुपवाड मनपा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, औरंगाबाद, औरंगाबाद मनपा, जालना, हिंगोली, परभणी, लातूर, लातूर मनपा, उस्मानाबाद, बीड, अकोला, अकोला मनपा, अमरावती, अमरावती मनपा, बुलढाणा, वाशीम,वर्धा, भंडारा, चंद्र्पुर, गडचिरोली या जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण शून्य इतके होते. तर या दिवशी सर्वात जास्त मृत्यूचे प्रमाण नागपूर मनपा येथे असून त्याची संख्या ६ इतकी होती. तर चंद्रपूर मनपा, नांदेड, नांदेड मनपा, परभणी मनपा, सातारा, पुणे मनपा, अहमदनगर,वसई विरार मनपा, येथे मृत्यू पावणाऱ्याची संख्या सर्वात जास्त कमी म्हणजे १ इतकी होती.

ज्या गोष्टीसाठी आरोग्य यंत्रणेचे सातत्त्याने प्रयत्न सुरु आहेत ते म्हणजे मृत्यू दर कमी करणे, आतापर्यंतची जर डिसेंबर महिन्यापर्यंत ते आतापर्यंत कोरोनाच्या अनुषंगाने प्रसिद्ध होणारा दैनंदिन अहवाल पहिला तर लक्षात येते कि राज्यातील मृत्यू दर बऱ्यापैकी कमी झाला आहे. विशेष म्हणजे राज्यात कायम जास्त मृत्यू दर असणाऱ्या मुंबई शहरातही हे वास्तव आता सत्यात उतरले आहे. राज्यात पहिला मृत्यू मुंबई शहरातील कस्तुरबा रुग्णालयात महापालिकेच्या रुग्णालयात १७ मार्च रोजी झाला होता. त्यानंतर हळू हळू मुंबईच्या आणि राज्यात मृत्यूचे प्रमाण वाढत गेले होते. त्याचप्रमाणे नव्याने होणाऱ्या रुग्ण संख्येत भरमसाठ वाढ झाली होती. आतापर्यंत राज्यात ४९ हजार ६६६ मृत्यू झाले आहेत तर मुंबई मध्ये ११ हजार १३५ रुग्णांचा या आजाराने मृत्यू झाला आहे.


याप्रकरणी मुंबई शहराच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे अध्यक्ष डॉ अविनाश सुपे सांगतात, की, "नक्कीच मृत्यू दर राज्यातील आणि विशेष म्हणजे मुंबईतील कमी होतोय ही चांगली बाब आहे. कोरोनाच्या अगदी सुरवातीच्या काळात जी परिस्थिती होती तशीच आज परिस्थिती आहे. त्यामुळे आपल्याकडे पहिली लाट ओसरण्याच्या जवळ आलो आहोत असे म्हणता येईल. आपल्याकडच्या डॉक्टरांनी विकसित केलेली उपचारपद्धती आणि त्याची अंमलबजावणी वेळीच होत असल्याचे यामुळे दिसून येते. सह व्याधी असणारे रुग्ण आणि वयस्कर किंवा उशिरा आलेले रुग्ण यामध्ये मृत्यूचे प्रमाण दिसत असले तरी ८०% लोकांमध्ये आता या आजाराबाबत जनजागृती झाली आहे. २० % अजूनही कोणतेही नियम न पाळता बेदरकारपणे हिंडत आहेत त्यातही तरुण जास्त आहेत. मात्र हे मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते. मात्र नागरिकांनी अजून पुढचे ७-८ महिने सुरक्षिततेचे नियम पाळत राहणे फायद्याचे आहे."


14 ऑगस्ट 2020 ला 'लक्ष्य : मृत्यू संख्या कमी करणे' या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले होते. त्यामध्ये, गेल्या काही दिवसात कोरोनबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात वाढले आहे ही आनंदाची बाब असतानाच दुसरीकडे रुग्णसंख्या आणि या आजाराने मृत्यू होणाऱ्यांची संख्या मध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता रुग्णसंख्या कमी करण्याबरोबरच मृत्यू संख्या कशी कमी करता येईल याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी अनेक लॉकडाऊनच्या शिथिलतेमुळे अनेक गोष्टी सुरु करण्यात आल्या आहेत. विस्कटलेली आर्थिक घडी व्यवस्थित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र या सर्व प्रकारात आपल्याला कोरोनाची लागण होऊ नये म्हणून काळजी घेताना दिसतोय का ? ते शासनाने आखून दिलेले सुरक्षिततेचे नियम पाळत आहोत का ? आजही काही रुग्ण विशेषकरून वयस्कर रुग्ण घरीच राहून आजार अंगावर काढत असल्याचे बोलले जात आहे. या अशा प्रकारामुळे रुग्णसंख्या वाढत आहे आणि परिणामी मृत्यूची संख्याही वाढतच आहे. आरोग्य यंत्रणा दारावर येण्याची वाट बघण्यापेक्षा वेळेत डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे नाही तर ते जीवावर बेतत असल्याचे दिसून येत आहे, अनेकवेळा रुग्ण अतिगंभीर झाल्यावर रुग्णालयात येत असल्यामुळे त्यांना अनेक शर्थीचे प्रयत्न करून वाचविणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे आजारपणाची काही लक्षणे दिसल्यास तात्काळ जवळचे डॉक्टर किंवा रुग्णालयाशी संपर्क केला तर मृत्यू संख्या आटोक्यात येऊ शकत असल्याचे मत वैद्यकीय तज्ञ व्यक्त करतात.


अजूनही मुंबई शहराला सुधारणा करण्यासाठी बराच वाव आहे, विशेष म्हणजे मृत्यू दर १ टक्क्यांपेक्षाही कमी करण्याचे उद्धिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करावे लागणार आहे. कारण संपूर्ण राज्यात आजही रुग्ण संख्या मुंबई शहराची सर्वात जास्त आहे. आरोग्याच्या या आणीबाणीच्या काळात अशा साथीच्या आजारात मृत्यू दर कमी होणे हे चांगले संकेत आहेत. साथीच्या आजारात प्रादुर्भाव इतक्या लवकर संपत नाही हे आपण स्वाईन फ्लू आजाराच्या वेळी पहिले आहे. 10 वर्षांनंतरही, आजही त्या आजाराचे रुग्ण पहावयास मिळतात. त्याचप्रमाणे काही वर्ष कोरोनाचे रुग्ण येत राहतील मात्र त्यापासून मृत्यू न होऊ देणे हेच आरोग्य यंत्रणेचं काम आहे त्यांच्या या अथक प्रयत्नांना पुन्हा एकदा सलाम.





संतोष आंधळे यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग