भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने देशात कोणत्याही प्रकारचा समूह संसर्ग झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. कोविड-19 विषाणूचा भारतात, प्रथम केरळ राज्यामार्गे शिरकाव होऊन सहा महिने झाले. या मोठ्या काळानंतरही या साथीच्या आजाराचा संसर्ग झाला नाही, ही चांगली बाब आहे. याचं सर्व श्रेय जात ते आरोग्य यंत्रणेसोबत लॉकडाउन या निर्णयाला. लॉकडाउनमुळे कोरोना नियंत्रित ठेवण्यास नक्कीच यश प्राप्त झाले आहे, हे आता सर्वश्रुत आहे. मात्र, सध्याच्या घडीला विशेषता महाराष्ट्र राज्यातील प्रशासनासमोर आव्हान आहे ते कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या आवरणार कशी? दिवसागणिक रुग्ण वाढतच आहेत. या आजराने मृत्यू पावणाऱ्याची संख्याची वाढतच आहे. लॉकडाउन मधील शिथीलतेचा भलताच अर्थ घेत निर्जन रस्ते नागरिकांनी ताब्यात घेतले आहे. या गर्दीवर नियंत्रण नसल्यामुळे अनेक ठिकाणी सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवले जात आहे. चांगल्या भावनेने दिलेल्या शिथीलतेचा जर अशा पद्धतीने गैरवापर होत असेल तर, 'पुनश्च हरिओम' या संकल्पनेवरच गदा येणायची शक्यता नाकारता येत नाही. भारताची लोकसंख्या आणि या विषाणूचं वागणं पाहता समूह संसर्ग झाला नाही यामध्ये खरोखरच यश आहे. कारण हा आजार संसर्गजन्य आहे. बाधीत रुग्ण हा आजार पसरवत असतात, मुद्दाम नव्हे परंतु अनावधाने हा सर्व प्रकार घडत असतो. या सर्व प्रकाराला आळा घालायचा असेल तर लोकांनी सुरक्षिततेचे नियम कठोर पद्धतीने पाळले पाहीजे. गुरुवारी राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात 152 रुग्णांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. 3 हजार 607 नवीन रुग्णाचं निदान झालं असून 1 हजार 561 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात सध्याच्या घडीला 47 हजार 968 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. या सगळ्या आकडेवारीवरून रुग्णाची संख्या वाढतच आहे. कोणताही रुग्ण उपचाराशिवाय वंचित राहू नये म्हणून, राज्यातील आणि महापालिकेचा आरोग्य विभाग मेहनत घेत आहे. ते कमी मनुष्यबळातही जेवढं शक्य होईल तेवढ्या चांगल्या पद्धतीने रुग्णांवर उपचार करीत आहेत.

Continues below advertisement

कोरोनाबाधितांच्या जागतिक आकडेवारीत आता भारत चौथ्या क्रमांकावर आहे. अनेक देशांना मागे टाकून वेगवान पद्धतीने आपला क्रमांक पुढे जात आहे, निश्चितच ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. रुग्णसंख्येने आपल्यापेक्षा जास्त असणाऱ्या रशिया देशाचा क्रमांक तिसऱ्या स्थानावर असला तरी या आजाराने मृत्यू पावल्यांचा आकडा आपल्या कडील मृतांच्या आकड्यांपेक्षा कमी आहे. गेली अनेक महिने आपल्या देशात, राज्यात आणि शहरात कोरोनावर चर्चा होत आहे, तो होऊ नये याकरिता कोणते उपाय करायचे याची माहिती बहुतांश लोकांना आहे. तरीही आपला रुग्णसंख्येचा आकडा वाढतोच आहे, कुणी मुद्दाम स्वतःला कोरोना आजार करून घेत नाही. रुग्णसंख्या वाढीसाठी कुणा नेमक्या एका व्यवस्थेला जबाबदार धरता येणार नाही. कोरोनाचा आजरा हा सगळ्यांसाठीच नवीन आहे, प्रशासन आणि आरोग्य व्यवस्था नवीन आव्हानांचा सामना करत मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहे.

काही समाज माध्यमांमध्ये व वाहिन्यांवर महाराष्ट्रात परत एकदा लॉकडाऊन लावून सर्व दुकाने बंद करण्यात येणार आहेत अशा स्वरूपाच्या बातम्या येत आहेत. अशा प्रकारे कोणताही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला नाही. अशा बातम्या जनमाणसांत संभ्रम निर्माण करतात त्यामुळे शहानिशा केल्याशिवाय अशा बातम्या प्रसारित करू नयेत. अशा गैरसमज आणि अफवा पसरविणाऱ्या बातम्या किंवा पोस्ट फॉरवर्ड करणे गुन्हा आहे. आपण राज्यात अर्थचक्राला गती देत आहोत. आपले व्यवहार हळूहळू सुरु करीत आहोत. पण लॉकडाऊन उठवतो आहोत. याचा अर्थ एकदम गर्दी करणे आणि सुरक्षित अंतराच्या, स्वच्छतेच्या नियमांचे पालन न करणे बरोबर नाही. बाहेर पडल्यावर कायम चेहऱ्याला मास्क लावणे, साबणाने, जंतूनाशकाने हात धुणे, शारीरिक अंतर ठेवणे हे नियम आता आपल्याला आपल्या जीवनाचा भाग बनवावे लागतील. याची सवय होईस्तोवर त्रास होईल पण ही जीवन पद्धती सर्वांनी स्वत:च्या आणि आपल्या जवळच्या व्यक्तींच्या आरोग्यासाठीच अंगिकारावी लागेल. स्वयंशिस्त ही पाळावीच लागणार, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

Continues below advertisement

सध्या तरी रुग्णसंख्या रोखायची कशी यावर ठाम उत्तर नसलं तरी आतापर्यंत ज्या नागरिकांनी कोरोनाला दूर ठेवण्यात यश मिळवलं आहे, ते यश अबाधित कसं राहील याबाबत विचार केला पाहिजे. कोरोनाचं हे थैमान म्हणजे एक प्रकारचं युद्ध असे सर्वच वरिष्ठ मंडळी म्हणत आहे. सध्याच्या या युद्धात शस्त्र टाकून चालणार नाही जो पर्यंत हे युद्ध सुरु आहे तो पर्यंत प्रत्येक जणाला हे युद्ध लढावेच लागणार आहे, तो पर्यंत माघार नाही. या आजारावर आजही ठोस उपायपद्धती नाही. मात्र, तोपर्यंत ज्या पद्धतीने उपचार सुरु आहे ते तसे कायम ठेवून गंभीर रुग्णांना या आजरातून बाहेर काढणं हे सर्वच वैद्यकीय तज्ञांसमोर मोठं आव्हान आहे. देशाचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र राज्याचा कोरोनासंदर्भातील आढावा घेतला असून काही सूचनाही केल्या आहेत.

राज्यात आजही कंत्राटी पद्धतीवर अधिक मनुष्यबळ निर्माण व्हावे याकरिता सर्वच महापालिका प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्राला मदत यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज आहे, अनेक रुग्णांच्या बेड मिळण्यासंदर्भातील ही तक्रार दूर करण्यात अजूनही यश प्राप्त झालेले नाही. तसेच जर रुग्णांनी खासगी रुग्णालयात दाखल करून घेतले तर त्याच्या उपचाराच्या बिलाच्या संदर्भातील जो शासन निर्णय आहे, त्यांची अजूनही व्यवस्थिपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही. तर अनेक रुग्ण भीतीपोटी रुग्णालयात जायला घाबरत आहे तितकेच खरे. या रुग्णांमध्ये विश्वास निर्माण होईल, असं चित्र निर्माण करण्याची गरज आहे. आपल्या अलगीकरणात नेल्यावर तिथे आपली व्यवस्था होईल का? असा प्रश्न त्यांना पडत असतो. ह्या तक्रारी वेगवान पद्धतीने दूर करण्याची गरज असून नागरिकांनी सुद्धा आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. रुग्ण संख्या आवरण्याची जबाबदारी आता सगळ्यांचीच आहे असे म्हणून पुढे जाण्याची वेळ आहे.

संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग